- प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
कोणतीही बाई कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक करते, तेव्हा वेळेपलीकडे ती आपल्या माणसांसाठी प्रेमही देते. जेव्हा त्या घरातील माणसे एकीकडे मोबाइल स्क्रोल करत दुसरीकडे टीव्हीकडे पाहत काहीही न बोलता ते खातात, तेव्हा नेमके तिला काय वाटत असेल?
रोजच्यासारखीच संध्याकाळी मी जवळच्याच वॉकिंग ट्रॅकवर चालत होते. चालताना एका बाजूच्या लाकडी बाकावर एक तरुण मुलगा आणि मुलगी बसले होते. त्यांचे एकमेकांशी काय नाते होते, या विषयी मला सांगायचे नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस दोघेजण बसलेले असताना ते एकतर एखाद्या ऑफिसचे कलिंग्ज असतील, मित्र असतील, प्रेमिक असतील किंवा नव्याने लग्न झालेले जोडपेही असू शकतील. मी पहिल्या फेरीत पाहिले की, तो तरुण मुलगा तल्लीन होऊन गिटार वाजवत होता. त्या सुरांनी मोहित होऊन जाणारा-येणारा मिनिटभर थांबून कौतुकाने पाहत होता आणि पुढे जात होता. मीही किंचित थबकले आणि पुढे गेले. सहज लक्षात आले की, ती कोणी तरुण मुलगी त्याच्या बाजूला बसली होती, ती डाव्या हातात मोबाइल घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने स्क्रोल करत होती. त्यानंतर मी दुसरी फेरी मारली, तिसरी फेरी मारली दृश्य तेच होते की, तो तल्लीन होऊन गिटार वाजवत होता आणि ती शांतपणे मोबाइलवर स्क्रोल करत होती.
आता एक प्रसंग मला तुम्हाला सांगून झाला आहे. त्याच्या पुढच्या फेरीत मी या घटनेविषयी विचार करत होते. मला जाणवले की, आपल्या सोबतीचा कोणीतरी गिटार वाजवत आहे, तर त्या सुरांमध्ये रमून न जाता त्याच्याकडे लक्ष न देता ती मोबाइलकडे पाहत आहे. त्याच्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष करत आहे. हा एक विचार झाला. आपण वेगवेगळ्या प्रकारे या घटनेचा विचार करू शकतो. दुसरा विचार असा मनात आला की, आजच्या काळातील तरुणाई ही खूपच वर्कोहोलिक आहे. ती कदाचित कुठच्या कंपनीशी किंवा व्यवसायाशी निगडित असेल, ज्यामुळे तिला ऑनलाइन राहून काही महत्त्वाचे संदेश द्यायचे असतील किंवा काही कौटुंबिक बोलणे चालू असेल, त्यामुळे तिचे संपूर्ण लक्ष तिच्या त्या कामांमध्ये असू शकेल. तिसरा विचार मनात आला की, तो खूप चांगला गिटार वाजवत असेल कदाचित तिच्यासाठीच वाजवत असेल. पण तिला त्या कलेत आनंद मिळत नसेल त्यामुळे मोबाइलवरील काही व्हीडिओ किंवा फोटो पाहण्यात ती तिचा आनंद शोधत असेल. शेवटी प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो ना!
हा झाला एक प्रसंग. आता आणखी काहीतरी वेगळे निरीक्षण नोंदवते. कोणाच्याही घरी पार्टी चालू असते किंवा रोजचे घरचे जेवण चालू असते. माणसे एका हाताने जेवत असतात आणि दुसऱ्या हाताने मोबाइल स्क्रोल करत असतात. एक उदाहरण देते की, माझ्या घरी दोन तरुण मुले आली. ते दोघेही मी केलेले पॅटिस खात होते. एक मुलगा फक्त पॅटिसकडे पाहत खात होता, तर दुसरा एका हाताने मोबाइल स्क्रोल करत खात होता. जो मुलगा पॅटिसकडे पाहत खात होता तो सहज म्हणाला, “ताई पॅटिस खूप छान झाले आहेत!” बस इतकेच…
मला असे वाटले की, आपण फक्त इथे पॅटिसचे उदाहरण घेऊया. बाजारात जाऊन मी मक्याची कणसे विकत आणली. त्याच्यात माझा अर्धा तास गेला असेल. त्यानंतर ती कणसे सोलायला साधारण अर्धा-पाऊण तास गेला असेल. कणसाचे दाणे आणि बटाटे शिजवायला अर्धा तास गेला असेल. त्यानंतर मला त्या पॅटिसच्या मसाल्यासाठी लसूण सोलावा लागला असेल. हिरव्या मिरच्या स्वच्छ करून त्याचं वाटण करावे लागले असेल आणि त्यात टाकण्यासाठी कोथिंबीर निवडून चिरावी लागली असेल. यात यासाठी साधारण अर्धा तास गेला असेल. त्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर मक्याचे दाणे दळले असतील त्यासाठी पाच मिनिटे गेली असतील. त्यानंतर हे सगळे मिश्रण हलवून त्याचे गोळे करण्यासाठी पंधरा मिनिटे गेली असतील. त्याला ब्रेडचे कोटिंग करण्यासाठी ब्रेड दळून ते गोळ्यावर लावण्यासाठी अजून दहा मिनिटे गेले असतील. पॅटिस तव्यावर खाली-वर हलवत शिजवण्यासाठी आणखी वीस-पंचवीस मिनिटे गेली असतील. आता हे सांगण्याचे कारण म्हणजे जेव्हा त्यातील एक मुलगा म्हणाला की, “ताई खूप छान झाले आहेत”, तर या सर्व कष्टाचे आणि वेळेचे मला सार्थक झाल्यासारखे वाटले.
कोणतीही बाई कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक करते, तेव्हा ती काही वेळ देते आणि वेळेपलीकडे ती आपल्या माणसांसाठी प्रेमही देते. जेव्हा त्या घरातील माणसे एकीकडे मोबाइल स्क्रोल करत दुसरीकडे टीव्हीकडे पाहत काहीही न बोलता ते खातात, तेव्हा नेमकेपणाने तिला काय वाटत असेल? असा मी विचार करते.
या दोन प्रसंगातून मला एवढेच सांगायचे आहे की, आजच्या काळामध्ये जर मोबाइलवर कोणताही संदेश आला किंवा कोणाचाही फोन आला आणि आपल्याकडे त्याचे नाव रजिस्टर नसेल तरी त्याचा व्यवस्थित नंबर येतो. आपले खाणे झाल्यावर पाच-दहा मिनिटांनी फोन केल्यामुळे काही कोणती कंपनी कोसळत नाही किंवा कुठे आग लागत नाही. हे वाचताना कोणाला तरी अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकते; परंतु मला असे वाटते जेव्हा एखादा माणूस अतिशय कष्ट करून आनंदाने किंवा प्रेमाने आपल्यासाठी काही करतो तेव्हा त्याला फार काही अपेक्षा नसते. ते पूर्ण आनंदाने स्वीकारून म्हणजेच त्याला वेळ देऊन एखादाच शब्द – छान, मस्त, रिलॅक्सिंग वा वाह… बस, अजून काय हवे? कधीतरी थोडा वेळ मोबाइल बाजूला ठेवून आपण एकमेकांना काही क्षणांसाठी तरी ‘वेळ’ देऊया का?