अश्विनकडून विकेटचा षटकार; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : उस्मान ख्वाजा (१८० धावा) आणि कॅमरॉन ग्रीन (११४ धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ मालिकेतील चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर धावफलकावर ४८० धावांचा डोंगर उभारला आहे. भारताच्या रविचंद्रन अश्विनने अप्रतिम गोलंदाजी ऑसींचा निम्मा संघ माघारी धाडला.
उस्मान ख्वाजाने ४२२ चेंडूंचा सामना करत १८० धावांची संयमी खेळी खेळली. या खेळीत त्याने २१ चौकार लगावले. कॅमरॉन ग्रीनने ११४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ग्रीन याने १८ चौकार लगावले. त्याशिवाय मर्फीने ३४, हेडने ३२, स्मिथने ३८ धावांची जोड दिली. ख्वाजा-ग्रीन जोडगोळीने ३५८ चेंडूंत २०८ धावांची भागिदारी केली. गेल्या १० ते १५ वर्षांतील भारतामधील विदेशी संघाची ही सर्वात मोठी भागिदारी आहे. त्याशिवाय लायन आणि मर्फी यांनी नवव्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी करत भारताची डोकेदुखी वाढवली.
भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. अश्विनने ४८ षटके गोलंदाजी करत ६ विकेट मिळवले. यामध्ये त्याने १५ षटके निर्धाव टाकली. त्याशिवाय मोहम्मद शामी याने दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाचा डाव ४८० धावांवर आटोपल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताने दुसऱ्या दिवसाअखेर बिनबाद ३६ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा १७, तर शुभमन गिल १८ धावांवर खेळत आहे.
अश्विनची विक्रमाला गवसणी
मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात अन्य गोलंदाजांना फारशी चांगली गोलंदाजी करता आली नसली तरी रविचंद्रन अश्विनने पाहुण्यांचे ६ फलंदाज माघारी धाडले. या कामगिरीसह त्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. अश्विनने २६व्यांदा घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात ५ हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. यात अश्विनने भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. कुंबळेने घरच्या मैदानावर सर्वाधिक २५ वेळा ५ हून अधिक विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे अश्विननं ५५वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी ६३ सामन्यांत केली होती.
विराटने टिपले ३०० झेल
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने नॅथन लियॉनचा झेल घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० झेल पूर्ण केले आहेत. अश्विनच्या चेंडूवर त्याने स्लिप्समध्ये नॅथन लायनचा अप्रतिम झेल घेतला. ३०० झेल घेणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे, त्याच्या आधी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केली होती. द्रविड यांनी ३३४ झेल घेतले आहेत.