दि.१९ एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताचे नाव घोषित केले. चीनला मागे सारून लोकसंख्येत नंबर १ असे स्थान भारताने मिळवले आहे. लोकसंख्या वाढ म्हणजेच अन्य देशांपेक्षा भारतात जन्मदर जास्त आहे, असे ढोबळमानाने म्हटले जाईल. इतकी वर्षे चीन हा सर्व जगात सर्वात जास्त लोकसंख्येचा देश होता. आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारताने नंबर एकचे स्थान प्राप्त केले आहे. भारत हा जगात लोकसंख्येत नंबर १ देश झाला हा सन्मान आहे का? हे भारताला भूषण आहे का? अशीही चर्चा या निमित्ताने होऊ शकते. पुढील तीन दशके भारताचा लोकसंख्यावाढीचा वेग कायम राहील, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक लोकसंख्या हे काय प्रगतीचे लक्षण म्हणायचे का? सन २०५० मध्ये भारताची लोकसंख्या १६७ कोटींवर जाण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून सन २०५० मधेही भारत नंबर एकवर राहील अशी चिन्हे आहेत.
जगात सर्वत्र दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. कोरोनाची ढाल पुढे करून सन २०११ मध्ये या देशात जनगणना झालीच नाही. त्यातही जातीनिहाय जनगणना करा, असा हट्ट अनेक विरोधी पक्षांनी धरल्याने जनगणनेतही राजकारण घुसले. प्रत्येक गोष्टीत जातपात आणल्याशिवाय विरोधी पक्षांना चैनच पडत नाही. काळाची पावले ओळखायची नाहीत असा अनेकांनी चंग बांधलेला आहे. जातीपातीशिवाय राजकारण नाही आणि जातीपातीशिवाय निवडणुका नाहीत हा काहींचा अजेंडाच आहे. मग विकासाची चर्चा होणार तरी कशी? भारताची लोकसंख्या १६७ कोटी असेल तेव्हा चीनची १३१ कोटी असेल असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात म्हटले आहे. या घडीला चीनला मागे सारून लोकसंख्या वाढीत भारताने बाजी मारली असली तरी भारत-चीन यांच्यात अंतर केवळ तीस लाखांचे आहे. तेच अंतर पुढील काही वर्षांत वेगाने वाढत जाणार आहे. चीन आपली लोकसंख्या नियंत्रणाखाली राखण्यात यशस्वी होताना दिसतो आहे, तर भारतात लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्व यंत्रणा ढेपाळल्या आहेत. काँग्रेस, भाजप, जनता पक्षापासून देशावर अनेकांनी सत्ता काबीज केली पण कुटुंब नियोजनाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही, त्याचा परिणाम आज भारताची लोकसंख्या जगात नंबर १ झाली आहे. जगाची लोकसंख्या ८०० कोटींवर गेली आहे. त्यात भारताची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख आहे. चीनची लोकसंख्या १४२ कोटी ३७ लाख आहे. अमेरिकेची ३४ कोटी, इंडोनेशियाची २७ कोटी २५ लाख, पाकिस्तानची २४ कोटी ५ लाख आहे. भारतातील ६८ टक्के लोक हे १५ ते ६४ वयोगटातील आहेत. देशात पुरुषांचे आयुष्यमान ७१, तर महिलांचे ७४ आहे. सन २०५० पर्यंत भारतात दर पाच नागरिकांपैकी एक जण ज्येष्ठ नागरिक असेल व सन २०३० पर्यंत भारतातील ज्येष्ठांची संख्या १९ कोटी २० लाखांवर असेल असेही भाकीत संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात व्यक्त केले आहे.
लोकसंख्या वाढीविषयी संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल रोचक वाटत असला तरी त्यातून भारताला निश्चित गर्भित इशारे आहेत. राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी वेळीच सावध झाले नाही, तर या देशात लोकसंख्येचे स्फोट होऊ शकतो याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. भारतात तरुणांची संख्या विलक्षण आहे. लोकसंख्या वारंवार वाढत आहे. या लोकसंख्येला देण्यासाठी पुरेसा रोजगार देणे हे मोठे आव्हान आहे. कोट्यवधी तरुण मुले रोजगाराशिवाय रस्त्यावर फिरत बसली, तर नुकसान कोणाचे होणार? नवीन पिढी भवितव्य घडवायचे असेल, तर त्यांना हक्काचा रोजगार मिळायलाच पाहिजे. लोकसंख्या वेगाने वाढत राहिली आणि फक्त आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे असे मागत राहिली तर देश चालवणे कठीण होईल. सरकारकडे सतत हात पसरणाऱ्या जनतेपेक्षा सरकारला आणि उपेक्षितांना आपल्या कमाईतून वाटा देणारी जनता अधिक असली पाहिजे. भारताची लोकसंख्या १४३ कोटींच्या जवळ गेली आहे. त्यात करदाते किती आहेत हे सरकारने एकदा जाहीर करावे. आयकर भरणारे किती, मालमत्ता कर भरणारे किती, जीएसटी देणारे किती याची आकडेवारी पुढे येणे गरजेचे आहे. काही न करता मोफत आणि सवलतींवर अवलंबून असणारी जनता किती आहे, हेही पुढे आले पाहिजे. निवडणुकीत व्होट बँक मजबूत करण्यासाठी राजकारणी मोफत वीज, मोफत पाणी, मोफत बस प्रवास, मोफत रेशन अशा रेवड्या वाटत सुटले आहेत. पण त्याचा खर्च हा करदात्यांच्या खिशातूनच होतो हे कसे विसरता येईल. देशात जे दुर्बल, उपेक्षित, कमकुवत आहेत त्यांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. पण सुशिक्षितांना रोजगार अधिक कसा मिळेल यावर भर दिला पाहिजे. कर न भरणारे व बेरोजगार यांचीच संख्या मोठी असेल तर देश चालवणे कठीण होईल. वाढत्या लोकसंख्येला रोजगार, अन्न धान्य, आरोग्य सेवा पुरवणे हे भारतापुढे मोठे आव्हान आहे. अन्न, वस्त्र, निवारा यापलीकडे लोकांच्या जीवनावश्यक गरजा वाढल्या आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. चीनप्रमाणे कुशल मनुष्यबळ व गुणवत्ताधारक यांची लोकसंख्या अधिक असेल, तर देशाचे भविष्य उज्ज्वल राहील.