महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
“खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्या दिवशी जे काही झाले, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्व लोकांनी याचे पालन करायला पाहिजे”, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा या निर्णयाबाबत माहिती देताना म्हणाले.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात १२ श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. या मृत्यूप्रकरणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यात आता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
खासघरमधील कार्यक्रम भर दुपारी घेतल्यामुळेच उपस्थितांपैकी काहींना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातून त्यांचा मृत्यू ओढवल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तसेच, कार्यक्रमाची वेळ निवडण्यातच आयोजकांनी आणि सरकारने चूक केल्याचेही सांगितले जात आहे.