Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजजनतेसाठी वेळ राखून ठेवण्याचे मंत्री-अधिकाऱ्यांना आदेश

जनतेसाठी वेळ राखून ठेवण्याचे मंत्री-अधिकाऱ्यांना आदेश

तीन जणांनी एकाच दिवशी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई : आपल्या कामाची दाद मागण्यासाठी आलेल्या तीन जणांनी सोमवारी एकाच दिवशी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी उपचारादरम्यान विष घेतलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला असून, एका महिलेची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी केले आहे. यात मंत्री-अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार आहात हे मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा, असे आदेश सर्व मंत्र्यांना दिले आहेत तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ४ ही वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी व या कालावधीत शक्यतो विभागाच्या बैठका घेऊ नयेत, असेही बजावण्यात आले आहे. विभागीय पातळीवर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जनतेसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून वेळ राखून ठेवावी. लोकांच्या भेटीवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीनेच दौरे आयोजित करावे, असेही कळविण्यात आले आहे.

मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातील ठरावीक दिवस व वेळ निश्चित करावी. त्याची कल्पना अभ्यागतांना यावी, म्हणून भेटीचा दिवस व वेळेची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा. लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका, असे निर्देश दिले आहेत.

शीतल यांच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसीत प्लॉट होता. २०१० मध्ये एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बोगस कागदपत्रे बनवून हा प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा त्यांचा दावा होता. दाद मागण्यासाठी त्या मंत्रालयात आल्या होत्या. विष घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत संगीता डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असून, अपघातात जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी तक्रार त्यांनी नोंदवली होती. तरीही कारवाई होत नसल्याने त्यांनी टोकचे पाऊल उचलले. जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

तिसऱ्या घटनेत पुण्याच्या मावळ तालुक्यातील रमेश मोहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अपंगांच्या अनुदानात वाढ करावी, अशी त्यांची मागणी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -