मुंबई : मुंबईतल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे रेल्वे स्थानकावर कार्यरत महिला पोलिसांची छेड काढणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वांद्रे स्थानकात रील करणाऱ्या तरुणांकडून लोकलच्या दरवाजात उभे राहून स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेचा वापर करून छेडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
यासंबंधीची एक तक्रार वांद्रे लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली आहे. या आधारे त्या रील बनवणाऱ्या आणि महिलांना छेडणाऱ्या आरोपीचा वांद्रे लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकलच्या दरवाजात उभे राहून एका उनाड तरुणाने रील बनवला. या रीलमध्ये तो स्वतःला मस्तान कंपनीचा म्होरक्या समजून असभ्य वर्तन करत होता.
एका नागरिकाने हा व्हिडीओ मुंबई पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांना ट्विटवर टॅग केला आहे यानंतर आता वांद्रे लोहमार्ग पोलीस या मस्तान कंपनीच्या म्होरक्याचा शोध घेत आहेत.