-
स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
खुर्चीची दांडी हातात घेऊन गोल गोल घुमवत असतानाच नानांची एंट्री झालेली पाहून सारे स्तब्ध झाले. ‘कोण पाहिजे?’ असं विचारले तेव्हा, सांगतो सांगतो, मला बसू तर जरा असं म्हणून ते थेट खुर्चीतच जाऊन विसावले.
कविता आणि साहित्याचं गाव जवळून पाहायची संधी जेव्हा लाभली तेव्हा काव्य संमेलनाचा एक माहोल अनुभवता आला. कविता अंतरी साठवताना जेव्हा एका गझलकारांशी ओळख झाली, तेव्हा बोलता बोलता कविता नुसत्या ओसंडून वाहायच्या आणि गझलचे तराणे उमटू लागायचे. गझलमध्ये डुंबलेला गझलकार जसा पाहण्यात आला तसा कवितेने वेडावलेला श्रोताही तितकाच हळवा झालेला पाहायला मिळाला.
परिसरात व्यापार उद्योग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नानांना देखील कवितेचे वेड असलेले पाहायला मिळाले. एखाद दुसरी कविता कुणालाही रुचू आणि पचू शकते. पण कवितेचा माहोल संपूर्णपणे अनुभवण्याची सहनशीलता असलेलीही पाहायला मिळाली. प्रत्येक गंभीर कविता लिहिणारा कवी फार गंभीर असेल, अशी कल्पना स्वप्नातही कुणी करू नये, तशी विनोदी कविता लिहिणारी माणसं विनोदी असतील असेही मानू नये. एकदा कवितेच्याच ओढीने या प्रसिद्ध नानांची एंट्री अचानकच घरी झालेली. तेव्हा हे घरातील मोठ्या माणसांना भेटायला आले असतील असे वाटलेले. यावेळी भावंडांमध्ये मस्तीचा मूड असल्याने ते येण्याअगोदर बरीच मस्ती आणि दात काढणं चालू झालेलं. एकमेकांना चिडवणं, खोड्या काढणं हे प्रकार करतानाच घरात असलेल्या आराम खुर्चीवर बसण्यासाठी सगळ्यांची चढाओढ लागलेली. मात्र या झटापटीत एकमेकांची फजिती करण्यासाठी हळूच कुणीतरी खुर्चीची एक दांडी काढून खुर्चीचे कापड अलगद गुंडाळून ठेवले. म्हणजे कुणी त्यावर बसले की आपोआप खाली पडणार अशा सोयीने या खुर्चीची व्यवस्था केली आणि खुर्चीची दांडी हातात घेऊन गोल गोल घुमवत असतानाच नानांची एंट्री झालेली पाहून सारे स्तब्ध झाले.
‘कोण पाहिजे?’ असं विचारले तेव्हा, सांगतो सांगतो, मला बसू तर जरा असं म्हणून ते थेट खुर्चीतच जाऊन विसावले.
‘अहो, अहो नाना, तुम्ही?’ त्यांना तिथे न बसण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न केला, पण छे ते काहीही न ऐकता खुर्चीत बसलेदेखील.
‘उद्या साहित्याच्या गावाला जायचे आहे. तिथे सारी साहित्यनगरी अनुभवता येईल. एखादी कविता वाच.’ ते सांगत राहिले. पण हातातील आराम खुर्चीची दांडी हातात ठेवून घशात अडकलेला आवंढा कसातरी गिळत हो हो म्हटलं.
बाकी भावंडं आता काहीतरी मोठा ड्रामा घडणार आहे, या आविर्भावात फिदीफिदी दात काढत हसत राहिलेली. पण, नाना आरामखुर्चीत तर आरामात बसले. ते अजून तरी तसेच होते. पण सांगता येत नाही कधी काय होईल, या हेतूने भावंडं अवतीभवती हसताना पाहून ते म्हणाले, ‘मुलांनो असेच हसत राहा.’ तसा त्यांच्या हास्याला अधिकच ऊत आलेला. हळूहळू ही गोष्ट घरातील मोठ्यांनाही कळलेली. पण काही अनर्थ होण्याआधी नाना खुर्चीतून उठले तर ठीकच, पण काही घडलं म्हणजे? त्यापेक्षा आपणच त्यांना उद्या येत असल्याचं सांगून उठण्यासाठी आग्रह धरला. पण डायरी आण बघू, कविता तर वाचू दे मला म्हणून ते उठेनासे झाले.
‘अरे देवा!’ मग पटकन डायरी दिली. एक एक कविता नजरेखालून घालताना चेहऱ्यावरील भाव प्रकट होत असतानाच खुर्चीचे कापड हळूहळू सैल होऊ लागले आणि नाना जवळपास खुर्चीतून थेट जमिनीवर आले. तसा एकच कल्लोळ झाला! सारी भावंड दरवाजाच्या, कपाटाच्या पाठीमागे जाऊन लपली आणि खो खो करून दात काढत पुन्हा फिदीफिदी हसत सुटली.
‘हे असं काय? खुर्चीचा कपडा सटकला वाटतो’ म्हणून नाना उठले, उठताना हातातील खुर्चीची दांडी बघून त्यांचीही दांडी गुल. कवितेची डायरी हातात देत हसत हसत म्हणाले, ‘आता यावरही एक कविता लिहून टाक’ पण साहित्याच्या गावा यायला विसरू नको.
नानांची ही तऱ्हा बघून दुसऱ्या दिवशी साहित्याच्या गावा जाण्याचा मूड काही राहिला नाही. पण, फोन आला आणि पाहिलं तर नानांची गाडी दरवाजात उभी. साहित्यनगरीचा वेध घेताना अनेक साहित्यिक आणि कवी अनेक शब्दांच्या कंगोऱ्यांनी नटलेल्या कवितांचे नजराणे सादर करत राहिले. आपली कविता सादर होण्याची वेळ आली तेव्हा नानांना पाहिलं, तर नाना मात्र गायब. पटकन आजूबाजूला पाहिलं, पण नाना काही दिसलेच नाहीत. कदाचित ते कालच्या रागाने गेले असावेत, म्हणून अगदी नाकासमोर पाहिलं, तर नाना चक्क आरामखुर्चीतच बसलेले. त्यांना असं आरामखुर्चीत बसलेलं पाहून काळजात धस्स झालं. खुर्चीच्याच प्रसंगावर कविता सादर करावी हा त्यांचा अट्टहास होता खरा, पण ही कविता खरोखरंच तेथे सादर केलेली बघून आजूबाजूचे नानांच्या भोवती गोळा झाले आणि खुर्चीची दांडी नीट आहे ना ते पाहण्यासाठी तिथे एकच कल्लोळ केला.