-
गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर दीर्घमुदतीसाठी घेऊन ठेवले तर गुंतवणूकदारांना ते नेहमीच चांगला फायदा करून देत असतात. यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालीसीसनुसार चांगल्या कंपन्या निवडून टप्प्याटप्प्याने सातत्याने ते शेअर्स खरेदी करत राहणे हे अत्यंत आवश्यक असते.
‘सन फार्मा’ ही आज आघाडीची औषधी निर्माण करणारी कंपनी असून १९८३ ला या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला या कंपनीने मानसिक आजारावर काम करणाऱ्या केवळ ५ औषधांची निर्मिती करून कंपनीची सुरुवात केली. आज प्रामुख्याने हृदयाचे आजार, डोळ्यांचे आजार, हाडाचे आजार, किडनीचे आजार, मानसिक आजार यावरील औषध निर्मितीचे काम ही कंपनी करते. आज जवळपास २००० पेक्षा अधिक उत्पादने या कंपनीची असून या एकूण उत्पादनांपैकी ७०% पेक्षा जास्त विक्री ही बाहेरील देशांमध्ये होते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% उत्पन्न हे अमेरिकेतून येते .
आयपीओद्वारे १९९४ साली ह्या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश झाला. भारतामध्ये आज पहिल्या क्रमांकावर असणार्या या कंपनीने १९९७ मध्ये अमेरिकेतील ‘कँराको’ ही कंपनी ताब्यात घेतली. ‘सन फार्मा’ या कंपनीने ताब्यात घेतलेली ही त्यांची पहिलीच ‘आंतरराष्ट्रीय कंपनी’ होती. त्यानंतर मधल्या काही वर्षात मिल्मेट लॅब, गुजरात लायका या कंपन्याचा ताबात्यांनी घेतला. २०१० ते २०१२ च्या दरम्यान ‘सन फार्मा’ने दुसा फार्मा, तरो फार्मा आणि यू आर एल फार्मा या मोठ्या कंपन्याचा ताबा घेतला.
या कंपनीसाठी २०१४ हे वर्ष अतिशय सोनेरी ठरले. याच वर्षी सन फार्माने औषधीक्षेत्रातील मोठी समजली जाणारी कंपनी ‘रॅनबँक्सी’ हिचा ताबा घेतल्याची घोषणा केली आणि केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेमध्ये देखील या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये जगातील पहिल्या पाच क्रमाकांमध्ये ‘सन फार्मा’ जावून बसली.
आज औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये ‘सन फार्मा’ जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. जवळपास ५०००० पेक्षा अधिक लोक या कंपनीत काम करतात. जगभरातील ६ खंडात या कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत. मागील वर्षी ‘वेजमन’ या संशोधनात या कंपनीने प्रवेश केला आहे. ‘सन फार्मा’ या कंपनीची आणखी काही उत्पादने ही यु.एस च्या अन्न व औषधी प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या फंडामेंटल अॅनालीसीसनुसार जरी भारतीय निर्देशांक महाग असले तरी शेअर बाजारात आगामी काळातील प्रत्येक घसरणीत ‘सन फार्मा’चे शेअर्स प्रत्येक टप्प्याला खरेदी करीत गेल्यास आज १००३ रुपये किमतीला मिळणारा हा शेअर पुढील ५ वर्षांचा विचार करता गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होत असते त्यावेळी निर्देशांकासोबतच घसरणारे शेअर्सचे भाव बघून आपल्याला भीती वाटायला लागते. आपण अशा घसरणीमध्ये घाबरून जावून आपल्याकडील चांगल्या कंपन्यांचे दीर्घमुदतीसाठी घेतलेले शेअर्स देखील मिळेल त्या किमतीला विकून टाकत असतत्यामुळे उत्तम आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शेअर्समध्ये देखील आपण नियोजन आणि अभ्यासाच्या अभावामुळे काही कारण नसताना नुकसान सहन करतो. दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते.
टेक्निकल अॅनालीसीसनुसार शेखअर बाजाराची दिशा ही तेजीची असून जोपर्यंत निफ्टी १७३१२ या पातळीच्या वर आहे. तोपर्यंत ही तेजी कायम राहील. टेक्निकल अॅनालीसीसनुसार जरी निर्देशांकाची दिशा तेजीची असली काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्याचा विचार करता जर निफ्टी १७३१२ या महत्वाच्या पातळीच्या खाली आला तर मात्र निर्देशांकात घसरण होवू शकते.
टेक्निकल अॅनालीसीसनुसार आयजीएल, जेबी फार्मा, अपटेक लिमिटेड हे शेअर्स आगामी काळासाठी तेजीची दिशा दर्शवित आहेत. ‘इंडिया मार्ट’ या शेअरने ५३८२ ही अत्यंत महत्वाची पातळी ओलांडत टेक्निकल अॅनालीसीसनुसार सक्षम तेजीची दिशा दर्शविलेली आहे. आज ५३९१ रुपये किमतीला मिळणारा हा शेअर मध्यम मुदतीचा विचार करता ६००० रुपयांपर्यंत तेजी दर्शवू शकतो. अल्प व मध्यम मुदतीसाठी शेअर्स खरेदी करीत असताना नेहमी योग्य स्टाँपलाँस लावूनच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. दीर्घमुदतीचा विचार करता तेजी व मंदी ओळखून चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या लाटेत खरेदी करत जाणे हाच शेअर मार्केटमध्ये श्रीमंत होण्याचा खरा राजमार्ग आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)