Tuesday, March 25, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वआयकर विवरणपत्र भरताना...

आयकर विवरणपत्र भरताना…

  • अर्थसल्ला: महेश मलुष्टे, चार्टर्ड अकाऊंटंट

आर्थिक वर्ष संपले की सर्वांची चलबिचल सुरू होते ती आयकर विवरणपत्र भरण्याची. ३१ जुलै ही ज्यांचे ऑडिट नाही व सर्व पगारदार व्यक्तीचे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख असते. त्यामुळे त्याआधी आपल्याला विवरणपत्र भरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. खालील कोणत्याही प्रकारात आपण मोडत असाल, तर तुम्हाला आयकर कायद्यानुसार भारतात आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक असते:

जर आर्थिक वर्षांमध्ये तुमचे एकूण उत्पन्न (कलम ८० सी ते ८० यु अंतर्गत कोणत्याही कपाती घेण्याआधी) २.५० लाखांपेक्षा जास्त असेल. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आहे. (वय ६० पेक्षा जास्त परंतु ८० पेक्षा कमी) किंवा अतिज्येष्ठ नागरिकांसाठी (८० पेक्षा जास्त वयाचे) ५ लाख रुपये. जर तुम्ही कंपनी किंवा फर्म आहात, तर आपणास विवरणपत्र भरावेच लागते (तोटा असला तरी). तुम्हाला आयकर परताव्याची मागणी करायची असल्यास. तुम्हाला उत्पन्नाच्या शीर्षकाखाली तोटा पुढे करायचा असल्यास. तुम्ही रहिवासी व्यक्ती असाल आणि भारता बाहेरील एखाद्या संस्थेमध्ये तुमची मालमत्ता किंवा आर्थिक स्वारस्य असल्यास विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही निवासी असाल आणि परदेशी खात्यात स्वाक्षरी करणारे अधिकारी असाल, तरी आपणास आयकर विवरणपत्रभरणे आवश्यक आहे.

धर्मादाय किंवा धार्मिक हेतूने किंवा राजकीय पक्ष किंवा संशोधन संघटना, वृत्तसंस्था, शैक्षणिक किंवा वैद्यकीय संस्था, ट्रेड युनियन, एखादे ट्रस्ट अंतर्गत ठेवलेल्या मालमत्तेतून मिळालेल्या उत्पन्नाची पावती असताना, तुम्हाला आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. लाभार्थी विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्था, रुग्णालय, पायाभूत सुविधा कर्ज निधी, कोणतेही प्राधिकरण, संस्था किंवा ट्रस्ट असाल तर आपण विवरणपत्र भरणे अपेक्षित आहे. तुम्ही भारतातील व्यवहारांवर कराराचा लाभ घेणारी परदेशी कंपनी असल्यास. कर्ज किंवा व्हिसासाठी अर्ज करताना विवरणपत्र भरल्याचा पुरावा देखील आवश्यक असू शकतो.

आयकर विवरणपत्रांचे प्रकार खालीलप्रमाणे
  • आय. टी. आर. १- रहिवासी असलेल्या व्यक्तींसाठी व ज्याचे एकूण पगारातून उत्पन्न, एक घर मालमत्ता, इतर स्रोत (व्याज इ.) यामधून येणारे उत्पन्न रु. ५० लाखांपर्यंत आहे, आणि कृषी उत्पन्न ५ हजार रुपयां पेक्षा कमी आहे त्यांनी आय. टी. आर. १ चा वापर करावा.
  • आय. टी. आर. २ – व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा यातून उत्पन्न नसलेल्या व्यक्ती आणि एच यू एफ यांनी आय. टी. आर. २ चा वापर करावा.
  • आय. टी. आर. ३ – व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा यातून उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि एच यू एफ यांनी आय. टी. आर. ३ चा वापर करावा.
  • आय. टी. आर. ४ – व्यक्ती, एच. यु. एफ. आणि फर्म (एलएलपी व्यतिरिक्त) ज्यांचे एकूण उत्पन्न रु. ५० लाखांपर्यंत आहे आणि व्यवसाय आणि व्यवसायातून उत्पन्न आहे जे कलम ४४ ए.डी, ४४ ए.डी.ए किंवा ४४ ए.इ. अन्वये मोजले गेले आहे आणि कृषी उत्पन्न रु. ५ हजार पर्यंत आहे अशा व्यक्तींनी आय.टी.आर ४ चा वापर करावा.
  • आय. टी. आर. ५ – वैयक्तिक, एच. यू. एफ, कंपनी आणि आय.टी.आर. ७ भरणारी व्यक्ती, यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी आय. टी. आर. ५ चा वापर करावा.
  • आय. टी. आर. ६ – कलम ११ अंतर्गत सूटचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी आय. टी. आर. ६ चा वापर करावा.
  • आय. टी. आर. ७ – कलम १३९ (४ए) किंवा १३९ (४बी) किंवा १३९ (४सी) किंवा १३९ (४डी) अंतर्गत विवरणपत्र भरणे आवश्यक असलेल्या कंपन्यांसह इतर व्यक्तींनी आय.टी. आर. ७ वापर करावा.

प्रत्येक करपात्र व्यक्तीने त्याच्या/ तिला वर नमूद केलेल्या प्रमाणे लागू असलेल्या योग्य विवरांपत्रांचा वापर करून करपात्र आणि करमुक्त असलेल्या सर्व उत्पन्न स्रोतांची माहिती भरणे आवश्यक असते. जर चुकीचा फॉर्म वापरून आयकर विवरणपत्र दाखल केला असेल, तर आयकर विवरणपत्र ‘दोषपूर्ण’ म्हणून संबोधले जाते व विवरणपत्र पूर्णपणे अवैध होऊ शकते.

पॅन, आधार आणि पत्त्याचा तपशीलाचा उल्लेख करताना करदात्याने सतर्क असले पाहिजे. मेल आयडी आणि संपर्क क्रमांक नमूद करताना देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. आयकर विभाग विवरणपत्रामध्ये दिलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवत असते, जर तुम्ही योग्य पत्ता न दिल्यास ती चुकीच्या पत्त्यावर दिली जाऊ शकते.नाव, बँक खाते क्रमांक, आय एफ सी कोड आणि पत्ता याचा योग्य तपशील विवरणपत्रात देणे आवश्यक असते. चुकीच्या वैयक्तिक तपशीलांमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयकर परताव्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात अडथळे येत असतात.
फॉर्म २६ ए. एस. व ए. आय. एस.मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व उत्पन्नांची नोंद करणे आवश्यक असते, कारण हे तपशील आयकर विभागाकडे आधीपासूनच असतात. जर आयकर विवरण पात्रात नमूद केलेल्या उत्पन्नात व फॉर्म २६ ए.एस. व ए आय एस मधील उत्पन्नात फरक असल्यास करदात्याला नोटीस येण्याची श्यक्यता असते. फॉर्म २६ ए.एस. आणि फॉर्म १६ जर जुळत नसल्यास करदात्याला कमी परतावा मिळू शकतो.

करदात्याने त्याच्या सर्व उत्पन्नाचा अहवाल देणे आवश्यक आहे, मग ते करमुक्त असो किंवा नसो. करमुक्त मिळकत करपात्र नसतात, तथापि, त्याबद्दल उल्लेख न केल्यास आयकर विभागाकडून नोटीस येण्याची श्यक्यता असते.

आयकर विवरणपत्र भरण्याची जबाबदारी फक्त आयकर विवरणपत्र भरून संपत नाही. आयकर विवरणपत्र दाखल केल्यापासून ३० दिवसांच्या आत पडताळणी करणे अनिवार्य आहे, कारण त्याशिवाय आयकर विभाग तुमच्या आयकर विवरणपत्रावर प्रक्रिया करत नाही. म्युच्युअल फंडाच्या युनिट्स स्विच करण्यावर भांडवली नफ्याची माहिती विवरणपत्रात देणे बंधनकारक असते. एखाद्या विशिष्ट योजनेतून दुसर्या योजनेत स्विच करणे किंवा स्थलांतरित देखील माहिती आयकर विवरणपत्रात देणे आवश्यक असते. आपण विवरणपत्र दाखल करताना वरील नमूद केलेल्या गोष्टी व इतर महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -