नांदगाव, मुरुड : ‘समुद्र उशाशी आणि मच्छीमार उपाशी’ या म्हणीची प्रचिती मुरूडमधील मच्छीमारांना येत आहे. ऐन हंगामात कित्येक दिवसांपासून मुरूड परिसरातील समुद्रात मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांच्या एकूणच उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचे कोळीवाड्यातून फिरताना दिसून येते.
मार्च महिना संपत आला, तरी देखील ऐन हंगामात छोटी- मोठी मासळी देखील मिळणे कठीण झाले आहे. अनेक नौका मुरूड, एकदरा, राजपुरी नांदगाव, बोर्ली आदी गावांच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
आकस्मिक बदलते वादळी वातावरण, समुद्रात होणारे प्रदूषण, एलईडी, पर्सनीन मासेमारी यामुळे छोटी मासळी, अंडी यांचा नाश होत असल्याने मासळीचे प्रमाण वेगाने घटले आहे. बोटीचा खर्च, खलाशी खर्च वसूल होत नसेल तर उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्न पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना पडला आहे. होळीनंतर खोल समुद्रातील मासळी अंडी घालण्यासाठी उथळ खडकाळ समुद्रकिनारी येते. त्यावेळी नौकांना मासळी मिळत नाही. मुरुड, राजपुरी, एकदरा येथील सुमारे शंभर नौका अशा परिस्थितीमुळे किनाऱ्यावर परत आल्या असून त्या नांगरून ठेवल्या आहेत. आता तर कोलंबी, मांदेली, जवळा देखील मिळत
नाही, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मुरूड मासळी मार्केटमध्ये मुरुड समुद्रातील मासळी दिसून आली नाही. मोजक्याच मासळी विक्रेत्या महिला अलिबाग परिसरातून ‘एलईडी’ मासेमारीतून मिळालेली म्हणजेच बाहेरगावहून आलेली मोजकीच मासळी विक्री करताना दिसल्या. उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडलेले दिसून आले. नेमकेच बांगडे, कोलंबी, छोट्या सुरमई आणि काटेरी मासळी होती. दोन पापलेटची किंमत एक हजार रुपये सांगितली.
खोल समुद्रात २ टन बर्फ, ६०० लिटर्स डिझेल भरून मासेमारीला गेलेल्या दालदी जाळीने मासेमारी करणाऱ्या नौका मासळी मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतत आहेत. यातील काही नौकांना फक्त कुपा नावाची मासळी काही प्रमाणात मिळाली आहे. कुपा मासळीला परदेशात भाव मिळतो. मात्र आपल्या भागात फारसा भाव मिळत नाही. मुरुडसारख्या भागात कुपा मासळी किलोवर न विकता प्रत्येकी ५० रुपयांना एक अखंड मासा या प्रमाणे विकला जातो. त्यामुळे हा मासा मिळाला तरी मच्छीमारांचा खर्च देखील सुटत नाही. – रोहन निशानदार, मच्छीमार, एकदरा गाव
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…