Monday, June 30, 2025

वादळी वाऱ्यात लासलगाव येथील द्राक्ष बाग भुईसपाट

वादळी वाऱ्यात लासलगाव येथील द्राक्ष बाग भुईसपाट

हातातोंडाशी आलेला घास वादळीवाऱ्यात उडाला



  • प्रिया बैरागी


निफाड : अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये लासलगाव येथे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाले आहे.


लासलगाव कोटमगाव रोड लासलगाव बाजार समिती जवळ येथील शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बाग भुई सपाट झाली. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरायचे कसे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.


लासलगाव येथील शेतकरी प्रल्हाद पाटील यांच्या एस.एस.एन व्हरायटीचा द्राक्ष बाग हार्वेस्टिंगच्या टप्प्यात असतानाच वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच द्राक्ष बागेची व्यापाऱ्याकडून पाहणी करण्यात आली होती. या द्राक्षांना ५० ते ५५ रुपये दर मिळाला असता. ही द्राक्ष रसिया येथे एक्सपोर्ट करण्यात येणार होती. परंतु वादळी वाऱ्यामुळे होत्याचे नव्हते झाले आणि संपूर्ण द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने पूर्ण द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता हे व्यापारी द्राक्ष बाग पाहून परत जात आहेत.


शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पोटच्या पोराप्रमाणे द्राक्ष बाग वाढवली असतानाच अस्मानी संकटांनी घाला घातला. यात संपूर्णत: द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाल्याने प्रल्हाद पाटील यांचे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेची नुकसान झाले आहे. हे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Comments
Add Comment