Share
  • कथा: रमेश तांबे

रिया एक नंबरची आळशी मुलगी होती. सकाळी दहा-दहा वाजेपर्यंत झोपायची. हाका मारून आई बिचारी दमून जायची. घरात कसली मदत करणार नाही की, स्वतःची पुस्तके, कपडे नीट ठेवणार नाही. तिची शाळा दुपारी एक वाजता भरायची. शाळेची तयारी करायला तिला तासभर वेळ लागायचा. कधी गणवेशाचा पट्टा विसरायची तर कधी केस विंचरायला विसरायची. वेळापत्रकानुसार दप्तर तिला कधीच भरता यायचे नाही. हमखास एक-दोन, वह्या-पुस्तके विसरायची. कधी पेन तर कधी खोडरबर! तिच्या अंगात आळशीपणा अगदी ठासून भरला होता. तासन् तास तिचे जेवण संपायचे नाही. या पोरीला कसे वळण लावायचे याचा आई विचार करीत बसे. तिच्याकडे पाहून दुःखी होत असे.

आजपासून तुझी आठवीची वार्षिक परीक्षा सुरू होतेय रिया. बरोबर एक वाजता पेपर सुरू होईल. घरातून बारा वाजताच निघ. दप्तर आजच भरून ठेव. दोन पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, कंपासपेटी, पॅड, शाळेचे ओळखपत्र सारे भरून ठेव. अन् एकदा सर्व वस्तू तपासून बघ. आईने बेडरूममधूनच रियाला आवाज दिला. दोन दिवस झाले होते. आईची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे आई बेडवर पडल्या पडल्याच रियाला सारं सांगत होती. पण, रिया ऐकून न ऐकल्यासारखं करीत होती. तिची टंगळमंगळ सुरूच होती. घड्याळाचा काटा कधी बाराच्या पुढे सरकला ते रियाला कळलेच नाही. जेव्हा आईची हाक आली,” अगं रिया निघ लवकर उशीर होईल पेपरला” तेव्हा कुठे ती दप्तर भरू लागली. घाई करू लागली. तिने पटापटा वस्तू दप्तरात कोंबल्या अन् आईच्या पाया पडून ती घराबाहेर पडली. तिने घड्याळात बघितले, शाळा भरायला अजून दहा-पंधरा मिनिटे बाकी होती. म्हणून ती शाळेकडे तशी सावकाशच निघाली. “सारे घेतलेस ना बरोबर” आईने ओरडून विचारले, तशी रिया आईवरच ओरडली,” आई लहान आहे का मी!”

रिया रमतगमतच शाळेत पोहोचली. अन् पहिली बेल झाली. बाईंनी पेपर वाटायला सुरुवात केली. तशी रिया धावत-पळत आपल्या जागेवर जाऊन बसली. “काय गं रिया उशीर का झाला? पंधरा मिनिटे लवकर यायचे हा नियम माहीत नाही का तुला?” रियावर बाई ओरडल्या. रियाने हातातल्या घड्याळाकडे बघितले अन् म्हणाली,” अजून एक वाजायला एक मिनिट बाकी आहे मॅडम, मी वेळेवरच आली आहे.” रागाने तिच्याकडे पाहत बेंचवर पेपर ठेवून मॅडम निघून गेल्या.

इकडे तिकडे बघत रियाने प्रश्नपत्रिका वाचली. पेपर एकदम सोपा होता. तिने कंपासपेटीसाठी दप्तरात हात घातला पण कंपासपेटी तिच्या हाताला लागेना. तिने पुन्हा पुन्हा हाताने चाचपडले पण नाहीच. शेवटी तिने दप्तर बेंचवर ठेवले. सर्व वस्तू बाहेर काढल्या पण कंपासपेटीचा काही पत्ताच नव्हता. आता उत्तरपत्रिका लिहायची कशी! तिला घाम फुटला. सारी मुलं आपापला पेपर लिहिण्यात दंग झाली होती. तिने आजूबाजूला, पुढे, मागे पाहिले. पण कुणाचीही मान वर नव्हती. प्रत्येक जण पेपर लिहिण्यात दंग होता. आता तर रियाला घाम फुटला. यातच दहा मिनिटे उलटून गेली. तिच्या डोळ्यांत पाणी आले. ती खूप घाबरली. आता काय करावे. मॅडमला तरी कसे सांगावे. कारण वर्गात येताच तिची मॅडम बरोबर बाचाबाची झाली होती. रियाची घालमेल, तिची चुळबूळ बाई मघापासून बघतच होत्या. रिया हुशार जरी असली तरी ती खूपच आळशी आणि वेंधळी मुलगी आहे, हे मॅडम ओळखून होत्या. म्हणूनच शेवटी मॅडमनांच तिची दया आली. त्या रिया जवळ आल्या. आपल्या जवळचे दोन पेन त्यांनी तिला दिले. अन् म्हणाल्या, लिही पेपर. काळजी करू नकोस. असं म्हणून त्यांनी रियाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने रियाला अगदी भरून आलं. थँक्स मॅडम! असं म्हणून तिने भरभर पेपर लिहायला सुरुवात केली.

पेपर संपला. रिया मॅडमच्या जवळ गेली. त्यांना त्यांचे पेन परत केले. ‘खूप खूप थँक यू’ असं म्हणत रियाने मॅडमच्या पायांना हात लावला. “मॅडम, मी आईचं ऐकलं नाही, आळशीपणा केला. नीट तयारी केली नाही. टंगळमंगळ करीत राहिले. पण त्याची शिक्षा मला मिळाली. यापुढे असं कधीच घडणार नाही. असा शब्द मी तुम्हाला देते.” असं बोलून रिया वर्गाबाहेर पडली.

ती भरभर चालत घरी पोहोचली. अन् रडत रडतच आईच्या कुशीत शिरली. आई किती तरी वेळ रियाला विचारत होती. अगं रिया काय झालं! पेपर अवघड होता का? कुणी तुला काही बोललं का? रियाचं रडणं ऐकून आईचाच जीव घाबराघुबरा झाला होता. शाळेतल्या बाई ओरडल्या का? मी त्यांना येऊन भेटते. थोड्या वेळानंतर रिया शांत झाली. पण वर्गात काय घडलं याचा पत्ता तिने आईला कधीच लागून दिला नाही. परीक्षेनंतर रियाच्या वागणूकीत खूपच चांगला बदल झाला होता. त्या दिवशी रिया का रडली, हे आईने मात्र केव्हाच ओळखले होते… कारण रियाची कंपासपेटी आईला बाबांच्या कपाटात सापडली होती!

Recent Posts

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

17 minutes ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

48 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

2 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

3 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

3 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

3 hours ago