हैदराबादला पराभूत करत इंडियन्सचा सलग तिसरा विजय

हैदराबाद (वृत्तसंस्था) : कॅमेरून ग्रीनच्या नाबाद ६४ धावा आणि त्याला मिळालेली सांघिक गोलंदाजीची साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला १४ धावांनी पराभूत करत यंदाच्या हंगामातील सलग तिसरा विजय मिळवला. मुंबईने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली.


केकेआरविरुद्ध शतकी खेळी खेळणाऱ्या हैदराबादच्या हॅरी ब्रुकने मंगळवारी मात्र निराश केले. अवघ्या ९ धावा करून तो तंबूत परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीही स्वस्तात परतला. जेसन बेहरेनडोर्फनेच मुंबईला दोन्ही बळी मिळवून दिले. अवघ्या २५ धावांवर हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर मयांक अगरवाल आणि कर्णधार आयडेन मार्कराम यांनी हैदराबादचा डाव सावरला. ग्रीनने मार्करामचा अडथळा दूर करत हैदराबादला तिसरा धक्का दिला. मार्करामने २२ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्मा अवघी एक धाव करून आल्या पावली माघारी परतला. त्यानंतर मयांक आणि हेनरिच क्लासेन या जोडगोळीने फटकेबाजी करत हैदराबादच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. क्लासेनने चौकार आणि षटकारांची बरसात करत १६ चेंडूंत ३६ धावा जोडल्या. मात्र क्लासेन आणि मयांक हे सेट झालेले फलंदाज ५ धावांच्या अंतराने बाद झाल्याने हैदराबादचा संघ पुन्हा संकटात सापडला. मयांकने ४८ धावा जमवल्या.


अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी २० धावांची आवश्यकता होती. अर्जुनने अखेरच्या षटकात अवघ्या ५ धावा दिल्या आणि हैदराबादचा संघ १७८ धावांवर सर्वबाद झाला. जेसन बेहरेनडोर्फ, रिली मॅरेडिथ, पियूष चावला, कॅमेरान ग्रीन यांनी छान गोलंदाजी करत सांघिक खेळाचे दर्शन दिले. महागडी गोलंदाजी झाली असली तरी वेळीच विकेट मिळविल्यामुळे मुंबईचा विजय सुकर झाला.


हैदराबादच्या घरच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. मुंबईच्या सलामीवीरांनी त्यातल्या त्यात बरी सुरुवात केली. ४१ धावांवर मुंबईची पहिली विकेट पडली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने ५३ धावा करून एक विकेट गमावली होती. कॅमेरून ग्रीनने मुंबईसाठी सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. ग्रीनने ४० चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकार ठोकत ६४ धावांची चमकदार खेळी केली. तसेच तिलक वर्माने १७ चेंडूंत ३७ धावा तडकावल्या. ईशान किशनने ३१ चेंडूंत ३८ धावांची दमदार खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने १८ चेंडूंत २८ धावा केल्या. टीम डेविडने १६ धावांचे योगदान दिले. पहिल्या तीन फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे मुंबईला चांगली सुरुवात मिळाली. त्याचे रुपांतर मग मोठ्या धावसंख्येत करता आले. तिलक वर्माने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत मुंबईच्या धावसंख्येची गती वाढवली. हैदराबादकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक दोन बळी घेतले. मात्र त्याला धावा रोखण्यात यश आले नाही. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे