आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघायला मिळाले. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना या व्हिडीओवरून विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले.
“शीतल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीनुसार हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे मानस कुवर आणि अशोक मिश्रा ही दोन व्यक्ती असल्याचे पुढे आले आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मास्टरमांईंड कलानगरमध्ये बसला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हे जर युवासेनेचे पदाधिकारी असतील तर युवासेनेच्या प्रमुखांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे”, अशी मागणीही त्यांनी केली.
जे ठाकरे गटाबरोबर राहतील, ते चांगले. जे त्यांना सोडून गेले, त्यांची बदनामी करण्याचा प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच मॉर्फ व्हिडीओ तुम्हालाच करता येतो, असे नाही. “तुम्ही जर हा खेळ सुरू करत असाल, तर याचा शेवट आम्हाला करता येतो. आम्हीही रात्री ७.३० नंतरचे काही व्हिडीओ बाहेर काढू. ८ जून रोजीचे काही व्हिडीओ आमच्याकडे सुद्धा आहेत”, असेही ते म्हणाले.