शेवटच्या ३० धावा करताना जायंट्सच्या नवाबांनी टाकली नांगी
लखनऊ (वृत्तसंस्था) : कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाला मोहित शर्मा, नूर अहमद यांच्या गोलंदाजीची जोड मिळाल्याने लो स्कोअरिंग सामन्यात अनपेक्षित सरशी साधण्यात गुजरातला यश आले. चांगली सुरुवात मिळवूनही लखनऊ सुपर जायंट्सने हा सामना गमावला.
गुजरात टायटन्सने दिलेल्या १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊला दमदार सुरुवात मिळाली. लोकेश राहुलने ६८ धावांची खेळी खेळली. त्याला कायले मायर्सने २४ धावा आणि कृणाल पंड्याने २३ धावांची साथ दिल्याने विजय लखनऊच्या आवाक्यात आला होता. १४.३ षटकांत १०६ धावा करत लखनऊचे दोन फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे लखनऊ या सामन्यात सहज विजय मिळवणार असे मानले जात होते. परंतु चमत्कार घडावा असे घडले आणि जायंट्सला उर्वरित ३० धावा करणे अशक्यप्राय झाले. सुरुवातीची तिकडी वगळता लखनऊच्या सहा फलंदाजांपैकी एकालाही दुहेरी धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा संघ निर्धारित २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १२८ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
गुजरातच्या मोहित शर्मा, नूर अहमद यांची अप्रतिम गोलंदाजी केली. या दोघांनीही प्रत्येकी २ विकेट घेतल्या आणि धावाही रोखण्याचे काम केले. गुजरातने अखेरच्या पाच षटकांत सामना फिरवला. नूर अहमद, राशिद खान, मोहित शर्मा आणि मोहम्मद शामी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चौकार आणि षटकार मारू दिले नाही. एकापाठोपाठ एक चेंडू निर्धाव टाकत लखनऊच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. लखनऊच्या फलंदाजांना अखेरच्या ४६ चेंडूंवर एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नाही. लखनऊने आपल्या डावाच्या शेवटच्या षटकात ४ विकेट गमावल्या.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने सहा विकेट गमावून १३५ धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६६ धावा केल्या. त्याच्याशिवाय ऋद्धिमान साहाने ४७ धावांची शानदार खेळी केली. या दोघांशिवाय केवळ विजय शंकर (१० धावा) दहाचा आकडा पार करू शकला.
संघातील महत्त्वाच्या फलंदाजांनी निराश केल्याने गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार पंड्याने झुंजार अर्धशतक झळकावत संघाला कसेबसे १३५ धावांपर्यंत नेले. या सामन्यात शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्याच वेळी अभिनव मनोहर तीन आणि डेव्हिड मिलर सहा धावा करून बाद झाले. लखनऊकडून कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन बळी घेतले. नवीन-उल-हक आणि अमित मिश्राला प्रत्येकी एक विकेट मिळाली.