आज जागतिक महिला दिन. एक दिवस समस्त महिला वर्गाचा गौरव करण्याचा दिवस. या दिवशी अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. सन्मान, पुरस्कारांनी काही महिलांचा गौरवही होतो. खरं तर ती ३६५ दिवस कुटुंबांसाठी राबत असते. तरीही देशाच्या ७५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत सर्वच क्षेत्रात महिला वर्गांनी उत्तुंग भरारी मारल्याचे दिसून येत आहे. देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारी महिला आज डोळ्यांत तेल घालून तैनात आहे. ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे असे म्हटले जायचे, तिथे आज स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसतो. घर सांभाळणारी महिला ही जसा कुटुंबाचा आधार असते, तसे आज ती देशाचा आधार झाली आहे. त्यामुळेच देशाचा अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी आज एक महिला समर्थपणे सांभाळत आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या यावर्षीचाही अर्थसंकल्प सादर करतील. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या राजकारणातही आज मोठ्या प्रमाणात स्त्रीशक्तीची प्रत्येक राजकीय पक्षाला गरज वाटत आहे. महिलांना राजकारणात स्थान मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण, महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा पहिला निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. कुटुंब आणि घर सांभाळून समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा आपण गौरव करतो, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो. तरीही चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वच स्त्री वर्गाला तितकाच मानसन्मान मिळतो का? हा संशोधनाचा विषय आहे.
आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी अशा प्रत्येक वळणावर स्त्री प्रत्येक पुरुषाच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा आहे. तिच्याशिवाय घर, कुटुंब ही संकल्पनाही पूर्ण होत नाही. हीच स्त्री आपल्या प्रगल्भ देशात उंच भरारी घेत असताना अचानक कुठल्या तरी बंधनात अडकली जाते हीच एक खटकण्याजोगी वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. जुन्या जाणत्या समाजातील लोकांना जरी ही बंधने मान्य असली तरी आज काळाची गरज म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. सामाजिक भान जर व्यवस्थित जोपासले गेले तर मुले असो किंवा मुलींना कोणतीही बंधने कधीच आपल्याभोवती आहेत याची जाणीव होणार नाही. या बदलत्या मानसिकतेचा आपल्या देशासाठी चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. जर आपले हित योग्य दिशेने पाऊले टाकणारी असतील तर देशही बदलण्यास वेळ लागणार नाही. आधुनिकतेची जोड दिल्यास विचार योग्य दिशेने नक्कीच बदल घडवू शकतात. आभाळाला त्याच्या भव्यतेचे बंधन नसेल तर मग स्त्रीयांनाच का? याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे. तर मग नुसते ‘महिला दिन’ साजरा करून उपयोग काय!, असा प्रश्न उपस्थित होतो.
स्त्रियांना त्यांच्या विचारानुसार वागण्याची मुभा द्यायला हरकत नाही, याचा समाजाने विचार करायला हवा. कारण एका महिलेला पालकांकडून, समाजाकडून मिळालेला पाठिंबा आणि स्वातंत्र्य तिला तिच्या ध्येयाकडे अगदी बिनधास्तपणे नेऊ शकते. आज कायद्याने स्त्रियांना झुकते माप दिल्याने ‘ती’ स्वेच्छेने स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे. पण स्त्रिला स्वतःच्या मनाप्रमाणे खरंच जगता येतेय का? हा मोठा प्रश्न आहे. कारण तिने कुठे जावे? कोणाशी बोलावे? एवढेच काय तर तिने कोणते करिअर निवडावे? हे सर्व तिच्या संबंधित असलेले निर्णय घेताना तिच्या मनाचा विचार करण्याआधी तिचे आई-बाबा हे समाजाचा विचार आधी करतात. आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगातसुद्धा मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला तिलाच जबाबदार मानले जाते. मुळात तिने समाजाला स्वतःवर वर्चस्व गाजवण्याची संधी दिली म्हणून तिच्या वागण्या-बोलण्यावर, पेहरावावर बंधने आली. त्यामुळे स्त्रीने स्वतःच स्वतःवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करायला पाहिजे. आजही देशाच्या काही भागांत मुलींना मुलापेक्षा कमी दर्जा दिला जातो. आजही मुलींना स्वत:च्या आवडीचे करिअरच निवडता येत नाही. त्यांच्या इच्छा-आकांक्षांना काडीमात्र किंमत नाही. मला असे वाटते की, अशा पालकांना आपण शिक्षणाचे तसेच मुलींच्या कर्तृत्वाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. आपण एक उदाहरण म्हणून पाहूया. एक मुलगा जेव्हा शिक्षित होतो, त्यावेळी देशाचा एक नागरिक म्हणून त्याचे कर्तृत्व हे स्वकेंद्रित असू शकते; परंतु एक स्त्री जेव्हा उच्चशिक्षित होते, त्यावेळी त्याच्या सोबतच्या कुटुंबाला ती प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न करत असते. तिची धडपड निसर्गत: दिसून येते.
आजच्या मुलींमध्ये आत्मविश्वासाने वावरण्याची, योग्य तिथं खंबीर होण्याची, नाठाळाच्या माथी काठी हाणण्याची, आपली स्वप्न साकार करण्याची उमेद आहे, जिद्द आहे. पण बऱ्याचदा आजूबाजूचे वातावरण त्यांना सतत कमकुवत करत असते. कितीही मोठ्या कंपनीत नोकरीला असली तरी किंवा कितीही ‘सभ्य’ पोशाख केला असला तरी अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज मुली अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावताना दिसतात. पण त्यांची संख्या असते ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. त्यामुळे स्वातंत्र्य कुठे आहे? असे वाटणे स्वाभाविक आहे. पालकांनी मुलींवर विश्वास ठेवून एकदा तरी पाहिला पाहिजे. त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना करिअर करू दिले पाहिजे. त्या खूप पुढे जाऊ शकतात. त्याचबरोबर त्या घर आणि काम उत्तमरीत्या सांभाळतील, हे नव्याने सांगायला नको. असे असले तरी समाजात स्त्रीला नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते आणि तिला अबला समजले जाते, ही एक प्रवृत्ती आहे. या उलट स्त्रियांनी सगळ्याच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्री ही सबलाच आहे, हे समाज मनावर बिंबवायला हवे. आजच्या काळाची स्त्री ही चूल, मूल सांभाळून घरची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी उभी राहताना दिसते. आता फक्त तिला अपेक्षा असते ती पाठिंब्याची.