Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमुंबईकरांचे आरोग्य सुधारतेय...

मुंबईकरांचे आरोग्य सुधारतेय…

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

दोनच दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य दिन विशेष साजरा करण्यात आला. कोरोनानंतर आरोग्याकडे लक्ष देण्याचे महत्त्व सर्वांनाच कळून चुकले आहे तसेच त्यातील उणिवाही सर्वांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे नेहमीच दुर्लक्षित झालेल्या आरोग्य या विषयाकडे सर्वांनीच आता गांभीर्याने लक्ष दिलेले दिसते. मुंबई महापालिका ही त्यास अपवाद नाही. मुंबई महापालिकेच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा देशात वाखाणला जातो. महापालिकेची प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमधून घडलेल्या वैद्यकीय पिढ्या देशातच नव्हे तर जगभरात रुग्णांची सेवा करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी १२ टक्के खर्च हा आरोग्यासाठी केला जातो. मुंबई महानगरपालिकेचा एकूण अर्थसंकल्प हा ७५ हजार कोटी रु. असून त्यापैकी यंदा सहा हजार तीनशे नऊ कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

कोरोना काळात झालेल्या वाताहतीनंतर मुंबई महापालिकेने आरोग्य विषयाकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेची उपनगरीय रुग्णालये देखील वाटचाल करणार आहेत. महापालिकेच्या सध्याच्या एकूण १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी निम्मे म्हणजे ८ रुग्णालयांचा पुनर्विकास, विस्तारीकरण करण्याची कामे अतिशय वेगाने सुरू असून त्यासोबत दोन नवीन उपनगरीय रुग्णालये देखील आकाराला येत आहेत. यामुळे उपनगरीय रुग्णालय सेवेतील रुग्णशय्यांची संख्या तर वाढणार आहेच, सोबत सुपरस्पेशालिटी सेवा देखील मिळणार असून त्यासाठी थेट १०९९ इतक्या रुग्णशय्या उपलब्ध होणार आहेत.

कोरोनानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आरोग्य यंत्रणांना आणखी मजबूत बनवण्याचे धोरण आखले होते. त्यातच त्याचाच एक भाग म्हणून कोविड कालावधीनंतर, मुंबई महापालिका प्रशासनाने आरोग्य सेवेवर अतिशय बारीक लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य सेवेचे सर्व स्तरांवर बळकटीकरण करण्यात येत आहे. महापालिकेची प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य सेवा यांच्याप्रमाणेच उपनगरीय रुग्णालयांमधून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कारण उपनगरांमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना प्रमुख आरोग्य सेवा त्यांच्या नजीकच्या परिसरात मिळाव्यात, हा यामागचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून, महापालिकेच्या उपनगरातील १६ पैकी ८ रुग्णालयांचा पुनर्विकास आणि विस्तारीकरण करून रुग्णशय्या क्षमतावाढ करण्यात येत आहे. दोन नवीन रुग्णालये बांधली जात आहेत. यात पश्चिम उपनगरामध्ये के. बी. भाभा रुग्णालय (वांद्रे ५३.६० कोटी), सिद्धार्थ रुग्णालय (गोरेगाव), भगवती रुग्णालय (बोरिवली ११० कोटी), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (बोरिवली, पूर्व), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय (कांदिवली ७५ कोटी) या पाच रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच पूर्व उपनगरामध्ये पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय (गोवंडी ११० कोटी), क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालय (विक्रोळी), श्रीमती एम. टी. अग्रवाल रुग्णालय (मुलुंड ९५ कोटी) या तीन रुग्णालयांचा पुनर्विकास, विस्तारीकरण करण्यात येत आहे, तर भांडुप मल्टीस्पेशालिटी रुग्णालय (नाहूर ६० कोटी) आणि संघर्ष नगर रुग्णालय (चांदिवली ३५ कोटी) ही दोन नवीन रुग्णालये आकाराला येत आहेत. या दहा रुग्णालयांचा विचार करता, त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर, त्यांची सध्याची रुग्णशय्या क्षमता १ हजार ४०५ ही वाढून एकूण ३ हजार ९६४ इतकी होईल. म्हणजेच नवीन २ हजार ५५९ रुग्णशय्यांची भर पडणार आहे.

सर्व १६ उपनगरीय रुग्णालयांची सध्याची असलेली एकूण रुग्णशय्या क्षमता ३ हजार ५८४ वरून तब्बल २ हजार ५५९ रुग्णशय्यांनी वाढणार आहे, म्हणजेच सर्व उपनगरीय रुग्णालयांची मिळून एकूण रुग्णशय्या क्षमता ही ६ हजार १४३ इतकी होणार आहे. या पुनर्विकास, विस्तारीकरण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयांना सक्षम आरोग्य सेवा पुरवता येईल. कारण या प्रकल्पांमधून संख्यात्मक व गुणात्मक भर पडणार आहे.उपनगरीय रुग्णालय मिळून सध्या ३ हजार ५८४ इतकी रुग्णशय्या क्षमता आहे. त्यात दोन नवीन रुग्णालये, त्याचप्रमाणे एकूण २ हजार ५५९ रुग्णशय्यांची भर पडून ही संख्या १८ उपनगरीय रुग्णालये व ६ हजार १४३ रुग्णशय्या इतकी संख्या होणार आहे. उपनगरीय रुग्णालयात सध्या ६ हजार ७९० कर्मचारी आहेत. त्यामध्ये सुमारे ५ हजार ५०० इतक्या नव्या कर्मचाऱ्यांची भर पडून ही संख्या १२ हजार ९९० इतकी होईल. उपनगरीय रुग्णालयांमध्ये आयसीयू, एनआयसीयू आणि आयपीसीयू रुग्णशय्यांची संख्या सध्या २४९ इतकी आहे. या रुग्णशय्यांमध्ये ४५६ इतकी भर पडत ही संख्या ७०५ इतकी होईल. उपनगरीय रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर) आणि मॉड्युलर शस्त्रक्रिया विभाग (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) अंतर्गत सध्या एकूण ८९ कक्ष आहेत. यामध्ये १३१ कक्षांची भर पडतानाच ही संख्या आगामी कालावधीत २१२ वर पोहोचेल.

उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध आरोग्याच्या सुविधा असल्या तरी सध्या सुपरस्पेशालिटी सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र आता ही कमतरता दूर होणार असून आगामी काळात तब्बल १ हजार ९९ सुपरस्पेशालिटी रुग्णशय्या उपलब्ध होतील. महापालिकेच्या आरोग्य सेवांमधील ही सर्वात मोठी झेप असणार आहे. उपनगरीय रुग्णालयांमधून देण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णशय्येअंतर्गत कार्डिओलॉजी, कार्डिओ व्हॅस्कुलर थोरॅसिक सर्जरी, गॅस्ट्रो – एन्टेरोलॉजी मेडिसीन अॅण्ड सर्जरी, नेफ्रॉलॉजी, डायलेसिस, युरोसर्जरी, हेमॅटोलॉजी अॅण्ड हेमॅटो ऑन्कॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बर्न्स, रेडिओथेरपी, केमोथेरपी, ऑन्कोसर्जरी, पॅडिएट्रिक सर्जरी, एन्डोक्रिनोली आदी उपचारांसाठी रुग्णशय्या उपलब्ध होतील. दुसरीकडे मुंबईकरांच्या आरोग्य सेवेमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची एकूण संख्या वाढून आता १५१ झाली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन ४४ आपला दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, फिजिओथेरपी व नेत्र चिकित्सा सुविधा, मानसिक विकारांची पडताळणी करणारी मनशक्ती क्लिनिक सेवा आणि १८ वर्षं वयावरील नागरिकांची दंत तपासणी असे वेगवेगळे उपक्रम देखील सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेमध्ये १०७ दवाखाने कार्यान्वित आहेत. यामध्ये संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २४ पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्र आहेत, तर १२७ दवाखाने आहेत, येत्या दोन महिन्यांमध्ये आपला दवाखानाच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि नेत्ररोग सेवा देखील उपलब्ध होणार आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत महापालिकेकडून आता प्राथमिक आरोग्य स्तरावर मनशक्ती क्लिनिक ही सुविधा मुंबईकरांना ७ एप्रिल २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत ५०० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्य सेवा-सुविधा पुरवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महापालिकेचे सर्व दवाखाने त्याचप्रमाणे आपला दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या मानसिक विकारांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील उपचारांची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या नजीकच्या रुग्णालयांत किंवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाठवून उपचार पुरवले जातील. पॉलिक्लिनिकमध्येही लवकरच मानसोपचार सेवा उपलब्ध होणार आहेत.

जागतिक पातळीवर मौखिक कर्करोग ही मोठी समस्या आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप सर्वेक्षण २०२१’ नुसार १३ टक्के मुंबईकर तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये पुरुषांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे मौखिक आरोग्याशी संबंधित तपासणी व निदान वेळीच केल्यास रुग्ण मृत्यू दर कमी करणे शक्य आहे. हा मुद्दा नजरेसमोर ठेवून, महापालिकेचे मुंबईतील ३० क्लिनिक आणि १५ पॉलिक्लिनिकमध्ये १८ वर्षांवरील सर्वांची दंतवैद्यांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, घसा खवखवणे, तोंडात किंवा जिभेवर पांढरे डाग आणि तोंड उघडण्यात अडचण असलेल्यांची दंतचिकित्सकामार्फत वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. यामध्ये संशयित रुग्णांना पुढील निदान, तपासणी व उपचारांसाठी महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये पाठवले जाईल. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत झालेली दर्जात्मक सुधारणा पाहता व खासगी रुग्णालयांनी कोरोना काळात केलेली लुटालूट पाहता आता सर्वसामान्यांचाही ओढा आता मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांकडे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे मुंबईकर नागरिकांना आरोग्याच्या सुविधा वेळोवेळी व सहजतेने तसेच कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय उपलब्ध व्हाव्यात, हे या सर्व पुढाकारांचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. मुंबई या शहरात देशभरातून माणसे रोजीरोटीसाठी येतात व राहतात. मुंबई महापालिकेच्या दवाखान्यात व रुग्णालयात स्थानिकांपेक्षा याच बाहेरील लोकांची जास्त गर्दी दिसून येते मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेवेस मुंबईकरांचा कररुपी जमा केलेला पैसा वापरण्यात येतो हीच विसंगती लक्षात घेता आता केंद्र सरकारनेही मुंबई महापालिकेला सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी भरीव आर्थिक मदत केली पाहिजे . तरच मुंबई महापालिकेला हा एवढा मोठा डोलारा उभारण्यात यश मिळेल यात शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -