मुरबाड : पोलीस ठाण्यात तक्रार किंवा अन्य काही कामानिमित्त येणा-या महिला भगिणी येताना ब-याचदा त्यांच्यासोबत लहान लहान बाळं असतात. मात्र पोलीस ठाण्यात त्यांना निवांतपणे स्तनपान करण्यासाठी सुरक्षित जागा नसते. हिच बाब लक्षात घेऊन मुरबाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तथा ठाणेदार प्रसाद पांढरे यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या सहकार्याने मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांसाठी, सोबतच्या लहान मुलांना सुरक्षित घेऊन बसण्यासाठी हिरकणी कक्षाची सर्वसोयीयुक्त अशी निर्मिती केली आहे. ज्यामध्ये मुलांना संगोपन आणि स्तनपान करताना सोयीचे होईल. विधी संघर्ष ग्रस्त बालक महिलांना या हिरकणी कक्षात सुरक्षित राहता येईल. येथे लहान मुलांना झोपण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी सुद्धा खास व्यवस्था केली आहे. स्वच्छ पाणी, खेळणी, टि.व्ही. अशा सोयींयुक्त हा कक्ष महिला दिनाचे औचित्य साधुन हस्तांतरण करण्यात आले आहे.
विधवा महिलांसाठी समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना
यावेळी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुरबाड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या विधवा पत्नीसाठी समाज कल्याण मार्फत विविध प्रकारच्या योजना आहेत. त्या योजना द्वारे आपण महिलांना शिलाई मशीन तसेच दहा दिवसाचा शिलाई मशीनचा कोर्सेस मोफत देत आहोत. तसेच ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या मुलांना समाज कल्याण मार्फत शिष्यवृत्ती दिली जात आहे. त्यासाठी आपण महिला बाल विकास खात्याशी संपर्क साधावा.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामभालसिंग, नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, पो. नि. प्रसाद पांढरे, स. पो. नि. अनिल सोनोने, सोबत सामाजिक महिला कार्यकर्त्या नंदा गोडांबे, सुवर्णा ठाकरे, शिल्पा देहेरकर, सुष्मिता तेलवणे, माजी जि. प. सदस्या रेखा कंटे, प्राजक्ता भावार्थे, माजी सभापती स्वरा चौधरी, उपनगराध्यक्षा मानसी देसले, नगरसेविका नम्रता जाधव, स्नेहा चंबावणे, महिला पोलीस जया फाळे, सपना भोईर, पारधी यांसह तालुक्यातील महिला पोलीस पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या व महिला भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.