Categories: रिलॅक्स

सुट्टीची मज्जा घेऊ, गावाकडे चला जाऊ…

Share
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

‘झुकुझुकू झुकुझुकू आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी…
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या…’

रेडिओवर गीत लागलं होतं. ते ऐकता ऐकता माझं मन एका क्षणात झरझर कित्येक वर्षं मागे गेलं. लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, आम्ही भावंडं गावी जाण्यासाठी बाबांच्या मागे लागत असू. बाबांनी आधीच एसटी बसचं आरक्षण केलेलं असायचं. रात्री बॅगा काढून पटापट दोन जोड कपडे, गोष्टीची पुस्तकं आणि आवश्यक ते सामान भरून तयार ठेवायचं. बाबा नेहमी हलवायाकडून सुतरफेणी, मैसूर पाक अशी मिठाई गावाला नेण्यासाठी म्हणून खास घेत. दुसऱ्या दिवशी सर्व आवरून कधी एकदा गावाला पोहोचू याची आम्हाला उत्कंठा लागलेली असायची. एसटीमध्ये एकदाचे आपापल्या जागा पकडून बसलं आणि गावाच्या दिशेने प्रवास सुरू झाला की, खूप हायसं वाटायचं. खिडकीतून बाहेर पाहिलं की, झाडं-डोंगर धावताना दिसत. असं वाटे की, ही झाडं आणि डोंगर आपल्याबरोबरच धावत आहेत. जणू आपल्यासोबत ते गावीच येत आहेत की काय?

माझं गाव कोकणातलं. त्यामुळे प्रवास जरा मोठा होता. पण त्याचा कधीच कंटाळा यायचा नाही. पनवेलला गाडी थांबली की, जेवणाचे डबे फस्त करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागत असू. मग पहाटे उजाडता उजाडता कोकणातले रस्ते दिसू लागले की, डोळ्याचं पारणं फिटत असे. लाल माती, हिरवे डोंगर, माडाची झाडं, आंब्याच्या बागा, कौलारू घरं आणि त्यातून येणारा चुलीचा धूर दिसला की, गाव जवळ आल्याचं कळायचं. गावात प्रवेश करताच धावत धावत गावातलं घर गाठण्यासाठी आम्हा भावंडांमध्ये स्पर्धा लागायची. आपापल्या बॅगा घेऊन धूम ठोकून थेट अंगणाच्या प्रवेशद्वारावर जाऊन आम्ही थांबत असू. आजीला आम्ही गावी केव्हा पोहोचणार, याची बरोबर कल्पना असायची. कारण ती एका हातात पाण्याचा तांब्या व एका हातात भाकरीचा तुकडा घेऊन दारात आमच्या स्वागतासाठी सज्जच असायची. आमच्या पायावर पाणी टाकून भाकरीचा तुकडा आमच्यावर ओवाळून नजर काढल्यावर नंतरच आम्हाला आत प्रवेश मिळायचा. मग अंगणातच सामान ठेवून थोडा वेळ आजीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात आणि तिलाही प्रश्न विचारून भंडावण्यात आमचा वेळ जाई. आजीचं नेहमीचं वाक्य, “काय गो, सुकलंस मेल्या. आता इथे राहा अन् महिनाभरात कशी जाड होतंलंस बघ…”

मला हसू येई. आजीचं ते वाक्य मला इतकं पाठ झालं होतं की, शेवटचे शब्द तिच्या आधी मीच बोलून टाकायची आणि मग धूम ठोकायची, ती थेट अंगणालगतच्या गोठ्यात. सरला, विमला म्हणजे आमच्या गाई म्हशी कशा आहेत ते मला पाहायचं असे. त्यांना भेटल्यावर खूप आनंद व्हायचा. मी त्यांच्यापाशी मनसोक्त गप्पा मारत बसायची. त्यांना शहराकडच्या गप्पा गोष्टी, मज्जा मस्ती सांगायची आणि त्याही मान डोलावून मला जणू प्रतिसाद देत.

गावचं स्वयंपाक घर तर खूप मोठं होतं. शहाळं आणि भाताची पेज ही आमची सकाळची ठरलेली न्याहारी. एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमधील जेवणालाही नसेल, अशी चव त्या पेजेला होती. ती पिण्याचं भाग्य मला मिळालं याबद्दल आज धन्यता वाटते. बंबावर पाणी तापलं की, आंघोळी आटपून आम्ही सर्व भावंडं रानात खेळायला जायचो. दूर दूरपर्यंत सर्वत्र हिरवं रान, माडाची झाडं, अननस, सुपारी, जांभळाची झाडं, करवंदाच्या जाळ्या हे सर्व पाहताना मन हरखून जात असे. पकडापकडी, लगोरी, लंगडी हे खेळ खेळताना संध्याकाळ कधी होई, हे कळायचंही नाही.

मग पुन्हा विहिरीवर येऊन राहाटाने पाणी काढण्याची मजा काही औरच वाटायची. थंड गार पाण्याची आंघोळ आटोपून घरात येऊन सांजवेळी समई लावून देवासमोर ‘शुभं करोती’ म्हणताना त्या देवाकडे आम्ही एकच मागणं मागायचो की, “देवा, आमची सुट्टी संपूच नको दे रे!” कारण रोज काही ना काही नवे विक्रम, नव्या गोष्टी आम्हाला करायच्या असायच्या. कधी आठवले गुरुजींची नक्कल, कधी माळ्यावर जाऊन लपणं, तर कधी गोष्टीची पुस्तकं वाचण्याचा कार्यक्रम.

गावच्या सड्यावर जाण्याचा बेत ठरला की, घरातील पिशव्या घेऊन आमची गँग सड्यावर जात असे. भरपूर करवंदं, जांभळं गोळा करणं, झाडावरच्या कैऱ्या पाडणं आणि हा सारा रानमेवा एकत्र करून त्याचा फडशा पाडणं म्हणजे आनंदाचा परमोच्च बिंदू वाटायचा. उन्हाळ्यात हापूस आंब्यांचा हाss ढीग घरात असे. शहरात विकतही मिळत नसतील असे अस्सल देवगडचे ते हापूस आंबे खाण्याची आमच्यात स्पर्धा लागे. आंबे खाणं हेच आमचं जेवण असायचं. त्या आंब्याची गोडी आजही जिभेवर ताजी आहे.

गावचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे तिथलं प्रशस्त श्री भगवती मंदिर. त्या मंदिरात प्रवेश केला की, मन अगदी प्रसन्न होऊन जाई. उजव्या आणि डाव्या बाजूला छोटी-छोटी अशी अनेक देवालयं आणि मध्यभागी श्री भगवती मातेची अत्यंत सुंदर रेखीव अशी मूर्ती. गावच्या रक्षणासाठी सज्ज असलेली आणि गावकऱ्यांवर कृपेचा वरदहस्त ठेवणारी भगवती माता पाहिल्यावर आपसूकपणे नतमस्तक होऊन हात जोडले जात. पूजा व दर्शन झाल्यावर पुजारी देवीला जे गाऱ्हाणं घालायचा तेही ऐकत राहावसं वाटे. प्रत्येक वाक्याच्या शेवटी आम्ही मोठ्याने “व्हय महाराजा!” असा घोष करायचो. त्यानंतर मग आमची टोळी पप्पांच्या कॅन्टिनला जात असे. तिथे कांदा भजी आणि शेंगदाण्याच्या लाडूचा फडशा पाडून आम्ही घरी परतत असू .

मग दुसऱ्या दिवशी असायची समुद्राची सफर. समुद्राच्या वाटेवर जाताना वडाची मोठमोठी झाडं दिसायची. त्या वडाच्या पारंब्यावर लटकून झोके घेत घेत पुढे गेल्यावर हळूहळू समुद्राचं दर्शन होऊ लागे. पांढरा शुभ्र फेनिल नितळ, निर्मळ, स्वच्छ अशा अथांग समुद्राचं दर्शन घेतल्यावर घरी परत जावसं वाटत नसे. मग तिथेच तासन् तास आम्ही गप्पा मारत बसायचो. नारळाच्या झाडावर सरसर चढणारा कोकणातला माणूस पाहिला की, आम्हीही त्याच्याप्रमाणे चढण्याचा प्रयत्न करत असू. तो अर्थातच फसायचा. मात्र आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या काढण्याचा कार्यक्रम असो वा लपाछपी खेळताना झुडपात लपणं असो माझा नंबर कायम पहिला असे.

 

कपडे धुण्यासाठी आम्ही मुली मुली एकत्र व्हाळावर म्हणजे तलावाकाठी जायचो. गाणी म्हणता म्हणता कपडे केव्हा धुतले जात कळायचंही नाही. घरी आल्यावर फणसाचे गरे आमची वाट पाहत असत. आजी कापा आणि बरका असे दोन्ही प्रकारचे फणस कापून त्यातले गरे वेगळे करण्याचं काम मला सांगायची. ते करताना किती मजा वाटायची! आजी, काकी आणि आई आंब्याची व फणसाची साठं म्हणजेच पोळी बनवत.

दशावतार म्हणजे तर कोकणचं खास वैशिष्ट्य. रात्री उशिरा-उशिरापर्यंत ते खेळ पाहताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहात.
असे करता करता एक दिवस फर्मान निघायचं की, उद्या इथून आपल्याला परत घरी निघायचं आहे. मग मन पार हिरमुसून जायचं. आजीचा निरोप घेताना, तर जीव अधिकच गलबलून जाई. पदरानं डोळे पुशीत आम्हाला निरोप देताना ती आम्हाला बजावून सांगे की, आजीची आठवण ठेवा हां पोरांनो! तेव्हा आम्ही तिचे गालगुच्चे घेत, ठेऊ हं आज्जी, तूही आम्हाला विसरू नकोस! असे सांगत पार दिसेनासे होईपर्यंत हात हलवून तिला निरोप द्यायचो. सुट्टीच्या दिवसांचा असा वेगळा अनुभव घेऊन आम्ही कोकणातून शहरात आमच्या घरी परत आल्यावर पुढचे काही दिवस आम्हाला तिकडच्या आठवणी आणि तिथल्या माणसांनी लावलेला लळा यामुळे जराही करमायचं नाही. कोकणातला मेवा-आंबे, नारळ, साठं, कोकम हे सारं माझ्या शहरातल्या मैत्रिणींना दाखवत मी अभिमानाने म्हणायची, “बघा बघा ही माझी कोकणची शिदोरी!” कोकणाची महती सांगताना खरंच मला स्वतःला मी किती भाग्यवान समजायचे.

पण दुर्दैवाने या गावच्या मजेला आजची पिढी किती दुरावली आहे, हे माझ्या लक्षात आलं, जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांचे सुट्टीचे बेत माझ्या कानावर पडले. एकजण कौतुकाने सांगत होता की, “माझे आई-बाबा किनई सुट्टीत मला काश्मीरला घेऊन जाणार आहेत.” दुसरा म्हणाला, “चल चल हे तर काहीच नाही, माझे डॅडी आम्हाला सुट्टीत मॉरिशसला नेणार आहेत.” कोणी कुलू मनाली, कोणी राजस्थान, कोणी साऊथ, कोणी महाबळेश्वर, तर कोणी आणखी कुठे कुठे जाणार हे सांगत होते. क्षणभर मला गंमत वाटली. मग वाटलं की, अरे, यांच्यापैकी एकही जण “आम्ही सुट्टीत गावी जाणार” असं का सांगत नाही? की आता जाण्यासाठी आपलं असं हक्काचं गावच उरलेलं नाही? गावी जाण्यात कसली मजा? असं तर यांना वाटत नाही ना? वाटत असेलही. कारण, त्यांनी मुळात ही मजा अनुभवलेलीच नाही, तर त्यांना ती कळणार तरी कशी? आणि खरं सांगायचं, तर मी माझ्या लहानपणी अनुभवलेली गावाची मजा आज तिथे तशी उरली आहे की नाही? हे खुद्द मलाही ठाऊक नाही. मी ते अनुभव आठवणींच्या रूपात मात्र मनात कायमचे जपून ठेवले आहेत. योगायोग म्हणजे रेडिओवर लागलेलं पुढचं गाणंदेखील माझ्या याच मनःस्थितीशी जुळणारं होतं…

आठवणींच्या आधी जाते
जिथे मनाचे निळे पाखरू…
खेड्यामधले घर कौलारू… घर कौलारू…

Recent Posts

Eknath Shinde : दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…

31 mins ago

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

1 hour ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

3 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

3 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

4 hours ago