गारगाई धरणबाधित गावांच्या पुनर्वसनाची प्रकल्पग्रस्तांची मागणी
वाडा : मुंबई शहराला जादा पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वाडा तालुक्यातील ओगदा ग्रामपंचायतीच्या हद्दीत गारगाई नदीवर धरण बांधणार आहे. या प्रकल्पासाठीची जमीन संपादन, वन खात्याच्या परवानग्या आणि अन्य परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे ४ गावे आणि ६ पाडे विस्थापित होणार आहेत. तेव्हा महापालिकेने प्रथम आमचे पुनर्वसन करावे आणि मगच धरण बांधावे, अशी मागणी धरणबाधित गावांतील कुटुंबीयांनी केली आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मध्य वैतरणा, भातसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा या प्रमुख धरणांसह ७ धरणांमधून मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईला आणखी जादा पाण्याची गरज आहे. ती भागवण्यासाठी मुंबई महापालिका गारगाई नदीवर ओकदा येथे धरण बांधणार आहे. गारगाई ते मोडकसागर तलावादरम्यान दोन किमी लांबीचा बोगदा खोदण्यात येणार आहे. गारगाई तलावातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर तलावात आणून ते सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांमधून मुंबईत आणले जाणार आहे. त्यामुळे पाणी वाहून नेण्याच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदे व खोडदे गावे बाधित होणार आहेत, तर तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होत आहेत. प्रकल्पात बाधित होणाऱ्या ८४० हेक्टर क्षेत्रापैकी ७३ हेक्टर क्षेत्र नदीखाली आहे. ५९७ हेक्टर वनजमीन असून १७० हेक्टर खासगी जमीन आहे. या धरणामुळे या परिसरातील काही गावे आणि पाडे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा आणि मगच धरणाचे काम सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या काही महिन्यांत सुरुवात होणार आहे. मात्र या प्रकल्पात बाधित होणारी चार गावे व सहा पाडे यांच्या योग्य पुनर्वसनासंदर्भात कोणतीही पूर्व तयारी झाली नसल्याने प्रथम येथील बाधित गांव, पाड्यांचे पुनर्वसन करा आणि नंतर या प्रकल्पाचे काम सुरू करा, अशी मागणी येथील बाधित कुटुंबांनी केली आहे.
या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणारी घरे, संपादित केली जाणारी शेतजमीन याला योग्य भाव देण्यात यावा, काही शेतकऱ्यांनी आंबा, चिकू अशा फळ बागांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना कशा प्रकारचा मोबदला देणार आहेत, याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुनर्वसन करण्यापूर्वी याबाबत आधी निर्णय घ्यावा. अन्यथा या प्रकल्पाला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. गारगाई धरण प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबीयांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातच करण्यात यावे, अशी मागणी बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. त्यासाठी वाडा तालुक्यातील देवळी येथे वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
विस्थापित होणाऱ्या कुटुंबीयांना त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात, घर आणि शेतजमीन संदर्भात कुठलीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे आमचे नेमके काय होणार हे कळत नाही. – भगवान कोरडे, बाधित शेतकरी, फणसपाडा (ओगदा) ता. वाडा