गेल्या काही दिवसांत कोकणातील रत्नागिरीमध्ये मन विषन्न करणाऱ्या दोन घटना घडल्या. बागायतीला लागलेल्या आगीतून वनसंपदा वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांचा जळून जीव गेला आहे.
झाडं वाचवण्यासाठी केलेले ‘चिपको’ आंदोलन संपूर्ण देशालाच नव्हे अवघ्या जगाला माहिती आहे. आपल्या झाडामाडांवर प्रेम करणारा कोकणी माणूससुद्धा तसाच आहे. या निसर्ग संपदेवर त्याचं प्रेम असतं. आपली झाडे-माडे, आपली वनसंपदा जपून राहावी, ती वाचावी यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. त्याच्या घराच्या अंगणात सुशोभित रंगीबेरंगी फुलांची झाडे असतात, तर परसदारात म्हणजे घराच्या मागच्या अंगणात भाजीपाला, नारळ, सुपारीची झाडे असतात. घावांमध्ये आंबा, काजूसारख्या फळांसह अनेक उपयुक्त झाडे जंगल या सदरात मोडत गावामध्ये वाढत असतात. त्यांचे महत्त्व आणि उपयोग माहीत असलेला कोकणी माणूस त्यांना सांभाळत असतो. आपल्या आजूबाजूच्या वनसंपदेसाठी कोकणी माणसाने आजूबाजूच्या प्रगतीलासुद्धा नाकारले आहे. हीच वनसंपदा हे या कोकणचं सौंदर्य तर आहेच, पण ही कोकणची संपत्तीसुद्धा आहे. हीच भावना कोकणात जन्मणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये असते. ही वनसंपदा जपावी, ती राखावी आणि ती पुढच्या पिढीकडे सुपूर्द करावी, ही इथली अलिखित परंपरा आहे. त्यामुळेच दापोली आणि रत्नागिरीमध्ये झालेल्या या दोन घटनांचा विचार केला, तर दोघांनीही आपल्या बागायती सांभाळाव्या, त्या आगीमध्ये बेचिराख होऊ नये यासाठी आपल्या प्राणांचा बलिदान केलं असं म्हणावं लागेल.
पण, त्यातूनच दर उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचे संकट अधिक ठळकपणे पुढे आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोकणात लागणाऱ्या वणव्यांमुळे जंगले, झाडांनी आच्छादलेले डोंगरच्या डोंगर बेचिराख होण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याच काळामध्ये तीव्र ऊन पडत असल्याने पावसानंतर उगवून आलेले गवत पूर्ण सुकून जाते आणि याच सुकलेल्या गवतावर कुठेतरी कोणीतरी चुकून किवा मुद्दामहून एखादी काडेपेटीची काडी टाकली, कुणाच्या सिगारेटचं पेटतं थोटूक पडतं. या काळात असणाऱ्या अवकाळी पावसाच्या वातावरणात वीज पडली तर त्यातूनही आग लागते. याच दिवसांमध्ये वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अधिक असतो. त्यामुळे सोसाट्याने वाहणारे वारे ही आग आपल्यासोबत सर्वत्र घेऊन पोहोचतात आणि त्यामुळेच काही क्षणातच समोर दिसणार हिरवे जंगल, हिरवा डोंगर बेचिराख होऊन जातो. त्याचं हिरवागार रूप काळंकुट्ट होऊन जातं. हल्ली कोकणात अनेक ठिकाणी या घटना सातत्याने दिसून येतात. त्यामुळे वणवे लागले की, ते रोखायचे कसे, त्यांना आवरायचं कसं? हा प्रश्न सातत्याने कोकणी माणसासमोर पडलेला असतो. केवळ जंगलेच नाहीत, तर आंबा, काजूसारखी मौल्यवान बागायतीसुद्धा यामध्ये नष्ट होताना दिसतात. या जंगल भागात असणारे पशु-पक्षी, छोटे-मोठे किडे, सरपटणारे प्राणी या सगळ्यांचा याच्यामध्ये त्यांचा जीव जातो. घनदाट असलेली जंगलं नष्ट होतात.
वणवे ही सातत्याने कोकणाला लागलेली आणि वाढत जाणारी समस्या आहे. हे कसे रोखायचे, हा मोठा प्रश्न कोकणी माणसासमोर उभा आहे. हे वणवे रोखण्यासाठी शासनाच्या वनविभागाकडून उपाययोजना केल्या जातात. मात्र त्या पुरेशा नसतात. कारण दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, आंबा, काजू यांच्यासह घनदाट असलेली वनराई अचानक लागलेल्या वणव्यामध्ये बेचिराख होताना आपल्या डोळ्यांसमोर पाहण्याची वेळ कोकणी माणसावर येऊन ठेपली आहे. त्यातच ही आग इतक्या वेगानं आणि तीव्र पद्धतीनं पसरते की, त्यावर नियंत्रण कसं आणि कोणी ठेवायचं? हा प्रश्न निर्माण होतो. अग्निशमनच्या यंत्रणा या शहरी वस्तीमध्ये उपलब्ध असतात. जंगलामध्ये जेव्हा आग लागते, त्या वेळेला तिथपर्यंत ती विझविण्यासाठी अशा यंत्रणा कितपत पोहोचतील आणि त्याचा उपयोगसुद्धा किती होईल? हा प्रश्नच आहे. अशा वेळेला हे वणवेच लागू नये किंवा एखादी आग एखाद्या ठिकाणी लागली, तर ती तिथेच तत्काळ कशी विझवायची यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोकणामध्ये डोंगराच्या पायथ्याशी अनेक वाड्या-वस्त्या आहेत. तर आंबा, काजू, कोकम यांसारखी बागायती या वस्तीपासून थोड्या अंतरावर आहे. त्यामुळे इथे जर आग लागली तर ती पूर्ण पसरेपर्यंत समजत नाही आणि जेव्हा आग वाऱ्याने पसरते त्यावेळी तोपर्यंत ते नियंत्रणाच्या बाहेर गेली असते. त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बागेचे होणारे नुकसान प्रत्यक्ष पाहण्याची दुर्दैवी वेळ कोकणी माणसावर अनेकदा येते. त्यातच एक तर आंबा, काजू ही पिकं कोकणची नगदी पीक आहेत. इथल्या आर्थिक चक्रावर त्याचा परिणाम होत असतो. यावरती मोठा वर्ग उदरनिर्वाह करत आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान या कैचीत बागायतदार सापडला आहे. उत्तम उत्पन्न मिळण्याचे दिवस कमी झाले आहेत. नफा आणि तोट्याचे गणित बांधताना तो ठाकला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इथले प्रश्न वेगळे, तर कोकणातील प्रश्न आणखीनच वेगळे आहेत. अशा वेळेला अवकाळी पावसाने, बदलत्या हवामानामुळे इतर शेतकरी आंबा व्यावसायिक हैराण झालाय. दरवर्षी आंबा, काजूचे प्रमाण घटतंय किंवा पिकावर परिणाम होताना दिसतोय. इथले अर्थचक्र हळूहळू बिघडत चालले आहे. जे काही उरलं आहे, ते वाचवायचं ही इथल्या शेतकऱ्यांची भावना आहे. अशा वेळी अनेक संकटातून बागायती फुलवायची, वाढवायची, अचानक लागलेल्या आगीमध्ये ती बेचिराख होताना डोळ्यांसमोर पाहायची, अशी दुर्दैवी वेळ इथल्या कोकणी माणसावर अनेकदा येते. त्यामुळे यावर आता ठोस काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काही वर्षांपूर्वी वणवे रोखण्यासाठी वन विभागाने काही उपाय केले होते; परंतु त्याची विशेष अंमलबजावणी होताना किंवा त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. कोकण म्हटलं की, निसर्ग, कोकण म्हटलं की, घनदाट वनराई, कोकण म्हटलं की, अजूनही जपलेला गाव. पण आता हेच गाव सुद्धा हे वणवे आपल्या अग्नीमध्ये भस्म करतात की काय असे चित्र आता हळूहळू निर्माण होते आहे. अनेकदा मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना असे पेटलेले डोंगर, पेटलेले जंगल लोकांना दिसतात आणि हे चित्र भयावह आहे. आज जर या समस्येकडे तितक्याच गांभीर्याने पाहिलं नाही, तर जंगलांना बेचिराख करून हे वणवे हळूहळू डोंगर पायथ्याशी असलेल्या वाडीवस्त्यांपर्यंत पोहोचतील आणि लोकांच्या अस्तित्वाचा, लोकांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळेच याबाबत योग्य पद्धतीने काम करणं, संशोधन करणं आणि बागायतदारांना, जमीनदारांना, निसर्गप्रेमी कोकणी माणसाना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…