- शिव प्रकाश
देशात राष्ट्रवाद, गरिबांचे कल्याण, भारताच्या सांस्कृतिक मूल्यांच्या संरक्षण व पारदर्शक वर्तनासह काँग्रेसपुढे पर्याय उभा करण्याच्या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना झाली. भारतीय राजकारणातील मोलाचे नेते विद्वान पंडित दीनदयाल उपाध्याय ह्यांनी ‘एकात्मिक मानवतावादा’च्या पायावर जनसंघ वाढवण्याचे काम केले. स्थापनेपासूनच वाढीच्या दृष्टीने अग्रेसर असलेला जनसंघ लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता पक्षात विलीन झाला.
६ एप्रिल १९८० रोजी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ या अटल घोषणेसह, भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर भारतीय जनता पार्टी नावाच्या एका नवीन पक्षाचा उदय झाला. भारतीय राजकारणातील सूर्य भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या पक्षाचे नेते होते. हीच भारतीय जनता पार्टी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, १८ कोटी सदस्यांसह, जगातील सर्वांत मोठा पक्ष ठरली आहे. देशातील अनेक राज्यांत तसेच केंद्रात भारताचे नेतृत्व हा पक्ष करत आहे. आपले राष्ट्रवादी विचार, गरिबांच्या कल्याणाची धोरणे, प्रखर आणि प्रामाणिक नेतृत्वामुळे हा पक्ष देशासाठी वरदान ठरला आहे. राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रवादाची स्थापना करतानाच राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा विचार भाजपने स्थापनेपासूनच केला आहे. स्थानिक नेत्यांपासून राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी लोकशाहीचे पालन करून देशात लोकशाहीचे संरक्षण करणे हा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. समाजात कोणत्याही भेदभावाशिवाय विकेंद्रित अर्थव्यवस्थेचे पालन करून गरिबांची उन्नती करणे हे पक्षापुढील उद्दिष्ट ठरले. कोणत्याही भेदभावाशिवाय आपापल्या प्रार्थना पद्धतींचे पालन करून देशाच्या विकासात सहकार्य करणे आणि देशाला सर्वोच्च प्राधान्य या तत्त्वाचे पालन करून शुद्ध वर्तनाने देशातील नागरिकांची सेवा करणे हे भाजपचे ध्येय ठरले.
आपला देश वैविध्याने युक्त आहे. भाषा, जाती, प्रार्थनेच्या पद्धती, खाद्यसंस्कृती, रंग-रूप आणि पोशाख या सर्वच बाबतीत आपण एकमेकांहून भिन्न आहोत. उथळ विचार करणाऱ्यांनी तसेच परदेशी कारस्थानांच्या प्रभावाखालील लोकांनी या वैविध्याच्या आधारावरच राजकारण केले. हे एक राष्ट्र आहे, असे न मानता जातींमधील संघर्ष, आदिवासी व शहरी नागरिक यांच्यातील संघर्ष, सवर्ण व दलितांमधील संघर्ष यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा तसेच मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. भाजपने मात्र सुरुवातीपासून एक राष्ट्र, एक जनता, एक संस्कृती या तत्त्वांवर राजकारण केले आहे. वैविध्य आपल्या देशाचा कमकुवतपणा नव्हे, तर सौंदर्य आहे. ईशान्य भारतानेही भाजपला निवडणुकीत जिंकवून देऊन हेच दाखवून दिले आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, ‘न तो अब उत्तर पूर्वांचल दिल्ली से दूर है, और न ही दिल से दूर है’ बंद, संप, दहशतवाद हे सर्व संपून आता ईशान्य भारताचा विकास होत आहे. काश्मीर ३७०व्या कलमातून मुक्त होऊन केशराचा सुवास घेऊ लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या अनोख्या पुढाकारामुळे काशी तमिळ संगमयने एकात्मकतेचा विश्वास अधिक गाढ केला आहे. वेरूवाडी, कच्छ, काश्मीर यांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजप नेतृत्वाने राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जनतेमध्ये जागवला आहे. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यांपासून जगातील दूरवरच्या ठिकाणांपर्यंत लाखो लोक ‘भारत माता की जय’ असे म्हणत देशभक्तीचा स्वर आळवत आहेत.
देशाच्या राजकारणाच्या पटावर सक्रिय असलेले पक्ष आपली अंतर्गत लोकशाही गमावत आहेत. एकतर निवडणूक प्रक्रिया होतच नाही किंवा झाली तरी दाखवण्यापुरती होते. काँग्रेससह देशातले सर्व प्रादेशिक पक्ष घराणेशाहीच्या संकटाने ग्रासलेले आहेत. म्हणूनच या पक्षांतील प्रतिभावान नेत्यांचे कर्तृत्व खुंटल्यासारखे झाल्यामुळे ते पक्ष सोडून जात आहेत किंवा निष्क्रिय झाले आहेत. जे आपल्या पक्षात लोकशाहीचे पालन करू शकत नाहीत, त्यांच्याकडून देशाच्या लोकशाहीच्या संरक्षणाची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. काँग्रेसने तर देशावर आणीबाणी लादून लोकशाही चिरडून टाकण्याचेच काम केले आहे. घराणेशाहीमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, ही भीती आपल्या घटनाकारांच्या मनातही होती. भाजपने आपल्या राज्यघटनेचे पालन करून निश्चित कालावधीत स्थानिक नेत्यांपासून ते राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी प्रक्रिया आणून देशातील लोकशाहीच्या संरक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपल्या पक्षाचे अस्तित्व संपवणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. अन्य पक्ष, निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि न्यायसंस्थेबाबत प्रश्न उभे करण्याचे काम करत आहेत. लोकशाही संस्थांशी आदराचे वर्तन राखल्यामुळे, भारतीय जनतेच्या मनातील, भाजप नेतृत्वाबद्दलचा विश्वास वाढला आहे.
देशाचा विकास स्वदेशी व विकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या आधारे व्हावा, असे गांधीजींनी आर्थिक चिंतनातून मांडले होते. ग्रामपंचायत निवडणुका हा स्वराज्याचा आधार होता. गरिबांचे कल्याण हा सरकारच्या यशाचा पाया आहे, असे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे मत होते. स्वदेशी, साधेपणा, विकेंद्रित अर्थव्यवस्था यांच्या जोरावरच आपण आर्थिक प्रगती करू शकू, हा विचार त्यांनी मांडला. शेतकऱ्याच्या शेताला पाणी, रोजगार हे अर्थव्यवस्थेतील पायाभूत घटक होते. ‘उत्पादनात वाढ, खर्चाबाबत संयम’ हे तत्त्व त्यांनीच घालून दिले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वर्णिम चतुर्भुज योजना, नदीजोड प्रकल्प, सर्व शिक्षण अभियान या योजना गरिबांची उन्नती तसेच देशाच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने अनुकरण करण्याजोग्या योजना आहेत. हीच परंपरा अनेक पटींनी पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना, शेतीसाठी जलसिंचन योजना आणल्या. त्यांचा आत्मनिर्भरतेचा विचार हा गांधीजी आणि दीनदयाळजींच्या कल्पनेचेच मूर्त स्वरूप आहे. यात गरिबांचा विश्वास कमावून देशाच्या आर्थिक क्षेत्रात तीव्र वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतीय संस्कृती आणि भारतीय समाजावर हल्ला चढवणे ही राजकीय पक्षांची परंपरा झाली होती. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले नेते धर्मनिरपेक्षतेचे पांघरूण घेऊन नागरिकांना शिकवण देत होते. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर श्रीरामांचे अस्तित्वच नाकारत होते. समाज दु:खी मनाने या पक्षांचे उद्योग बघत होता. आम्ही विकासात कोणताही पक्षपात न करता सर्वांना न्याय देऊ, असे भाजपने म्हटले. याच विचाराच्या माध्यमातून गरिबांच्या कल्याणाच्या योजनांमधून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाचा विक्रमही भाजप सरकारांनीच केला आहे. आपल्या सांस्कृतिक मानबिंदूंच्या गौरवासाठी भाजपने सर्वांसोबत काम केले आहे. आज भारताची सांस्कृतिक गौरवस्थाने सूर्यासारखी उजळ आहेत. चोरलेल्या मूर्ती जगातून परत आणण्याचे काम असो किंवा श्रीराम मंदिराचा कॉरोडॉर असो, केदारनाथचे सौंदर्यीकरण असो किंवा महाकाल लोकनिर्मिती सर्व गौरवगाथा जिवंत झाल्या आहेत. सुफी संतांशी संपर्क, बोहरा तसेच पसमांदा मुस्लीम समाजाच्या विकासासाठी योजना, ‘वन डे वन चर्च’सारख्या योजना यांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वधर्मसमभाव व्यक्त होत आहे.
२०१४ सालापूर्वी दररोज वर्तमानपत्रांमध्ये भ्रष्टाचाराच्याच बातम्या येत होत्या. राजकीय नेते व राजकीय पक्ष भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले होते. सरकारी संपत्ती आपल्या वैयक्तिक वापरासाठीच आहे, हा विचार पुढे येत होता. २०१४ सालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘न खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा करून राजकारणात पारदर्शकतेचे उदाहरण निर्माण केले. ‘देश प्रथम’ तत्त्वाचे पालन करणारे अनेक राजकीय कार्यकर्ते ही भाजपचीच देणगी आहे. या कार्यकर्त्यांनी सत्ता मिळवूनही आपला प्रामाणिकपणा जपला आहे. राजकारणात सर्व काही चालते या तत्त्वाचे समर्थन जेथे केले जात होते, तेथे आज प्रामाणिकपणाने सरकार चालवले जाऊ शकते आणि पुन्हाही स्थापन केले जाऊ शकते, हे भाजपच्या नेतृत्वाने सिद्ध केले आहे. २०१४ सालापूर्वी जनतेला भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत होते. आता भ्रष्टाचारी स्वत:चा बचावासाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत. कारण राजकारणातही जीवनमूल्ये जिवंत असल्याचा विश्वास जनतेच्या मनात आहे. देशाचे स्वातंत्र्य व विकासामध्ये सर्वांचे योगदान आहे. या गृहीतकावर सर्व महापुरुषांचा सन्मान, अणुस्फोट तसेच संरक्षण क्षेत्रात आधुनिक लष्कर आणि शत्रूद्वारे जगात भारताला सन्मानाचे स्थान मिळवून देणे, हे सर्व भाजपने साध्य केले आहे. जगभरात भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केले आहे. म्हणूनच केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग भाजप आणि तिच्या नेतृत्वाकडे आशेने बघत आहे. भाजप हा भारताच्या आकांक्षा पूर्ण करणारा पक्ष आहे. आपल्या सेवाभावामुळे हा पक्ष भारतासाठी वरदान ठरणार आहे.
(राष्ट्रीय सहसंघटन मंत्री, भाजप)