मुंबई: बॉलिवूड अभिनेते तथा दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत आता नवीन माहिती हाती आली आहे. या प्रकरणात आता दिल्ली पोलिस कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांच्या पत्नीचा जबाब नोंदवून चौकशी करणार आहेत. विकास मालू यांच्या पत्नीने आपल्या पतीने सतीश कौशिक यांच्याकडून व्यवसायासाठी १५ कोटी रुपये घेतले होते आणि हे पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी त्यांनी कट रचून चुकीचे औषध दिले, असा आरोप केला होता.
दिल्लीतील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तसेच त्यांच्या कुटुंबानेही कसल्याही प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाही. यानंतर आता, दिल्ली पोलीस यासंदर्भात विकास मालू यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा नोटीस पाठवणार आहे. पोलीस विकास मालू यांच्या पत्नीचा जबाब नोंदवण्याबरोबरच चौकशीही करणार आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे विविध प्रश्नांची यादीही तयार केली आहे.
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, नोंदवलेले जबाब आणि तपासानंतर या मृत्यू प्रकरणात अद्याप तरी काहीही संशयास्पद आढळलेले नाही. तक्रारीत, विकास मालू यांच्या दाऊदशी असलेल्या संबंधांसंदर्भात बोलताना, प्रत्येक मुद्द्याची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सतीश कौशिक आणि विकास मालू हे चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी विकास मालू यांनी १५ कोटी रुपये घेतल्याचा आरोपही फेटाळला.