- मुक्तहस्त: अश्विनी पारकर
‘पण काकू तुम्ही तर म्हणता की, शुक्र ग्रह आहे मग ते टीव्हीवर मी गाण्याच्या शोमध्ये एकदा उगवली शुक्राची चांदणी… हे गाणं ऐकलं होतं.’ लगेच अश्लेषा त्याला समर्थन देत म्हणाली, ‘आत्याच्या स्टेटसला पण गाणं होतं, त्यात शुक्र तारा असं म्हटलंय. मग नक्की खरं काय?
शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा संपवून आश्लेषा नेहमीप्रमाणे घरी आली. तिने तिच्या आजीचे व्हॉट्स ॲप ओपन केले आणि आत्याचा स्टेटस बघितला. स्टेटसला गाणं होतं ‘शुक्र तारा मंद वारा…’ त्याला फोटो होता चंद्रकोर आणि त्याच्याखाली ताऱ्याचा आणि सोबत कॅप्शन होतं चंद्र आणि शुक्राची युती. आज आई घरी आल्यावर ती तिला हे काय आहे? हा प्रश्न विचारणार होती.
आई आल्या… आल्या… लागलीच आश्लेषा तिला बिलगली. आईने पाणी पिण्याच्या आतच आश्लेषाचा आईला प्रश्न, ‘ते काल शाळेत पण बाई सांगत होत्या, मून आणि व्हिनसचं कंजक्शन आहे. आज आत्याने पण तो ताऱ्याचा आणि मूनचा फोटो ठेवलाय. पण टीचर काय बोलली ते मला नीट कळलं नाही गं.’
आपल्या चिमुरडीचा उत्सुक चेहरा पाहून आईला देखील तिच्या संशोधक वृत्तीचे कौतुक वाटले. आई म्हणाली, ‘एक काम कर, आज बिल्डिंगमधल्या तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना गोळा कर आणि घेऊन ये, मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यासोबतच देते.’ झालं, आईचा आदेश लगेच मनावर घेऊन आश्लेषाने सर्वांना गोळा केलं.
सर्वजण गोळा झाले. आईने बोलायला सुरुवात केली. मुलांनो मून म्हणजेच चंद्र आणि व्हिनस म्हणजे शुक्र. काल त्यांची युती झाली. या युतीचं विलोभनीय दृष्य आपण खरं तर पाहायला पाहिजे होतं, पण ते मिस झालं. हरकत नाही, ते काय आहे ते आपण समजून घेऊ.
बघा कसं असतं, तुम्ही शाळेत शिकला असाल, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सुर्याभोवती. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसेच इतर ग्रहही सूर्याभोवती फिरतात. असंच काल पृथ्वी, चंद्र आणि शुक्र एकाच रेषेत आले आणि त्यालाच शुक्र-चंद्राची युती म्हणतात. काल आपल्याला पृथ्वीवरून ती सहज दिसली. एरव्ही तेरव्ही असे दुर्मीळ योग सहज पाहता येत नाहीत.
शुक्र चांदणी नव्हे ग्रहच
आश्लेषाच्या एका चिमुकल्या दोस्ताने प्रश्न विचारला, ‘पण काकू तुम्ही तर म्हणता की, शुक्र ग्रह आहे मग ते टीव्हीवर मी गाण्याच्या शोमध्ये एकदा उगवली शुक्राची चांदणी… हे गाणं ऐकलं होतं.’ लगेच अश्लेषा त्याला समर्थन देत म्हणाली, ‘आत्याच्या स्टेटसला पण गाणं होतं, त्यात शुक्र तारा असं म्हटलंय. मग नक्की खरं काय?’
आईने उत्तर दिलं. ‘अगं, शुक्राची चांदणी किंवा शुक्र तारा हे मराठीतील अलंकारिक शब्दप्रयोग आहेत. त्याचा शुक्र चांदणी किंवा तारा असण्याशी काहीही संबंध नाही.’ ‘अच्छा!’ सर्व मुलं एकत्र म्हणाली.
चंद्रकोरीची टिकली आणि चंद्र-शुक्र योग
निष्ठा ही आश्लेषाची खास मैत्रीण. तिने काल तिच्या भावाच्या मोबाइलवरील फेसबुकवर तोच फोटो पाहिला, जो आश्लेषाने आत्याच्या व्हॉट्सॲपवर पाहिलेला. ती लगेच आश्लूच्या आईला म्हणाली, ‘काकू माझी आई सेम अशीच टिकली लावते, जसा काल तो फोटो दिसत होता.’
आश्लेषाच्या आईला मुलांच्या कल्पनाशक्तीचं कौतुक वाटलं. ती म्हणाली, ‘अगं हो, असंच दिसत होतं ते. जणू आकाशाच्या माथ्यावर कोणीतरी चंद्रकोरीची टिकली लावली आहे. म्हणूनच तो फोटो सोशल मीडियावर जास्त व्हायरल होत होता. या आधीही अशा अनेक युत्या झाल्या आहे. पण त्यापेक्षा या फोटोला नेटकरी जास्त पसंती देत होते.’
‘दुसरं असं तर हे का दिसतं होतं माहितेय बाळांनो? तर चंद्र कलेकलेने मोठा होतो आणि कलेकलेने लहान. त्या दिवशी चंद्रकला मोहक दिसत होती. पण शुक्र काही त्याच्या एकदम जवळ होता असं नाही, तर तो आपल्या डोळ्यांना दिसणारा भास होता.’
पृथ्वी, शुक्र आणि चंद्राचं अंतर
मग ते अंतर किती होतं? आश्लेषाचा प्रश्न. यावर आईचं उत्तर, ‘चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ७२ हजार ७०२ किलोमीटर मैल दूर होता, तर शुक्र पृथ्वीपासून १८ कोटी ५३ लाख ८१ हजार किलोमीटर अंतरावर होता. म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं, तर चंद्र आणि पृथ्वीचं अंतर म्हणजे शिवाजी पार्काचं मैदान आणि बँडस्टँडचा समुद्रकिनारा, तर शुक्राचं पृथ्वीपासून अंतर म्हणजे आपल्या देशाची राजधानी दिल्ली.’
आईच्या या उत्तराने सर्वांचे डोळे विस्फारले होते. सर्वांची उत्सुकता बघून आईलाही आणखी उत्साह आला. तिने आणखी माहिती द्यायला सुरुवात केली.
पिधान युती म्हणजे काय?
मुलांनो ही युती म्हणजे पिधान युती आहे. पिधान म्हणजे काय? पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्याच्या पुढून चंद्रबिंब जाऊ लागले की, काही काळ तो तारा झाकला जातो. म्हणजे सूर्याखेरीज इतर ताऱ्यांना चंद्रामुळे होणाऱ्या ग्रहणाला पिधान म्हणतात. क्वचितच असे ग्रहाच्या बाबतीत होते. यामध्ये काही वेळा ग्रह चंद्राला स्पर्शून जातो. पिधानाला एक प्रकारचे ग्रहण असे म्हणतात. आता सर्वांच्या जवळजवळ सर्व शंकांचे निरसन झाले होते. इतक्यात बाबा सरबत घेऊन आले. इतका वेळ मुलं आईसोबत इतकी मग्न झालेली की, बाबा कधी आले, हे त्यांना कळलंच नाही. बाबांनी बनवलेलं छान आवळ्याचं सरबत पिऊन मुलं आनंदाने घरी गेली.