भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची माहिती
ठाणे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात आज गुरुवार ३० मार्चपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी दिली. नव्या पिढीला स्वा.सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी ही यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी दिले. ठाणे शहरातील सर्व भागात ही यात्रा जाणार आहे, असे भाजपाचे आमदार संजय केळकर व शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसकडून वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी नमूद केले.
या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेचे विभागवार प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईसाठी आ. अमित साटम, ठाणे -कोकण – आमदार निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, पश्चिम महाराष्ट्र – प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोळ, विक्रम पावसकर, उत्तर महाराष्ट्र – आमदार जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मराठवाडा – आमदार संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, पूर्व विदर्भ – आमदार प्रवीण दटके, आमदार विजय रहांगडाले, पश्चिम विदर्भ – आमदार संजय कुटे, प्रदेश महामंत्री आमदार रणधीर सावरकर