- संतोष वायंगणकर
काजू बागेला आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, मोहरलेली आंबा बाग आगीच्या भक्ष्यस्थानी… या व अशा बातम्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोकणातील विविध भागांतून येत असतात. डोंगरांना देखील आग लागलेली असते. कोकणात तर याला वणवा म्हणतात. हा वणवा लागतो कसा? डोंगर, बागायती यांना आग कशी लागते? या प्रश्नांची उत्तर कधीच सापडत नाहीत. दर वर्षी जळालेले माळरान दिसतात. दर वर्षी माळरानाला आग लागलेली असते. त्या माळावर असलेली झुडुपे, झाडं सगळंच जळून गेलेलं असतं.
गेल्या अनेक वर्षांपासून काही डोंगरांना आग लागण्याचे प्रकार आपण पाहात आलेलो आहोत. या डोंगरांवर असणारी औषधी वनस्पती आगीत जळालेली असते. सह्याद्री पट्ट्यात जेव्हा डोंगराला वणव्याने घेरलेलं असेल, तर त्यातून फार मोठं नुकसान झालेलं असतं. आंबा, काजू बागायतींना तर दर वर्षीच आग लागते. यासाठीच कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी आग लागून नुकसान होऊ नये यासाठी बागायतीत वाढलेलं गवत काढून टाकतात; परंतु तरीही काही वेळा आग पसरते. पाच-दहा एकरच्या बागायत क्षेत्रामध्ये जेव्हा आग पसरते, तेव्हा आग विझविणे सहज सोपे राहत नाही.
आग लागून नुकसान झालेल्या बागायतीची आजवर कधीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शासनाकडून कधीही आग लागल्यावर नुकसानभरपाई मिळत नसते, हे कोकणातील शेतकऱ्याला पक्कं ठाऊक झालेलं आहे. यामुळेच कोकणातील शेतकरी शासनाकडून काही मदत मिळेल याची कधीच प्रतीक्षा करीत नाहीत आणि महाराष्ट्रातील माध्यमं आणि वृत्तपत्रातूनही कोकणातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कधी दाखवले जात नाही; परंतु महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकरी स्वत:च्या पिकाला आग लावताना, डोक्याला हात लावलेल्या स्थितीत दिसत असतो; परंतु कोकणातील शेतकरी नुकसानभरपाईची वाट पाहात न बसता ज्या काजू आंब्यांची झाड आगीत होरपळली आहेत. त्यांना पाणी घालून जर ती झाड जिवंत ठेवता येत असतील, तर शेतकऱ्यांचा तो प्रयत्न राहातो. घर बांधणं जसं कठीण असतं तसच एखादी बागायत उभी करणंही फार कष्टाचं असतं. घर पुन्हा बांधता येईल; परंतु बागायत उभी करण्यासाठी काही वर्षे वाट पाहावीच लागणार. फार मेहनत, कष्टाने बागायत उभी करावी लागते. लहान मुलाइतकच संगोपन शेतकरी आंबा, काजू बागायतीत करत असतात. रोग, कीड यापासून संरक्षण करीत रोपांना वाढवावं लागतं. वेळच्या वेळी त्यांना पाणी द्यावं लागतं.
काही बागायतदार शेतकरी छोट्या मुलांसारखे बागेतील झाडांशी बोलत असतात. एवढ्या जिव्हाळ्याने, कष्टाने उभी केलेली आंबा, काजू, कोकमची बाग आगीत जळत असते. तेव्हा त्या शेतकऱ्यांना काय वाटत असेल? त्यांच्या भावना काय असतील? हे शब्दात सांगणेही अवघड आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांमध्ये बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडत असतात. या महिन्याभरात अनेक ठिकाणी काजू बागायतींना आगी लागल्या आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू बागायतीत तर काजू ‘बी’ तोडणीचे काम जोरदार सुरू असताना बागेत आग लागली. मिळणाऱ्या काजू बागेतून मिळणारे उत्पन्नच हातातून गेले आहे. यात अलीकडे आणखी एका गोष्टीने बागायतीत आग लागत आहे. वीज वितरण कंपनीमुळेही अनेक बागायतीतून आग लागत आहे. वीज वितरण कंपनीच्या वीजतारा बागायतीतून जात असतात. शॉर्टसर्किटमुळे बऱ्याच बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र या शॉर्टसर्किटने आग लागण्याची आणि नुकसानीची जबाबदारी वीज वितरण कंपनी कधीही घेत नाही.
शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी दूरच राहिली; परंतु या अधिकाऱ्यांकडून आपला काही संबंध कसा नाही, हे सांगण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न राहतो. यामुळे बागायतदार शेतकऱ्याची अवस्था ही ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच काहीशी आहे. मेहनतीने उभी केलेली आंबा, काजू बागायत जेव्हा नष्ट होते, तेव्हा त्या शेतकऱ्याची अवस्था ही फारच विचित्र होऊन जाते. या हंगामात बागायतीतून मिळणाऱ्या पैशातून काही आडाखे बांधलेले असतात. ते सर्व कोलमडून जातात. आग लागण्याचे परिणाम हे पुढच्या दोन-पाच वर्षात राहतात. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे त्यांच त्यांनाच ठाऊक आहे. जेव्हा कष्टाने उभी केलेली बागायत जळून जाते, त्या वेदना काय असतात? या त्या शेतकऱ्यांनाच ठाऊक.