बंगळूरु (वृत्तसंस्था) : देवॉन कॉनवे (८३ धावा), शिवम दुबे (५२ धावा) या जोडगोळीच्या फटकेबाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने उभारलेला २२७ धावांचा डोंगर सर करणे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला जड गेले. फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धडाकेबाज फलंदाजी करत आरसीबीला विजयासमीप आणले होते. परंतु चुकीच्या वेळी विकेट पडणे त्यांना महाग पडले आणि अवघ्या ८ धावांनी चेन्नईने बाजी मारली.
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. त्यांचा ओपनर विराट कोहली पहिल्या षटकात अवघ्या ६ धावांवर बाद झाला. तर दुसऱ्या षटकात महिपाल लोमरोर शून्यावर बाद झाला. यानंतर डु प्लेसिस आणि मॅक्सवेलने चांगली खेळी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी चांगली फटकेबाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२६ धावांची भागीदारी केली. ३६ चेंडूंत ७६ धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या मॅक्सवेलला तीक्षणाने तेराव्या षटकात धोनीच्या हाती झेलबाद केले. मॅक्सवेलनंतर डु प्लेसिसही पुढच्याच षटकात आऊट झाला. त्याने ६२ धावांची तडाखेबंद खेळी केली. मोईन अलीने त्याला धोनीच्या हाती झेलबाद केले. यानंतर सतराव्या षटकात दिनेश कार्तिक २८ धावांवर बाद झाला. तुषार देशपांडेने त्याला महीश तीक्षणाच्या हाती झेलबाद केले. तर अठराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मथीषा पथिरानाने शाहबाज अहमदला १२ धावांवर बाद केले. तर तुषारने वेन पार्नेलच्या रुपात त्याची तिसरी विकेट एकोणिसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घेतली. पार्नेल २ धावांवर बाद झाला. सुयश प्रभूदेसाईने ११ चेंडूंत १९ धावा तडकावत सामना रोमांचक स्थितीत आणला होता. अखेर २० षटकांत आरसीबीला ८ फलंदाजांच्या बदल्यात २१८ धावांपर्यंत मजल मारता आली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. त्यांचा स्टार ओपनर ऋतुराज गायकवाड तिसऱ्याच षटकात बाद झाला. सिराजने त्याला ३ धावांवर बाद केले. यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेवोन कॉनवेने डाव सावरत चांगली फटकेबाजी केली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणेला वानिंदू हसरंगाने ३७ धावांवर बाद केले. यानंतर कॉनवेने शिवम दुबेसह डाव पुढे नेला. दोघांनी चांगली फटकेबाजी करत तिसऱ्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. कॉनवे 83 धावांवर असताना हर्षल पटेलने ८३ धावा करणाऱ्या कॉनवेला त्रिफळाचीत चेन्नईला मोठा धक्का दिला. त्यानंतर शिवम दुबेही पुढच्याच षटकात आऊट झाला. त्याला वेन पार्नेलने ५२ धावांवर मोहम्मद सिराजच्या हाती झेलबाद केले.
नंतर विजय कुमारने अंबाती रायुडूला १४ धावांवर बाद केले. नंतर मोईन अली व रविंद्र जडेजाने शेवटच्या षटकांत चांगली फटेकबाजी केली. शेवटच्या षटकात रवी जडेजा १० धावांवर बाद झाला. शेवटच्या दोन चेंडूंवर धोनी व मोईन अलीने एक एक धाव घेत संघाची धावसंख्या २२६ धावांवर नेली. शेवटच्या षटकात अतिरिक्त धावांमुळे हर्षल पटेलचे षटक अर्ध्यावर थांबवून ग्लेन मॅक्सवेलने ते षटक पूर्ण केले.