Tuesday, May 6, 2025

क्रीडाIPL 2025

लखनऊचा बंगळूरुवर रोमहर्षक विजय

लखनऊचा बंगळूरुवर रोमहर्षक विजय

पुरन-स्टॉयनीसची वादळी खेळी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : विस्फोटकता म्हणजे काय असते? याचा प्रत्यय लखनऊ आणि बंगळूरु यांच्यातील सामन्यादरम्यान सोमवारी चाहत्यांना आला. निकेलस पुरनच्या १९ चेंडूंत ६२ धावा आणि मार्कस स्टॉयनीसच्या ३० चेंडूंत ६५ धावा या जोरावर बंगळूरुने उभारलेल्या डोंगरासारख्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत लखनऊने त्यांच्या घशातील घास हिरावून घेतला. अत्यंत रोमहर्षक अशा या विजयामुळे लखनऊने क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. अवघ्या २३ चेंडूंवर त्यांचे ३ फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे आरसीबीचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. परंतु मार्कस स्टॉयनीस आणि निकेलस पुरन या जोडगोळीने तुफानी या शब्दाला लाजवेल अशी फटकेबाजी केली. पुरनने तर अवघ्या १५ चेंडूंत आयपीएल २०२३मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. पुरनने ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १९ चेंडूंत ६२ धावांची वेगवान खेळी खेळली. स्टॉयनीसनेही त्याला तोडीची साथ दिली. स्टॉयनीसने ३० चेंडूंत ६५ धावा चोपल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ५ षटकार मारले. लखनऊने विजयी लक्ष्य ९ फलंदाजांच्या बदल्यात शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. आरसीबीच्या मोहम्मद सिराजने लक्षवेधी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २२ धावा देत ३ बळी मिळवले. वायने पारनेलनेही ३ विकेट घेतल्या. परंतु त्याला धावा रोखता आल्या नाहीत.

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या तुफानी खेळीपुढे लखनऊची दाणादाण उडाली. आरसीबीने निर्धारित २० षटकांत दोन विकेट गमावून २१२ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी केली. लखनऊकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शतकी भागिदारी केली. विराट कोहलीने ४४ चेंडूंत ६६ धावांचा पाऊस पाडला. या खेळीत कोहलीने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. विराट कोहलीने फाफसोबत ९६ धावांची सलामीला भागिदारी केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी वादळी खेळी केली.

विराट कोहलीनंतर फाफ डु प्लेसिस यानेही अर्धशतकी खेळी केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने अवघ्या ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. फाफ डु प्लेसिसने ४६ चेंडूंत नाबाद ७९ धावांची खेळी केली. या खेळीत फाफने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. ग्लेन मॅक्सवेल यानेही वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेलने २९ चेंडूंत ५९ धावा तडकावल्या. या खेळीत मॅक्सवेलने ६ षटकार आणि तीन चौकार लगावले. या तिकडीच्या वादळी खेळीमुळे आरसीबीने २०० धावांचा पल्ला पार केला. लखनऊकडून पर्पल कॅपधारक मार्क वूड आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Comments
Add Comment