सनरायझर्स दुसऱ्या विजयासाठी उत्सुक
- ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता
- वेळ : संध्याकाळी ७.३० वाजता
कोलकाता (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामातील १९वा सामना ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. रिंकू सिंगच्या धडाकेबाज खेळीने उत्साहित कोलकाता नाइट रायडर्स शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चालू हंगामातील सलग तिसरा विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून असेल. दुसरीकडे कर्णधार मार्करामच्या पुनरागमनानंतर सनरायझर्स हैदराबाद संघानेही मोसमातील पहिला विजय मिळवला असून हीच विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
पंजाब किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर केकेआरने बॅक टू बॅक दोन विजय मिळवले आहेत. यानंतर संघाचे पुढील लक्ष्य सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणारा सामना जिंकून विजयाची हॅटट्रिक करून नितीश अॅण्ड कंपनी गुणतालिकेत पहिले स्थान पटकावण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या शेवटच्या सामन्यात सांघिक कामगिरी करण्यात यश आले. हैदराबादने मागील पंजाबविरुद्धच्या संघात मयंक मार्कंडेयचा समावेश केला. पहिल्याच सामन्यात त्याने २ षटकांत केवळ १५ धावा देत ४ बळी घेतले होते. त्याच्याशिवाय उमरान मलिक आणि मार्को जॉन्सनने २-२ बळी घेतले. फलंदाजी विभागात राहुल त्रिपाठीने गेल्या सामन्यात एसआरएचसाठी शानदार फलंदाजी केली. मात्र हॅरी ब्रूक आणि मयांक अग्रवाल अजून लयीत दिसले नाहीत. अशा स्थितीत या दोघांना केकेआरविरुद्ध मोठी खेळी खेळावी लागणार आहे. मयंक मार्कंडेयकडून संघाला पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद संघ कडवी झुंज देईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर सुनील नरेन फॉर्मात आहे. गेल्या सामन्यात तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. नरेनने ४ षटकांत ३३ धावा देत ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय सुयश शर्मानेही विकेट घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ईडन गार्डन्स मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांमध्ये फक्त एकच सामना गमावला आहे, ज्यात त्याने आरसीबीचा पराभव केला आहे. केकेआर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात रिंकू सिंगने ५ चेंडूंत सलग ५ षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होईल असे वाटत नाही. व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाही फॉर्ममध्ये परतले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये २३ सामने खेळले गेले आहेत. त्यात सनरायझर्सने ८ सामने, तर नाईट रायडर्सने १५ सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमात दोघांमध्ये २ सामने झाले होते. पहिला सामना सनरायझर्सने जिंकला, तर दुसरा सामना नाईट रायडर्सने जिंकला. सनरायझर्स विरुद्ध मागील सामन्यात रसेलने ताबडतोड ४९ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत तो एसआरएचसाठी मोठा धोका ठरू शकतो.
या मोसमातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून मोहालीमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर केकेआरला शार्दूल व रिंकू सिंग असे दोन नवीन नायक सापडले आहेत, ज्यांनी त्यांना पुढील दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. बंगळूरुविरुद्ध शार्दूल ठाकूरने आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी करत संघाला विजय प्राप्त करून दिला आणि यानंतर रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या पाच चेंडूंत षटकार ठोकत आपल्या संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. भरवशाचे नितीश राणा व आंद्रे रसेल यंदाच्या हंगामात विशेष फॉर्मात दिसत नसले तरी त्यांनाही आता जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. तसे झाल्यास हा सामनाही जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याकडे केकेआरचे डोळे लागले आहेत. दरम्यान आयपीएलमधील गत काही सामने शेवटच्या चेंडूवर संपून उत्कंठावर्धक होत आहेत. असाच कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शुक्रवारी होणारा सामना रोमहर्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.