Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाIPL 2024पंजाबविरुद्ध लखनऊ भारी पडणार?

पंजाबविरुद्ध लखनऊ भारी पडणार?

धवन, पूरनच्या खेळीवर लक्ष

  • ठिकाण : भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
  • वेळ : संध्या. ७.३० वाजता

लखनऊ (वृत्तसंस्था) : शनिवारी होणाऱ्या दुहेरी हेडरच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ एकमेकांना भिडतील. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सामने पाहिले तर लखनऊचे पारडे जड असल्याचे दिसते.

एलएसजीचा कर्णधार केएल राहुल या मुकाबल्यात त्याच्या माजी संघाला भिडणार आहे. सध्या ते चार सामन्यांत सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंत त्यांनी तीन सामने जिंकले आहेत, तर एकमेव सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गमावला आहे.

फलंदाजीच्या बाबतीत लखनऊसाठी काइल मेयर्स टॉप ऑर्डरमध्ये उत्कृष्ट ठरला आहे, त्याने आपल्या बॅटने संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मधली फळी तितकी कार्यक्षम नसली तरी निकोलस पूरन हे विस्फोटक अस्त्र त्यांच्या ताफ्यात आहे. त्याने शेवटच्या सामन्यामध्ये हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आणि लखनऊला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पूरनचा लखनऊच्या मधल्या फळीतील फलंदाजीत महत्त्वाचा वाटा आहे. आतापर्यंतच्या ४ सामन्यांत १४१ धावांसह पूरन लखनऊकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. शिवाय कृणाल पंड्यानेही गोलंदाजीसोबत फलंदाजीने काही चांगल्या खेळी करत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे.

आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे फक्त एकदाच एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. ज्यात सुपर जायंट्सने २० धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. दुसरीकडे, पंजाब किंग्सने आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले आहेत आणि त्यापैकी दोन जिंकले आहेत. त्यांचा एकमेव पराभव मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला. सध्या ते गुणतालिकेत चार गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत. लियाम लिव्हिंगस्टोनने अद्याप एकही सामना खेळलेला नाही आणि लयीत दिसलेला सलामीवीर भानुका राजपक्षे हा मनगटाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पंजाबसाठी सध्याचा ऑरेंज कॅपधारक शिखर धवन अभूतपूर्व फॉर्ममध्ये आहे. ‘गब्बर’ने केवळ तीन डावांत २२५ च्या उत्कृष्ट सरासरीने २२५ धावा जमवल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील त्याचे (नाबाद ९९ धावा) पहिले शतक एका धावेने हुकले. शिवाय प्रभसिमरन सिंगही या संघासाठी वरदान ठरला आहे, जो झटपट सुरुवात करून देत आहे. तसेच मधली आणि तळाची फळी विश्वासार्ह नसली, तरी जितेश शर्माने गत सामन्यांतून ती कमीही पूर्ण करण्याचा इरादा दाखवला आहे. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून अर्शदीप सिंग आणि सॅम करन ही जोडी पंजाबसाठी अपरिहार्य आहे. कागिसो रबाडा अद्याप लयीत नाही. मधल्या टप्प्यांत गोलंदाजीची धुरा राहुल चहर सांभाळत आहे.

लखनऊने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५० धावांनी विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अपयश आले. केएल राहुल आणि टीमने पुढच्या दोन सामन्यांमध्ये बाऊंस बॅक केले, हैदराबादला आरामात पराभूत केले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला.

दरम्यान, पंजाब किंग्सने डीएलएस पद्धतीने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर, संघाने राजस्थान रॉयल्सचा पाच धावांनी पराभव केला. पुढील सामन्यात मात्र पंजाबला हरवत हैदराबादने चालू हंगामातील त्यांचा पहिला विजय मिळवला. शिवाय गुरुवारी गत सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब पराभूत झाले आहेत. त्यामुळे सलग दोन पराभवानंतर या सामन्यात पंजाबचे लक्ष्य विजय मिळवण्याचेच असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -