अंधश्रद्धेपोटी महिलेचं मासिक पाळीचं रक्त विकलं
पुणे: पुण्यासारख्या सुशिक्षीत शहरात किळसवाणी आणि अघोरी घटना घडली आहे. जादूटोण्यासाठी महिलेचं मासिक पाळीचं रक्त विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेचे हात-पाय बांधुन हा भयनाक प्रकार करण्यात आला. ही महिला विवाहित असून सासरच्या मंडळींनीच हे कृष्णकृत्य केलं. या प्रकरणी या २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. २ वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीच्या प्रेम विवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली.
ज्या दिवशी ही महिला पोलिसांकडे आली त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसंच हे अघोरी कृत्य बीडमध्ये घडलं असून गुन्हा दाखल करुन पुढचा तपास तिकडे करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.
आता या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.