- अक्षय जोग
सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे. अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या शासकीय अभिलेखागारात उपलब्ध आहेत,” अशा प्रकारे सावरकरांवर सदैव आरोप केला जातो.
(पाहा : Krishnan Dubey & Venkitesh Ramakrishnan, Far from heroism – The tale of Veer Savarkar, ७ एप्रिल १९९६, Frontline)
ज्या व्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान माझी जन्मठेप हे आत्मचरित्र वाचले आहे, त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरित लक्षात येईल. प्रथम सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. “कारागृहात राहून जी करता येत आहे, त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मातृभूमीची करता येईल, अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून, मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे, तर समाजहिताचे दृष्टीनेही आमचे परमकर्तव्य आहे.”
(सावरकर, वि. दा., माझी जन्मठेप, पृष्ठ ३६२) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की, जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनितिमान आणि राष्ट्रघातकी मात्र होणारी होती.” (जन्मठेप, पृष्ठ २९८) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत. तसेच हे केवळ सावरकरांचे मत नव्हते, तर त्यांचा आंग्ल-मित्र डेव्हिड गार्नेटचेही हेच मत होते.
“सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागारात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही. पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उधृत करतो : “हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील, अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपापले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश राजद्रोही बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच सरकारने मला न सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तत्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल. (जन्मठेप, पृष्ठ २१९-२२०) अशी निस्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्या वतीने होत्या, केवळ स्वतःकरिता नव्हत्या.
सावरकरांना याची जाणीव होती की, काही झालं तरी ब्रिटिश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली – राजकारण करू देत नसाल, तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल. तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सूतोवाच केले होते. काही अवधीपर्यंत राजकारणात – प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही; परंतु बाहेर राजकारणाव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाङ्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. ‘लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, धरीना मी शस्त्राकदनसमयीं या निजकरी’, अशी दुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर सोडण्यात येतच असतात आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनितीज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत; तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात. (जन्मठेप, पृष्ठ १६२) यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त समाजसुधारणा, शुद्धी, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड राष्ट्रसेवा केली. जे जे राजबंदिवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. मी यावर पुन्हा कधीही – किंवा अमुक वर्षे – राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला, तर मीही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन (जन्मठेप, पृष्ठ ४०१)
ब्रिटिशांना आवेदने पाठवण्यामागचा त्यांचा हेतू, भूमिका किंवा धोरण काय आहे हे सावरकर इतर सहबंदिवानांनाही स्पष्टपणे सांगत होते. तसेच त्यांनीही काहीही करून अंदमानातून बाहेर पडावे असेच सुचवत होते. म्हणजे स्वत:ला सुचलेली सुटकेची चाणाक्ष कल्पना स्वत: पुरतीच मर्यादित ठेवण्याचा स्वार्थीपणा न करता इतरांना सांगत होते, न पटल्यास बिनतोड युक्तिवादाने व इतिहासातील दाखले देऊन पटवून देत होते. सावरकरांच्या गळ्यातील बिल्ल्यावर जन्मठेप शिक्षेचा दिनांक २४ डिसेंबर, १९१० व सुटकेचा दिनांक २३ डिसेंबर, १९६० आणि धोकादायक कैदी म्हणून हे अक्षरही कोरलेले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या काळात मुंबई विद्यापीठाने त्यांची बी.ए. पदवी रद्द केली होती. सावरकरांना वर्षातून केवळ एक पत्र आपले बंधू नारायणरावांना लिहिण्याची अनुमती होती. अंदमानातील काळ्या पाण्यावर बंद्यांना सर्वच्या सर्व जन्मठेपेचा कालावधी तुरुंगात ठेवण्यात येत नसे. २-३ वर्षांनंतर अंदमानातच स्वतंत्र राहण्याची परवानगी मिळत असे. पण दोन्ही सावरकर बंधूंना ही सवलत नाकारण्यात आली होती. २८ ऑक्टोबर १९१६ला सावरकरांना दुसरा वर्ग देण्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी २ नोव्हेंबर १९१६ पासून झाली. ही बढती मिळाली पण तुरुंगातून बाहेर येण्याची सवलत नव्हती, लेखन – साहित्य ठेवण्याची सवलत नव्हती, अंदमानातच बंदिवान असणाऱ्या बंधू बाबारावांसह राहण्याची अथवा बोलण्याची सवलत नव्हती, अपरिहार्य किंवा सक्त श्रमापासून मुक्तता नव्हती, वॉर्डर होण्याची किंवा कोठडीतून बंद न ठेवण्याची सवलत नव्हती, अधिक चांगले किंवा आदरयुक्त वागविले जाण्याची, अधिक पत्रे धाडण्याची सवलत नव्हती, घरून भेट येऊ देण्याची सवलत नव्हती, इतरांना ५ वर्षांत ही सवलत उपभोगता येत असे, पण सावरकरांना ६ वर्षं झाली तरी ही सवलत मिळाली नव्हती. (जन्मठेप, पृष्ठ ३४४) म्हणजे नावाला दुसरा वर्ग दिला होता. कामात, श्रमात, शिक्षेत कसलीही सवलत दिली नव्हती. सावरकरांची आणि माईंची भेट दिनांक ३० मे १९१९ ला आठ वर्षांनी झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये सावरकर कुटुंबीयांना दोन्ही सावरकर बंधूंची अंदमानात भेट घेण्याची अनुमती मिळाली, त्यावेळेस कुटुंबीयांनी नेलेली आवडीच्या खाद्यपदार्थांची आणि रुमालाची ट्रंक तुरुंगाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष देऊ दिली नाही, उलट ती गडप केली. सावरकरांनी ब्रिटिशांशी सहकार्य केले असते, तर ब्रिटिश सरकार सावरकरांशी असे खुनशीपणाने वागले असते का? सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते, पण ब्रिटिश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशी राजकीय पत्रे वाचताना दोन ओळींतील वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात, ते एक तर दोन ओळींमधील वाचण्यास सक्षम नसतात किंवा दोन ओळींतील वाचण्याची त्यांची तयारीच नसते.
अंदमानच्या कारावासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच, पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागद-पेन्सिल नसतानाही कारागृहातील भिंतींवर ५ हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते मुखोद्गत केले! संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येइल का? सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाही. सावरकरांचे आत्मचरित्र माझी जन्मठेपमध्ये या सर्वांचा सांगोपांग ऊहापोह केला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या शासकीय अभिलेखागारात जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली, अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.
व्हिएतनामच्या कम्युनिस्ट हो-चि-मिन्हने सुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशीच पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चँगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या डाँग-मिन्ह-होई (जी हो-चि-मिन्ह च्या व्हिएत-मिन्ह ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (कानिटकर, वि. ग., व्हिएतनाम : अर्थ आणि अनर्थ, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ ५३) तसेच रशियाने जेव्हा जर्मनीशी केलेला अनाक्रमणाचा करार संपुष्टात आल्यावर मित्र राष्ट्रांशी हातमिळवणी केली, तेव्हा एका रात्रीत कम्युनिस्टांनी आपली निष्ठा बदलली. म्हणजे कम्युनिस्ट करतील ती राजकीय खेळी व सावरकर करतील तो द्रोह? तात्पर्य हेच की, ‘झोपलेल्याला उठवता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला उठवता येत नाही.’