Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखसिग्नल स्मार्ट; मुंबईकर घेणार मोकळा श्वास

सिग्नल स्मार्ट; मुंबईकर घेणार मोकळा श्वास

मुंबईकरांसह सर्वच मोठ्या शहरांतील नागरिकांचे आयुष्य हे सतत घडाळ्यावर अवलंबून असते आणि घराबाहेर पडताच त्या सर्वांना रस्त्यांवरून चालताना, सार्वजनिक अथवा खासगी वाहनांतून प्रवास करताना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास इतका भयानक असतो की, रस्त्यावरील अर्धाअधिक काळ हा सिग्नल यंत्रणा खराब किंवा योग्य तऱ्हेने काम करत नसल्याने वाट पाहण्यात वाया जातो. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने तेथे वायू प्रदूषण भयानक प्रमाणात होत असते. त्याचाही नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो व त्यामुळे आरोग्याचे नानाविध प्रश्न निर्माण होत आहेत. हा यक्षप्रश्न ध्यानात घेऊन मुंबईतील सिग्नल यंत्रणा अद्ययावत आणि स्वयंचलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील सर्व रस्त्यांवरील सिग्नल येत्या काळात स्मार्ट होणार आहेत. वाहनांचा अंदाज घेऊन सिग्नलचा कालावधी ठरणार आहे. आतापर्यंत २५८ सिग्नल स्मार्ट झालेले असून दुसऱ्या टप्प्यात ७० महत्त्वाच्या जंक्शनवरील सिग्नलही लवकरच स्मार्ट होणार आहेत. मध्य मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईला जोडणारा पी. डी’मेलो मार्ग आणि कफ परेड परिसरातील ७० जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी महानगरपालिका या जंक्शनच्या भूगोलाचा आणि सदाकाळ सुरू असलेल्या वाहतुकीचा अभ्यास करून कृती आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत हे ७० जंक्शनवरील सिग्नल स्मार्ट होण्यास सुरुवात होईल. मुंबईतील जंक्शनवर तब्बल ६५२ सिग्नल्स असून त्यातील आतापर्यंत २५८ सिग्नल स्मार्ट पद्धतीने अद्ययावत करण्यात असले असून आता ७० सिग्नल अद्ययावत करण्यात येणार आहेत. नंतर उर्वरित ३२४ सिग्नल टप्प्याटप्प्याने स्मार्ट करण्यात येणार आहेत.

पारंपरिक सिग्नल पद्धतीत त्याचा कालावधी निश्चित केलेला असतो. म्हणजे लाल दिवा किती वेळ राहील, हिरवा दिवा किती वेळ राहील, हे निश्चित असते. स्मार्ट सिग्नलिंग पद्धतीने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येनुसार सिग्नल स्वयंचलित पद्धतीने हा कालावधी ठरवतो. त्यात सिग्नलचा जास्तीत जास्त कालावधी निश्चित केलेला असतो. त्यानुसार सिग्नल स्वयंचलित पद्धतीने वेळ निश्चित करते. त्यासाठी ३९५ सिग्नल स्वयंचलित करण्यासाठी आयआयटी मुंबईची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वर्दळीच्या वेळी, विना वर्दळीच्या वेळी कोणत्या बाजूला किती वाहने असतात, याचा तसेच पादचाऱ्यांचाही अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर जंक्शनवरील वेगमर्यादा, अवजड वाहानांची संख्या बसेसची संख्या फेरीवाले यांचाही अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येईल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल. येत्या जूनपर्यंत अहवाल सादर केला जाणार आहे. त्यात वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरणार आहे.

सध्याची सिग्नल यंत्रणा सुमारे १५ वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शहरात सर्वच बाबतीत फार मोठे बदल झाले आहेत. ज्यात रहदारीचे, लहान-मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळेच सिग्नल यंत्रणा स्वयंचलित करण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या पारंपरिक सिग्नल पद्धतीत त्याचा कालावधी निश्चित केलेला असतो. म्हणजे लाल दिवा किती वेळ राहील?, हिरवा दिवा किती वेळ राहील? हे निश्चित असते. स्वयंचलित सिग्नलिंग पद्धतीने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येनुसार कालावधी ठरविला जातो. त्यात सिग्नलचा जास्तीत जास्त कालावधी निश्चित केलेला असतो. स्वयंचलित सिग्नल असतील, तर वाहनांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरू शकेल. त्यामुळे ज्या बाजूला वाहनांची संख्या जास्त आहे, त्या बाजूला सिग्नल जास्त काळ सुरू राहून कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या ६५२ पैकी २५८ सिग्नल स्वयंचलित पद्धतीने कार्यरत आहेत. उर्वरित ३९५ सिग्नल टप्प्याटप्प्याने स्वयंचलित यंत्रणेवर कार्यरत करण्यासाठी आयआयटी मुंबईची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा अभ्यास सुरू असून जून २०२३पर्यंत अहवाल येणे अपेक्षित आहे.

सध्याच्या सिग्नल जंक्शनवरील वर्दळीच्या वेळी कोणत्या बाजूला किती वाहने असतात, वेग मर्यादा, अवजड वाहने इत्यादींचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबईत सध्याच्या घडीला दररोज ४३ लाख वाहने धावत असतात. फेब्रुवारी २०२०मध्ये ३८ लाख वाहने होती. त्यानंतर आणखी पाच लाख वाहनांची भर पडली. दिवसाला शेकडो नवीन वाहनांची नोंदणी मुंबईतील आरटीओत होत आहे. त्यातच ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, मीरा रोड, भाईंदर, पालघर यासह अन्य भागांतूनही मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहने येत-जात असतात. परिणामी वाहतूक कोंडी, प्रदूषण सगळेच प्रश्न उभे राहतात. स्वयंचलित सिग्नलमुळे जंक्शनवरील प्रवास झटपट होण्यास मदत मिळणार आहे, हे निश्चित. मुंबईत वाहतूक प्रामुख्याने एकाच दिशेने होत असते. सकाळच्या वेळेस वाहतूक उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि संध्याकाळच्या वेळेला वाहतूक दक्षिणेकडून उत्तरेकडे होते. सिग्नलचा कालावधी ठरवलेला असल्याने ज्या बाजूला वाहनांची कोंडी आहे, त्या बाजूची वेळ नाहक वाया जातो. जर स्मार्ट सिग्नल असतील, तर वाहानांच्या संख्येनुसार सिग्नलचा कालावधी ठरू शकेल. त्यामुळे ज्या बाजूला वाहनांची संख्या जास्त आहे, त्या बाजूला सिग्नल जास्त काळ सुरू राहून कोंडी सुटण्यास मदत होईल. ही स्मार्ट सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली, तर निश्चितच मुंबईकर मोकळा श्वास घेऊ शकतील आणि त्यांचा प्रवासही सुकर आणि झटपट होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -