- सेवाव्रती: शिबानी जोशी
मुंबई शहर आज जितकं प्रचंड विस्तारलं आहे, तितकं १९५०च्या दशकात विस्तारलेलं नव्हतं. शीव म्हणजे सायन, माहीमपर्यंतच खरी मूळ मुंबई व्यापली होती. त्यापुढे, तर शेती होत असे. शीव म्हणजेच सायनला लागूनच चेंबूर भाग आहे. तिथे तर गावठाण होते; परंतु हळूहळू वस्ती वाढू लागली, काही मूळ मराठी घर ही होती. त्यामुळे लोकवस्ती वाढल्यावर सर्वच गरजांची पूर्तता होणे आवश्यक ठरते. मराठी माध्यमाच्या चांगल्या दर्जेदार शाळेची ही चेंबूर भागामध्ये गरज निर्माण झाली होती. या ठिकाणाहून शिक्षणासाठी मुलं अगदी दादरपर्यंतच्या शाळेत जात असत. ही गरज अर्थातच प्रथम महिलांच्या लक्षात आली. यातील काही महिला संघ विचारी होत्या. या समाज कार्य करणाऱ्या महिलांनी मुलांची प्राथमिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन आधी शिशू वर्ग आणि नंतर पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा सुरू केली.
१९५२ साली विद्येची कास धरणाऱ्या सुधाताई आम्बरे, इंदिराबाई सांडू, सुनंदा चाफेकर, विजया पंडित आणि काही भगिनी समाजातील महिलांकडून या सरस्वतीच्या मंदिराची स्थापना केली गेली. ७० वर्षे येथे विद्येचा नंदादीप तेवतोय. गरीब विद्यार्थ्यांची श्रीमंत नावलौकिक असलेली चौथीपर्यंतची मराठी माध्यमाची शाळा त्याचेच नाव बालविकास संघ अशी प्राथमिक शाळेची ख्याती होती; परंतु मराठी माध्यमांमध्ये मुलांना घालण्याचं प्रमाण हळूहळू खूप कमी होत गेलं. त्यातच जागे अभावी फक्त चौथीपर्यंतचे शाळा असल्यामुळे विद्यार्थी गळती गेल्या दहा वर्षांत सुरू झाली; परंतु तरीही पन्नास वर्षांहून अधिक काळ चेंबूर भागात सांस्कृतिक आणि सामाजिक काम तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू ठेवून व्यवस्थापनाने बालविकास संघाचं काम अधिक जोमाने सुरू ठेवलं आहे. बालविकास संघाच उद्दिष्ट केवळ प्राथमिक शाळा चालवणे हे नव्हते, तर सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये सुद्धा चेंबूर भागात आपण वाटा उचलावा, यासाठी खूप नवनवीन कल्पना संघ गेले पन्नास वर्षे अमलात आणत आहे. बालविकास संघाचे ४०० सभासद आहेत.
सरस्वती ही विद्येबरोबर कलेची पण देवता आहे. कला हे माणसाचे माणूसपण जपणारे आणि त्याच्या मनाची मशागत करणारे एक प्रभावी माध्यम आहे. कला ही माणूस घडविण्याचे काम करीत असते, म्हणूनच चित्रकला, बुद्धिबळ, योग वर्ग, संगीत म्हणजे गायन, वादन, नृत्य असे सर्व वर्ग येथे संध्याकाळी चालवले जातात. संगीत ही ईश्वर सेवा आहे आणि गेल्या पन्नास वर्षांत येथे संगीतप्रेमींना अनेक मेजवान्या मिळालेल्या आहेत. अगदी पंडित जसराज, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, देवकी पंडित, कलापिनी कोमकल्ली अशा थोर गायकांच्या तर सामाजिक कार्यात काम करणाऱ्या प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ, बाबासाहेब पुरंदरे यांच्या पदस्पर्शाने बालविकासची वास्तू पवित्र झालेली आहे.
“वाचाल तर वाचाल” असं आपल्याकडे म्हटलं जाते. त्याला अनुसरून चेंबूरमधले सुप्रसिद्ध डॉक्टर करकरे यांनी वाचनालय सुरू करायला आर्थिक सहकार्य केलं. त्याशिवाय दर वर्षी नवनवीन पुस्तक घ्यायलाही ते आर्थिक मदत करत असतात. त्यांच्या सहकार्यांने इथे अद्ययावत असे वाचनालय सुरू आहे. इथे नियमित रा. स्व. संघाची शाखा भरते तसेच राष्ट्रसेविका समितीची महिलांची शाखाही इथे भरते. परिसंवाद, संत महोत्सव, चातुर्मास उपक्रम, संगीताचे प्रातःस्वर आणि सायंस्वर तसेच, दिवाळी पहाट हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आणि व्याख्यानमाला, रक्तदान शिबीर अशा कार्यक्रमाचे दरवर्षी नेटके आयोजन करण्यात येते. आपल्याकडे भाद्रपद महिन्यात आपण पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पितरांची आठवण काढतो; परंतु ज्यांना हे जमत नाही त्यांच्यासाठी एक आगळा-वेगळा पित्र वंदना हा कार्यक्रम करण्यात येतो. या कार्यक्रमात चिन्मय मिशनचे स्वामीजी गीतेतील एका अध्यायावर मराठीत संध्याकाळी निरुपण करतात आणि सकाळी वेगवेगळ्या विषयांवर प्रवचन दिले जाते. पित्रवंदना या कार्यक्रमाचा उद्देश हा की, जगातील सर्व संत- महात्म्यापासून ते शास्त्रज्ञापर्यंत, सामान्य देशभक्तांपासून ते जवानांपर्यंत तसेच या भू-तलावरील सर्व प्राणी, पक्षी आणि वनस्पती ज्यांचे निधन झाले आहे, त्यांना या निमित्ताने गीताज्ञानरूपी तर्पण-अर्पण करण्यात येते.
व्याख्यानमालेतील शेवटच्या पुष्पात गेली काही वर्षे महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आमंत्रित करण्यात येते आणि पीपीटीच्या सहाय्याने त्यांचे विविध ठिकाणी चालू असलेले सामाजिक कार्य चेंबूरकरांना पाहता येते व चेंबूरवासीयांतर्फे त्या संस्थांना भरीव देणग्याही देण्यात येतात. राज्यातल्या अनेक स्वयंसेवी संस्थांना आमंत्रित करून त्यांना मदत झाली आहे. या वर्षी सुमेधाताई चिथडे आणि श्री चिथडे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत सियाचीन येथे सैनिकांकरिता ऑक्सिजन प्लांट लावलेला आहे. किती कठीण परिस्थितीत आपले जवान काम करीत असतात याचे विस्तृत वर्णन केले. यावेळी चेंबूरवासीयांतर्फे त्यांना यथाशक्ती देणग्या देण्यात आल्या.
गेली ४३ वर्षे बालविकास संघाच्या सभागृहात खडके प्रतिष्ठानमार्फत ४ दिवसांचा “‘संगीत सम्राट अल्लादीया खान संगीत महोत्सव” साजरा करण्यात येतो. त्या कार्यक्रमात भारतातील दिग्गज गायक व वादक आपली कला सादर करतात. तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी वसंतराव उपाध्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे कुटुंबीय, बालविकास संघ व चेंबूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने “सृजनशील पत्रकारिता पुरस्कार” दर वर्षी एका पत्रकाराला देण्यात येतो. आतापर्यंत दिनकर गांगल, मृणालिनी नानिवडेकर अशा पत्रकारांना हे पुरस्कार दिले आहेत.
बालविकासच वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच चेंबूरकरांना सांस्कृतिक आणि सामाजिक मेजवानी देता यावी, म्हणून सर्वच कार्यक्रम विनामूल्य असतात. सर्व कार्यकर्ते संघ आणि राष्ट्रीय विचाराचे असल्यामुळे सर्व कार्यक्रम शिस्तीत आणि सुनियोजितरित्या वेळेवर सुरू करून वेळेवर संपवण्याकडे संस्थेचा कटाक्ष असतो, असं संस्थेचे कार्यकारिणी सदस्य नितीन कराडकर यांनी सांगितले. महिलांना तसेच वृद्धांना उपयोगी पडतील, असे अनेक प्रशिक्षण वर्ग इथे चालतात, त्याचबरोबर यापुढे स्पर्धा परीक्षांना प्रशिक्षण देणारे दर्जेदार वर्ग सुरू करण्याचा संस्थेचा भविष्यात मनोदय आहे.