रोहित शर्माने केले सुतोवाच
मुंबई: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सध्या कॅमेरून ग्रीन आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या नावाचा उदो उदो सुरु आहे पण मुंबई इंडियन्समध्ये एक असा खेळाडू आहे, ज्याला थेट कर्णधार रोहित शर्मानेच सॅल्यूट ठोकला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून तिलक वर्मा आहे. विजयानंतर मुंबई इंडियन्सने त्याला ड्रेसिंग रूममध्ये सन्मानित केले. पण हे इतक्यावरच थांबत नसून त्याला भारताच्या क्रिकेट टीममध्ये घेण्याचे सुतोवाच रोहित शर्माने केले आहे.
तिलक वर्माने हैदराबादविरुद्ध १७ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ४ षटकार निघाले. तिलक वर्माच्या या खेळीने मुंबई इंडियन्सला १९२ धावांपर्यंत मजल मारता आली. यामुळेच त्याला ड्रेसिंग रूममध्ये खास बॅज देण्यात आला आणि त्याचा सन्मान करण्यात आला.
त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला, "तिलक वर्माचे वय आणि त्याची फलंदाजी पाहता तो खूप पुढे जाईल असे स्पष्टपणे दिसते. आपण सारे तिलक वर्माला लवकरच इतर संघांविरूद्ध एका वेगळ्या टीमच्या कपड्यांत खेळताना पाहू."