-
हेल्थ केअर: डॉ. लीना राजवाडे
आठवड्यातून जे किमान ५ दिवस, किमान २० मिनिटे चालतात, ते आठवड्यातून एकदा किंवा कमी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा ४३% कमी आजारी पडतात
नजीकच्या भविष्यकाळात तुमची तपासणी झाल्यावर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला ११ नंबर बस प्रिस्क्रिप्शन दिल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. होय, तुम्ही साधारण एक वर्षाचा असल्यापासून करत असलेली ही साधी कृती.
Walking, is a boon to your overall health. The closest thing we have to a wonder drug,” असे रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे माजी संचालक डॉ. थॉमस फ्रेडन यांनी सांगितले आहे.
होय वाचकहो, आज अनेक विद्यापीठांत संशोधनाने ज्याचे महत्त्व पुन्हा सिद्ध होत आहे, अशी ही ११ नंबर बस म्हणजे चालणे. याविषयी अधिक जाणून घेऊ आजच्या लेखात. अर्थात, तुम्हाला कदाचित माहीत असेल की, चालणे यासह कोणतीही शारीरिक क्रिया तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे; परंतु विशेषतः चालण्याचे अनेक फायदे आहेत. हार्वर्ड व इतर विद्यापीठातील संशोधनातून सिद्ध झालेले फायदे, जे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात ते बघूयात-
१. वजन कमी होते – वजन वाढवणाऱ्या जनुकांच्या प्रभावाचा प्रतिकार करते. हार्वर्डच्या संशोधकांनी १२,००० पेक्षा जास्त लोकांमधील ३२ लठ्ठपणा वाढवणाऱ्या जीन्सचा शोध घेतला ज्यामुळे हे जनुक शरीराच्या वजनात किती योगदान देतात. त्यानंतर त्यांनी शोधून काढले की, अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांमध्ये जे दररोज सुमारे एक तास वेगाने चालतात, त्याचे जनुकांचे परिणाम अर्धे झाले होते.
२. sweet tooth नियंत्रित करण्यास मदत करते. एक्सेटर युनिव्हर्सिटीच्या अभ्यासाच्या जोडीने असे आढळले की १५ मिनिटांच्या चालण्यामुळे चॉकलेटची लालसा कमी होऊ शकते आणि तणावपूर्ण परिस्थितीत तुम्ही चॉकलेटचे प्रमाण देखील कमी करू शकता आणि ताज्या संशोधनाने पुष्टी केली आहे की, चालण्यामुळे विविध प्रकारच्या साखरयुक्त स्नॅक्सची लालसा कमी होऊ शकते.
३. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. संशोधकांना आधीच माहीत आहे की, कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो; परंतु अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या महिला आठवड्यातून सात किंवा त्याहून अधिक तास चालतात, त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका दर आठवड्याला तीन तास किंवा त्याहून कमी चालणाऱ्यांच्या तुलनेत १४ % कमी असतो.
४. चालण्यामुळे सांधेदुखी कमी होते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, चालणे संधिवात-संबंधित वेदना कमी करते. आठवड्यातून पाच ते सहा मैल चालणे देखील संधिवात होण्यापासून रोखू शकते. चालणे सांध्यांचे संरक्षण करते – विशेषत: गुडघे आणि नितंब, जे ऑस्टियोआर्थरायटिससाठी सर्वात जास्त संवेदनशील असतात – चालण्याने सांध्यांचे स्नायू मजबूत होतात.
५. चालणे हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. चालणे सर्दी आणि फ्लू हंगामात तुमचे संरक्षण करण्यात मदत करू शकते. १,००० हून अधिक स्त्री-पुरुषांच्या अभ्यासात असे आढळून आले की, जे आठवड्यातून किमान ५ दिवस, दिवसातून किमान २० मिनिटे चालतात, ते आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा कमी व्यायाम करणाऱ्यांपेक्षा ४३% कमी आजारी पडतात आणि जर ते आजारी पडले तर ते कमी कालावधीसाठी आणि त्यांची लक्षणेही सौम्य असतात. भारतीय वैद्यक शास्त्र याविषयी काय म्हणते हे देखील जाणून घेऊयात.
‘‘चंक्रमण’’ ही विनासायास होणारी नैसर्गिक शारीरिक हालचाल आहे. याने बल सुधारते, इंद्रियाचे कार्य सुधारते, मेधा किंवा ग्रंथाकर्षण शक्ती चांगली होते, वाताचे अनुलोमन होते, अग्नी सुधारतो, पचनशक्ती चांगली राहते. मधुमेही व्यक्तींनी जरूर चालावे, किंबहुना या आजारावर ही फायदेशीर अद्रव्य चिकित्सा आहे. उन्हाळ्यात करायचा सर्वात उत्तम शारीरिक व्यायाम म्हणजे चालणे. याने शरीरावर अतिरेकी ताण येत नाही. बैठे काम करणारे लोक यांच्यासाठी तर हा फारच सुंदर व्यायाम आहे. चालताना पायात योग्य पादत्राण घालून चालावे. शरीराचा भार पेलण्यासाठी योग्य पद्धतीने चालणेही आवश्यक आहे. योग्य पद्धतीने चालण्याने आनंददायी अनुभव मिळू शकतो आणि शरीर देखील सक्षम होते.
म्हणूनच चालताना योग्य तंत्र वापरा – स्थिर गतीने चाला, आपले हात मुक्तपणे फिरवा आणि शक्य तितके सरळ चालण्याचा सराव ठेवा. थोडक्यात, सहज सोपी, किफायतशीर अशी ही ११ नंबर बस नक्कीच लवकरात लवकर पकडा आणि निरोगी राहण्याची हमी मिळवा.