Sunday, July 21, 2024
Homeक्रीडामालिका विजयाची गुढी भारत उभारणार?

मालिका विजयाची गुढी भारत उभारणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक एकदिवसीय सामना आज

चेन्नई (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक-एक अशा बरोबरीत सुटलेल्या एकदिवसीय मालिकेचा निर्णय बुधवारी दुपारी १.३० वाजता होणाऱ्या सामन्याने लागणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका विजयाची गुढी उभारेल. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ दिनी होणारी लढत दोन्ही संघांसाठी मालिका विजयाच्या दृष्टीने निर्णायक आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिला सामना जिंकून भारताने आघाडी १-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सामन्यात कांगारूंनी जोरदार पुनरागमन करत भारताचा सुपडा साफ केला. अवघ्या ११७ धावांवर भारताला सर्वबाद करत बिनबाद सामना खिशात घातला. आता बुधवारी होणारी लढत दोन्ही संघांसाठी मालिका विजयासाठी निर्णायक आहे. पहिल्या दोन सामन्यांचा विचार केल्यास दोन्ही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेल्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनीस या वेगवान गोलंदाजांची चलती होती. विशाखापटणमच्या खेळपट्टीवरही वेगवान माराच चालला. मिचेल स्टार्क, सिन अॅबॉट, नॅथन इलिस या तिकडीने भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. हे दोन्ही सामने एकतर्फीच झाले. दरम्यान बुधवारी चेन्नईत सामना होणार असून ही खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना फायदेशीर खेळपट्टीवर दोन्ही सामने एकतर्फी झाल्यानंतर निर्णायक लढत होणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीवर सर्वांच्याच नजरा आहेत.

मालिकेतील पहिले दोन्ही सामने पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही संघांना फलंदाजांची अधिक चिंता आहे. दुसऱ्या सामन्यात भारताचे तगडे फलंदाज झटपट बाद झाले आहेत. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनीही निराश केले. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांमध्ये एकाही संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात यश येते का? हे बुधवारीच कळेल. शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव या तिकडीला दोन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळता आलेली नाही. या तिघांचा फॉर्मही भारतासाठी महत्त्वाचा आहे. दुसरीकडे ऑसींचा स्टार्क चांगलाच लयीत आहे. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने यशस्वी गोलंदाजी केलेली आहे. त्याचा सामना करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -