- प्रा. अशोक ढगे
फाशी ही गुन्हेगाराला दिली जाणारी सर्वात कठोर शिक्षा असून दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हासाठीच ती दिली जाते. अर्थात असे असले तरी फाशीची शिक्षा हवी की नको, फाशीने येणारा मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्यामुळे याला काही पर्याय आहे की नाही याविषयी अधूनमधून चर्चा कानी येतच असते. वाढत्या गुन्ह्यांना वचक बसावा आणि एखाद्या गुन्हेगाराचे अस्तित्व समाजासाठी अत्यंत धोकादायक सिद्ध झाल्यास त्याचा सक्तीने देहांत करण्यात यावा, हा विचार समाजाने फार पूर्वीपासूनच मान्य केला आहे. मात्र फाशी देऊन त्याचे जीवन संपवावे की, त्यासाठी अन्य एखादा मार्ग अंगीकारावा हा गंभीर चर्चेचा मुद्दा ठरतो.
याच संदर्भात ऋषी मल्होत्रा यांनी २०१७ मध्ये ‘फाशीची शिक्षा’ क्रूर आणि त्यामुळे घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सन्मानपूर्वक मृत्यूच्या अधिकाराला मूलभूत अधिकाराचा दर्जा द्यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. या याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, फाशी ही अत्यंत वेदनादायक आणि दीर्घ पद्धत असल्यामुळे कमी वेळात फाशीची शिक्षा देण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. आता ही याचिका घटनापीठासमोर सुनावणीसाठी आली असून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड याबाबत काही निर्णायक पावले उचलण्याचा विचार करत आहेत. गुन्हेगाराला दिलेल्या या शिक्षेची अंमलबजावणी करताना फासावर लटकवल्यानंतर लगेच प्राण जात नाहीत तर शरीराची बराच वेळ तडफड होते. त्यामुळेच फाशी दिल्यानंतर अर्ध्या तासाने प्राण गेला की नाही, याचे वैद्यकीय परीक्षण होते. अशा प्रकारे एखाद्या माणसाला शिक्षा करणे अमान्य असल्याने जगात अनेक देशांनी फाशी रद्द केली आहे.
अमेरिकेत २७ राज्यांमध्ये फाशी दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर फाशीच्या पर्यायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फाशीची शिक्षा देण्याचा दुसरा मार्ग असू शकतो का, अशी विचारणा न्यायालयाने सरकारकडे केली असून कमी वेदनादायक असणारी नवी पद्धत अवलंबण्यावर विचार सुरू आहे. न्यायालयाने अॅटर्नी जनरल आर. वेंकटरामन यांना या संदर्भात अभ्यास करण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. यानिमित्ताने फाशीची प्रथा जगात कशी सुरू झाली आणि ती भारतात कशी पोहोचली तसेच फाशीच्या शिक्षेसाठी इतर कोणत्या पद्धती प्रचलित आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. यातील पहिली बाब म्हणजे याचिकाकर्त्यांने केलेल्या युक्तिवादानुसार मृत्युदंडावरील व्यक्तीला मृत घोषित करण्यासाठी ३० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र शूटिंग किंवा विषारी इंजेक्शनच्या सहाय्याने हे काम अवघ्या पाच ते नऊ मिनिटांमध्ये पूर्ण होते. याला भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली असून फाशीची शिक्षा अमानुष आणि अत्यंत क्रूर असल्याचे मान्य केले आहे. या कारणास्तव खंडपीठाने सरकारकडे अभिप्रायही मागवला आहे.
यावेळी आम्हाला एनएलयू, एम्ससह काही मोठ्या रुग्णालयांचा वैज्ञानिक डेटा हवा आहे, असे सरन्यायाधीश सांगतात. फाशी दिल्यानंतर मरायला किती वेळ लागतो, फाशी दिल्याने किती वेदना होतात, फाशीसाठी कोणत्या प्रकारची संसाधने लागतात यासंबंधीची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. गुन्हेगाराला दिल्या गेलेल्या फाशीच्या शिक्षेला आणखी सर्वोत्तम मार्ग आहे का, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या ज्ञानावर आधारित याहून चांगले मानवीय मार्ग कोणते असू शकतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यानुसार यापेक्षा चांगली पद्धत सापडली, तर आम्ही फाशीची शिक्षा देण्यासाठी त्याचा अवलंब करू, असे मत दिसून येत आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की, जगात फाशीची शिक्षा देण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातील एक म्हणजे विषारी इंजेक्शन देणे हा होय. अमेरिका, फिलीपिन्स, चीन, थायलंड, तैवान, मालदीव आणि व्हिएतनाम या देशांमध्ये प्राणघातक इंजेक्शनद्वारे फाशीची शिक्षा दिली जाते. अमेरिकेतील ३१ राज्यांमध्ये अशाच प्राणघातक इंजेक्शनद्वारे मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. यामध्ये कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, नेवाडा, टेक्सास आणि ओहायो या राज्यांचा समावेश आहे. त्यातही १९७७ मध्ये प्राणघातक इंजेक्शनद्वारे फाशीची शिक्षा देणारे ओक्लाहोमा हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
या शिक्षेची अंमलबजावणी करताना संबंधित गुन्हेगाराला स्ट्रेचरवर झोपवले जाते. मग तज्ज्ञांची एक टीम या व्यक्तीच्या त्वचेवर हृदय मॉनिटर्स ठेवते. त्यानंतर तिला दोन विषारी इंजेक्शन्स दिली जातात. यापैकी एक बॅकअपसाठी असते. ही इंजेक्शन गुन्हेगाराच्या हाताला टोचली जातात. या विषारी इंजेक्शनमधील द्रव्यांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर मज्जासंस्था लगेचच काम करणे थांबवते. यामुळे हृदय आणि फुप्फुस यांसारखे स्नायू काम करणे बंद करतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. कॅलिफोर्नियातील सॅन क्वेंटिन स्टेट जेलमधील एका खोलीत फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांना अशा प्रकारचे प्राणघातक इंजेक्शन दिले जाते. इतिहासात डोकावून बघायचे तर १८८८ मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा न्यूयॉर्कने फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी इलेक्ट्रिक खुर्ची बनवली. अमेरिकेत विजेचा धक्का देऊन फाशीची शिक्षा देणे ही केवळ दुय्यम पद्धत म्हणून वापरली जाते. यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून खुर्चीवर बसवून बांधले जाते. या अवस्थेत संबंधिताचे हातपायही बांधले जातात. नंतर डोक्यावर इलेक्ट्रोड असणारी धातूची टोपी घातली जाते, तर पायांवर दुसरा इलेक्ट्रोड ठेवला जातो. कारागृह वॉर्डनच्या सूचनेवरून निरीक्षण कक्षातून वीजपुरवठा सुरू केला जातो. ३० सेकंदांसाठी ५०० ते २,००० व्होल्टचा वीजपुरवठा दिला जातो. अशा प्रकारे व्यक्ती तत्काळ मृत होते. काही काळ शरीर थंड होण्यासाठी सोडल्यानंतर डॉक्टर कैद्याची तपासणी करतात. यानंतरही हृदयाचे ठोके सुरू असतील तर पुन्हा एकदा वीजप्रवाह सुरू केला जातो.
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्य कारागृहात अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक खुर्चीवर बसवून कैद्यांना विजेचा झटका देऊन शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. मानवी मज्जासंस्था अतिशय हलक्या विद्युत लहरींसह कार्य करते; परंतु एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून उच्च व्होल्टेज जातो तेव्हा मेंदू, हृदयाचे ठोके आणि फुप्फुस यासारखे सर्व अवयव विद्युत नाडीसह काम करणे थांबवतात. यामुळे व्यक्तीचा तत्काळ मृत्यू होतो. याखेरीज विषारी गॅस चेंबरमध्ये कोंडूनही गुन्हेगाराला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. अमेरिकेच्या सात राज्यांमध्ये प्राणघातक इंजेक्शनला पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. १९२४ मध्ये नेवाडा राज्यात सर्वप्रथम अशा प्रकारे शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये शिक्षा द्यावयाच्या व्यक्तीला एअरटाईट चेंबरमध्ये खुर्चीला बांधले जाते आणि खुर्चीखाली सल्फ्युरिक अॅसिडची बादली ठेवली जाते. या पूर्णपणे सीलबंद चेंबरमध्ये तुरुंगाच्या वॉर्डनच्या सांगण्यावरून क्रिस्टलाइज्ड सोडियम सायनाइड सल्फ्युरिक अॅसिडच्या बादलीत सोडले जाते. या दोघांच्या प्रतिक्रियेतून हायड्रोजन सायनाइड वायू तयार होतो. कैद्याला एक लांबलचक स्टेथास्कोप जोडलेला असतो. त्यामुळे डॉक्टरांनी चेंबरच्या बाहेरून तपासणी केली असता ती व्यक्ती मृत्यू झाल्याचे समजते. अशा प्रकारे काही क्षणांमध्ये या शिक्षेची अंमलबजावणी करता येते.
या पर्यायांचा अवलंब केल्यास फासावर लटकवल्यानंतर होतात त्यापेक्षा कमी वेदना होतात आणि जीव लवकर जातो. शेवटी फाशी देणे म्हणजे सूड उगवणे नसते, तर गुन्हेगार सुधारणार नसल्याची शंभर टक्के खात्री पटल्यानंतर शिक्षेचा अखेरचा पर्याय असतो. काही गुन्हे थंड डोक्याने आणि क्रौर्याची परिसीमा गाठत केलेले असतात की, ते करणाऱ्या गुन्हेगारांना जगण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नसतो. त्यांच्या जिवंत राहण्याने समाजाला धोका असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच पूर्ण विचारांती आणि अन्य सर्व पर्याय थकल्यानंतर ही अंतिम शिक्षा ठोठावली जाते. मात्र तीदेखील अमानवी नसावी, या हेतूने पुनर्विचार सुरू आहे.