संजय राऊतांना तुरुंगवास भोगावा लागलेले पत्राचाळ प्रकरण पुन्हा चर्चेत
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. त्यांच्या ३१.५० कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती अर्थात इमारती ईडीने जप्त केल्या आहेत. यामुळे आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ज्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला ते पत्राचाळ पुनर्विकास प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पत्राचाळ कथीत घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले होते, तीन महिने तुरूंगात घालवल्यानंतर सध्या ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. संजय राऊतांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी कोर्टाने ईडीच्या कारवाईवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत महत्वाची टिप्पणीही केली होती.
ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना तातडीने अटक केली पण प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक का केली नाही? असा सवालही कोर्टाने विचारला होता. साक्षीदारांच्या जबाबातून वाधवान यांचा सहभाग उघड होतो, असेही कोर्टाने म्हटले होते. तसेच प्रवीण राऊत यांना दिवाणी वादावरुन अटक झाली. तर यातील म्हाडाची भूमिका संशयास्पद वाटत असताना म्हाडाच्या कुठल्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली दिसली नाही, असेही कोर्टाच्या ऑर्डरमध्ये म्हटले होते.