तुळजापूर ते मंत्रालय मोर्चा काढण्याचा मराठा समाजाचा निर्णय
पंढरपुर : मराठा समाजाने आता थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा गुंजणार आहे. तसेच मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देखील देण्यात आला आहे.
आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवा अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही, असा पवित्रा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज आक्रमक झाला आहे. सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या वतीने पंढरपुरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती.
राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून हा सरकारला धक्का बसला आहे. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.