नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान नाशिक जिल्ह्याचे झाले आहे. गेल्या सहा दिवसात नाशिकमध्ये २३ हजार ६९९ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून ४६७ गावातील ३६ हजार ४४२ शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीत सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा सडला आहे. तब्बल १८ हजार ३४६ हेक्टवरील कांदा भुईसपाट झाला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्या खालोखाल भाजीपाला तसेच डाळिंब, द्राक्ष आणि आंबा या फळांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातीलपेठ तालुक्यात आमलोण, अभेटी, खर्डापाडा, शेवखंडी, अभेटी, घनशेत, कुळवंडी आदी परिसराला गारपीटीने झोडपून काढलं. साधारण ७० ते ८० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. अनेक घरांचे, कुणाच्या पडवीचे, शाळेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचा इशारा कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढत आहे.