आचार्य अत्रे आज असते तर त्यांनी म्हटले असते की, असा सोहळा गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. ज्या सोहळ्याचे वर्णन आम्ही करत आहोत, ते वर्णन रविवारी खारघरच्या विराट अशा मैदानावर प्रसिद्ध अाध्यात्मिक गुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देण्यात आला, त्याविषयी आहे.
अभूतपूर्व गर्दीच्या साक्षीने, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार अर्पण करण्यात आला. अप्पासाहेब यांच्याबाबत शहा यांनी जे सांगितले की, त्यांनी देशातील लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले, ते शब्दशः खरे आहे.
दत्तात्रय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी हे गुरुवर्य निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र. नानासाहेबांनी जे समाज सुधारणेचे व्रत घेतले, ते अप्पासाहेब यांनी पुढे चालवले. व्यसनमुक्तीच्या बाबतीत त्यांनी केलेले कार्य महान आहेच, पण वृक्षारोपण, स्वच्छता अभियान वगैरे अनेक बाबतीत त्यांचे कार्य लाखमोलाचे आहे. म्हणूनच त्यांच्या या कार्याला एक पावती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. तो किती सार्थ होता, याची साक्ष रविवारी सोहळ्याला झालेली ३० लाख श्रीसदस्यांची आणि इतरही लोकांची झालेली गर्दी पाहून पटलीच. विशेष म्हणजे धर्माधिकारी यांच्या घराण्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन वेळा देण्यात आला आहे. हाही एक अलौकिक योगायोग आहे. नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यानंतर अप्पासाहेब यांना पुरस्कार मिळाला. शहा यांनीही याचा आदरपूर्वक उल्लेख केला.
यापूर्वी मंगेशकर भगिनींपैकी लता आणि आशा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण त्यांचे आडनाव वेगवेगळे होते. खरेतर धर्माधिकारी यांचा समाजसेवेचा वारसा कान्होजी आंग्रे यांच्या काळापासून आहे, याचाही उल्लेख रविवारी कार्यक्रमात करण्यात आला. त्यावरून किती प्राचीन काळापासून हे घराणे समाजसुधारणा आणि महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी झटत होते, हे समोर आले. धर्माधिकारी घराण्याने महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी जे अमोल योगदान दिले आहे, त्याप्रती महाराष्ट्र सरकारने दिलेली ही कृतज्ञतेची पावती आहे, असे जे उद्गार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले, ते संपूर्ण रास्त आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच श्रीसदस्य आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीतून धर्माधिकारी यांच्या निरूपणातून आपल्याला सावरण्याची कशी ऊर्जा मिळाली, याचे उदाहरण सांगून श्रोत्यांना भारावून टाकले. खरेतर रविवारी कार्यक्रमाला उपस्थित असलेला प्रत्येक श्रोता हा भारावलेल्या मनःस्थितीतच होता. पाच तास कडक ऊन सहन करून सोहळ्याला ३० लाख श्रोते आले, ते केवळ धर्माधिकारी यांच्यावरील अकृत्रिम प्रेमापोटी आणि भक्तीमुळे. पाच तास कोणतीही चुळबूळ न करता कडक उन्हात बसून राहाणे हे त्यांच्यावर धर्माधिकारी घराण्याने केलेले संस्कार आहेत. नियमित बैठका याद्वारे धर्माधिकारी यांच्या तीन पिढ्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य चालवले.
रविवारी जो सोहळा झाला, त्यात नेहमीप्रमाणे श्री सदस्यांनी जे शिस्तीचे प्रदर्शन केले, तेही अनुकरणीय आहे. अगदी हजार-पाचशे लोक जमले तर कार्यक्रमात गोंधळ होतो आणि वाहतुकीची वाट लागते. पण तीस लाख लोक ज्या शिस्तीने आले आणि नंतर गेले, त्यावरून धर्माधिकारी यांनी आपल्या श्रीसदस्यांवर कोणत्या प्रकारच्या शिस्तीचे संस्कार घडवले आहेत, याचे प्रत्यंतर येते. आणि दरवर्षी असाच शिस्तबद्ध सोहळा होत असतो. खरेतर राजकीय पक्षांनी त्याचे अनुकरण करावे. धर्माधिकारी यांनी समाजाची भेट पुन्हा समाजाकडेच सोपवत २५ लाख रुपयांचा पारितोषिक निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केला. समाज ऋण फेडण्याचे एक तेजस्वी झळाळते उदाहरण अप्पासाहेबांनी समाजापुढे सादर केले.
धर्माधिकारी यांनी आपल्या श्री सदस्य परिवारातर्फे जे उपक्रम राबवले आहेत, त्यातही त्यांचा प्रागतिक दृष्टिकोन दिसून येतो. अंधश्रद्धा पसरवण्याचे कार्य परिवाराकडून कधीही केले जात नाही. इतक्या मोठ्या संख्येने समाजमनावर प्रभाव असताना एखाद्याला अभिमानाने स्वर्ग दोन बोटे उरला असता. पण धर्माधिकारी परिवार हा आजही जमिनीवर आहे. हेच त्यांचे ईश्वराघरचे लेणे आहे. अर्थात प्रचंड गर्दी जमली असताना दुर्घटनेचे गालबोट यंदा प्रथमच लागले.
जवळपास १३ जण उष्माघाताने मृत्युमुखी पडले, तर कित्येक रुग्णालयात दाखल आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. या घटनेचे राजकीयीकरण करू नका, असे त्यांनी विरोधकांनाही सुनावले. पण भाजपविरोधी माध्यमांनी याही घटनेचे राजकीयीकरण केले आणि जणू ऊन भाजपनेच आणले, या पद्धतीने बातम्या छापल्या. ही अश्लाघ्य पत्रकारिता आहे आणि तिचा करावा तितका निषेध थोडाच आहे.
राजकीय पक्ष कमी आणि माध्यमेच जास्त राजकीयीकरणात दंग झालेली दिसली. इतकेच काय पण अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असताना घरात बसून कोमट पाणी पीत लोकांना फेसबुक लाईव्हवरून सल्ले देणारे माजी मुख्यमंत्री तातडीने रुग्णांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. त्यांची इतकी कार्यक्षमता इतके दिवस कुठे लपली होती, हे समजत नाही. असो. पण काही श्रीसदस्यांचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल. त्यांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली, हे योग्यच झाले.