कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मालमत्ता असलेल्या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी कोल्हापूर आणि पुणे येथे ही कारवाई सुरू आहे. त्यांचे कार्यालय, घरांची झडती इडी घेत आहे. यापूर्वीही इडीने या ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर ही दुसऱ्यांदा छापेमारी सुरू आहे.
मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलांविरोधात चाळीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तो रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. त्यात आता इडीने मुश्रीफ यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. इडीने पुणे, कोल्हापूर येथील त्यांच्या मालमत्तेवर छापेमारी सुरू केली असली तरी या कारवाईतून इडीच्या हाती काय लागले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
इडीपाठोपाठ आता सहकार विभागानेही कारवाई सुरू केली आहे. कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे सहकार विभागाकडून चौकशी आणि इडीची कारवाईमुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.