- फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
अनेकदा आपण म्हणतो फुकटचा सल्ला द्यायला काय लागतं, ज्याच्यावर वेळ येते त्याला कळतं, ज्याच्यावर बिततं त्यालाच समजतं आणि हे खरंच आहे. आपण सातत्याने पाहत असतो की, कोणावरही कोणताही प्रसंग ओढवला, चांगलं वाईट, सुख-दुःख, आजारपण काहीही सामोरं आलं की, व्यक्ती सैरभैर होते, त्या वेळी त्या व्यक्तीची विचारशक्ती काम करत नाही. ज्या वेळी आपल्या आयुष्यात कोणतीही अनपेक्षित घटना घडते, मानसिक आघात अथवा अपघात घडतो, अनेक प्रश्न समोर उभे असतात तेव्हा आपण स्वतः कितीही हुशार असलो, बुद्धिमान असलो, अनुभवी असलो तरी आपली स्वतःची निर्णय घेण्याची ताकद अशा वेळी दुबळी होते. प्रश्न आर्थिक असो, भावनिक असो, शैक्षणिक, व्यावसायिक असो, व्यावहारिक असो वा कौटुंबिक अथवा वैयक्तिक असो आपलेच प्रश्न सोडवण्यात आपण असमर्थ ठरतो.
आपल्या घरातील, समाजातील, नात्यातील, ओळखीतील लोकं मात्र अशा वेळी आपल्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात आणि नानाविध सल्ले आपल्याला देऊ करतात, कारण सल्ला देणं खूप सोपं असतं. खूप कमी लोकं असे असतात, ज्यांना आपल्याला मनापासून मदत करायची असते. आपल्याला त्या संकटातून बाहेर काढायचे असते. अनेकांना फक्त आपली मजा बघायची असते. आपल्याला दोष द्यायचा असतो आणि आपल्याला चुकीचं सिद्ध करायचं असतं.
बहुतांश लोकं असेच असतात, जे आपली फजिती पाहणं, आपलं मानसिक खच्चीकरण करणं, आपण कसे चुकलो यावर चर्चा करणं यासाठी जमा झालेले असतात. अनेक लोकांना न मागता सल्ले देत सुटण्याची सवय असते, हे तर शंभर टक्के खरं आहे. त्यातून असे काही बालिश आणि बाळबोध सल्ले देणारे लोकं देखील असतात, जे समोरच्याला पूर्ण मूर्ख समजूनच बोलत असतात. अत्यंत हिन दर्जाचे, आपल्या अस्तित्वालाच आव्हान करतील, असे सल्ले लोकं देत असतात. आपली बुद्धी, अक्कल, लायकी ठरविण्याचे मापदंडच जणू त्यांच्याकडे असतात.
जेव्हा कोणतीही व्यक्ती त्रासात असते तेव्हा तिला हवं असतं ते फक्त सोल्युशन! म्हणजेच मदत, उपाययोजना, तोडगा, उपचार. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला तू कसा चुकलास, तू कसा कमी पडलास, तुझ्यात काय कमतरता आहेत, कशामुळे आणि कोणामुळे हे असं झालं, असं नसतं केलं तर, तसं नसतं वागलं तर इत्यादी जर तरच्या गप्पा मारून त्रस्त व्यक्तीला त्यावेळी अजून मनस्ताप देण्यात काहीच अर्थ नसतो.
मुळात अशा फुकट सल्ला देणाऱ्या व्यक्तीला काय घडलं आहे, त्यामागील पार्श्वभूमी नेमकी काय आहे, याबद्दल फारशी काहीही माहिती नसते. मानवी स्वभावानुसार कोणाचंही काहीही चुकीचं घडलेलं समजलं की, त्यावर ताशेरे ओढून आपला शहाणपणा दाखवणे हे अंगभूत गुणधर्म अनेकांमध्ये असतात. त्यातून हा सल्ला फक्त उपस्थित झालेल्या समस्येवर अथवा त्या वेळच्या प्रश्नांपुरताच मर्यादित नसतो, तर त्रस्त व्यक्तीच्या जन्मापासून त्याच्या पूर्ण खानदानापासून सुरू होऊन सगळ्यांचा उद्धार करूनच संपतो.
आपल्याला जर कोणाची खरंच मनापासून मदत करायची असेल किंवा खरंच एखाद्याला त्रासातून अथवा समस्यांमधून बाहेर काढायचे असेल, तर जाणकार होणे गरजेचे आहे, समोरच्याच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे. कोणतीही त्रासलेली व्यक्ती सल्ला किंवा सहानुभूतीची भुकेली नसते, तर त्याला गरज असते सोल्युशनची. भरमसाट प्रश्न न विचारता, संदर्भहिन चर्चा न करता, त्याला एकतर्फी लेक्चर न झाडता आहे त्या परिस्थितीमध्ये गरजवंत व्यक्तीसोबत उभे राहणे आवश्यक असते. जे आपल्या परीने शक्य असेल ते सोल्युशन देणे आवश्यक असते.
सोल्युशन! मग ते आर्थिक मदत स्वरूपात असेल, त्याच कोणतंही काम करून देण्यात हातभार लावणं असेल, त्याला समजावून घेऊन त्याच्याशी, त्या विषयाशी संबंधित लोकांशी चर्चा करून त्याची बाजू मांडणे असेल, त्याला एकटं वाटणार नाही, तो चुकीचा मार्ग स्वीकारणार नाही, याची खबरदारी घेणं असेल, त्याच्यासाठी धावपळ करणं असेल, त्याला उपयोगी ठरतील असे काही जाणकार लोकांचे संदर्भ देणं असेल, त्याच्यासाठी कोणाकडे शब्द टाकणं असेल, त्याच्या कुटुंबाला सावरणं असेल. असं काहीही ज्यामुळे त्याला आपली मदत झाली, सहकार्य झाले असे वाटेल. सोल्युशन म्हणजे ज्यात काहीतरी कृती असेल, हालचाल असेल अथवा अपेक्षित ते घडवून आणण्याची ताकद असेल.
नुसतीच रिकामा सल्ले देणारी व्यक्ती अजून एक चूक करते ते म्हणजे ज्याच्यावर चुकीची वेळ आली आहे, त्याबद्दल गावभर गवगवा करणे, आगीत तेल टाकायचे काम करणे, त्या व्यक्तीबाबत सार्वत्रिक चर्चा करून त्याच्या वाईट वेळेत त्याची बदनामी करणे, त्याला लाचार करणे, तो स्वतःच्या नजरेतून उतरेल यासाठी खतपाणी घालणे, त्रस्त व्यक्तीला भंडावून सोडणे.
आपण कोणत्याही भूमिकेत असा सल्ला घेणारे असाल अथवा सल्ला देणारे असाल तर प्रकर्षाने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, सोल्युशन महत्त्वाचे आहे. सोल्युशन देता येत नसेल अथवा आवश्यक तिथे मिळत नसेल, तर अलिप्त, तटस्थ राहणे उचित आहे. जी लोकं आपल्याला सल्ल्याच्या आडून मानसिक यातना देत असतील, जे आपल्याला परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चुकीचा रस्ता दाखवत असतील, जे आपल्या समस्येवर करमणूक म्हणून चर्चा करत असतील, जे सतत घडलेल्या गोष्टीसाठी आपल्याला जबाबदार धरून आपला अपमान करत असतील, त्यांना चार हात दूर ठेवा. आपले खरे हितचिंतक कोण आहेत हे त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवरून ओळखू येतं. जगात योग्य सल्ला देणाऱ्या, सकारात्मक दिशा दाखवणाऱ्या व्यक्ती खूप कमी असतात. वाईट परिस्थितीमध्ये जवळीक करणारे सगळेच आपले नसतात. सांत्वन करता करता आपल्या मनाचा थांग घेणारे, आपलं मत काढून घेणारे पण असतात, त्यामुळे सल्ला देणाऱ्या प्रत्येकाला मनातलं आणि खरं सांगत बसणं मूर्खपणा आहे.
जे लोकं आपल्या कार्याला तुच्छ समजतात, कायम दुय्यम वागणूक देतात, ज्यांना आपण करत असलेली गोष्ट कधीच आवडलेली नसते, ज्यांनी कायम आपलं खच्चीकरण केलेलं असतं, आपल्यावर टीका केलेली असते, अशा लोकांना आपल्यावर कितीही संकट आलं तरीही सल्ला द्यायला बोलावू नये. ज्यांच्या मनात आपल्या प्रति सद्भावना आहेत, आपुलकी आहे, तेच आपल्याला सोल्युशन देतील. सोल्युशन नाही देऊ शकले तर निदान आपल्यालाच समजावून सांगत बसण्यापेक्षा समजावून घेतील तीच खरी आपली लोकं असतील.