पुणे : लोणंद-नीरा रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिली. यात पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
ओकांर संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिपंरे खुर्द ता. पुरंधर) असे या अपघात ठार झालेल्या तीन मित्रांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणंद-निरा रोडवर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल ४१५८ ही निरेकडून लोणंदला जात होती.
यावेळी वरील तिघे हे एका मोटरसायकलवरून जात होते. या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.
दरम्यान, थोपटेवाडी येथे ग्रामदैवत असलेल्या हनुमानाचा यात्रा उत्सव सुरू होता. मात्र मुलं गेल्याची खबर येताच संपूर्ण यात्रेवर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर यात्रा थांबवण्यात आली.