मुंबई: एकीकडे महागाईने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण आला असताना, एक दिलासा देणारी बातमी आहे. खाद्य तेलाच्या किमतीत जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून यात घसरण पाहायला मिळत होती. होळीपासून या घसरणीत अधिक वाढ झाली.
गेल्या हंगामात मोहरीच्या तेलाची किंमत १६५ ते १७० रुपये होती, आता ही किंमत कमी होऊन १३५ ते १४० रूपये प्रति लिटरवर आली आहे. मागील एका महिन्यात मोहरीचे तेल १० टक्के, सोयाबीन तेल ३ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. रिफाइंड सोयाबीन तेलाचा भाव १४० ते १४५ रुपयांवरून ११५ ते १२० रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल तेलाचा दर वर्षभरात १३५ ते १४० रुपयांवरून ११५ – १२० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
खाद्यतेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी, दर आणि देशभरात झालेले तेलबियांचे एकूण उत्पादन या सगळ्यावर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात खाद्यतेल पुरवठा साखळी युक्रेन रशिया युद्धामुळे विस्कळीत झाली होती. ती आता पूर्वपदावर आली आहे.