- दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
मार्च महिना सुरू झाला की, जागतिक महिला दिनाची चाहूल लागते. फक्त एक दिवस नाही तर संपूर्ण मार्च महिन्यात विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांचा सत्कार, मान-सन्मान सुरू होतो. खरं तर गेल्या काही वर्षांत इतक्या कर्तृत्ववान स्त्रिया निर्माण झाल्या आहेत की, संपूर्ण वर्षभर जरी या स्त्रियांचा सत्कार करायचं म्हटलं तरी दिवस अपुरे पडतील. स्त्रीला देवी संबोधल्या जाणाऱ्या आपल्या देशासाठी हे भूषणावह आहे. ती देखील अशीच कर्तृत्ववान. कुटुंबीयांची साथ आणि योग्य सहकाऱ्यांची मिळालेली जोड यामुळे तिने अल्पावधीत फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. ही कर्तबगार लेडी बॉस म्हणजे मिताली क्रिएशन्सच्या अमिता साठे-देवल.
दादरच्या अरुण साठे आणि अलका साठे या दाम्पत्याच्या पोटी अमिताचा जन्म झाला. संपूर्ण बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. प्रसिद्ध बालमोहन शाळेत अमिताचे शिक्षण झाले. पुढे कॉलेजचे शिक्षण कीर्ती कॉलेजमधून केले. कॉलेज पूर्ण होताच तिने एसएनडीटीमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. हे शिकत असताना लग्नासाठी स्थळ पाहणेदेखील सुरू झालं. वेळेत लग्न व्हावं, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.
अमिताचे बाबा नोकरी करायचे आणि त्यासोबत सिझनल व्यवसाय सुद्धा करायचे. आई पोस्टल अकाऊंटचा व्यवसाय करायची. त्यामुळे लहानपणापासूनच व्यवसायाचे बाळकडू अमिताला मिळालं होतं. अमिताच्या घरी थोडासा कलेचा वारसा देखील होता. गाणं नृत्य याची आवड असल्यामुळे धाकटी बहीण संगीताकडे वळाली. अमिता लग्नानंतर नृत्यक्षेत्रात आवड म्हणून वळली.
अमिताचं लग्न एकत्र कुटुंबात वाढलेल्या कैलास देवल या ठाण्यातील उमद्या तरुणासोबत झाले. अमिता-कैलास यांना १९९६ साली मुलगा झाला. मातृत्वाची जबाबदारी पार पाडत असताना अमिताला जाणवू लागलं की, आपण काहीतरी केले पाहिजे. तसं अमिताने फॅशन डिझायनिंग केल्यामुळे ती स्वत:चे कपडे डिझाइन करतच होती. सोबत आता कुटुंबातील सगळ्यांचे कपडे डिझाईन करून आऊटसोर्स करायची.
त्याच सुमारास एक कारागीर अमिताकडे आला होता. “मॅडम मला काम द्या,” तो कारागीर म्हणाला. तो कारागीर मशीन एम्ब्रॉयडरी करणारा होता. त्याला हाताशी धरून अमिताने काम सुरू केले. झ्युकी नावाची एम्ब्रॉयडरीची मशीन घेतली. त्या काळी ती खूप महाग होती. व्यवसायासाठी भांडवल नव्हतं. नवरा आणि आजीने मिळून ते मशीन घेण्यास मदत केली. सुरुवातीला घरातूनच हा व्यवसाय सुरू केला. जागा कमी पडायला लागल्यावर मैत्रिणीची १० बाय १०ची जागा भाड्याने घेतली. “काही लागलं तर मी आहे,” हा विश्वास नवऱ्याने दिला होता. सुदैवाने पहिल्या महिन्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नवऱ्याकडून भाड्यासाठी पैसे घेण्याची वेळ आली नाही.
सुरुवातीला ओळखीतलेच एम्ब्रॉयडरी क्लायंट शोधून आणायचे. एक्स्पोर्ट क्वालिटीचे कफ्तान बनवून ऑर्डर करून त्याचे सॅम्पलिंग करून देण्यास सुरुवात केली. धारावीतल्या एका फॅक्टरीमध्ये सॅम्पलिंग करून द्यायचं, डिझायनिंग, कलर स्कीम कशी करायची? कफ्तान एम्ब्रॉयडरी कशी करायची? कुठलं कापड वापरायचं हे सगळं अमिताच्या सल्ल्याने व्हायला लागलं. हळूहळू लोकांना कळायला लागले की, अमिता एम्ब्रॉयडरी करून देते. सुरुवातीला ओळखीतून आमचे कपडे पण शिवशील का? अशी विचारणा होऊ लागली म्हणून ड्रेस शिवणारे मास्टर शोधायला सुरुवात केली. पुन्हा एकदा नशीबाने साथ दिली. एक चांगले मास्टर मिळाले. त्यांना हाताशी घेऊन त्याची कला आणि अमिताचा डिझायनिंगचा अनुभव घेऊन व्यवसायाचा प्रवास सुरू झाला.
व्यवसाय करताना बिझनेस अकाऊंट सुरू करणं गरजेचं होतं. व्यवसायाला नाव देणं गरजेचं होतं, तेव्हा व्यवसायाला ‘मिताली क्रिएशन्स’ नाव सुचलं. हळूहळू चारजणांची टीम वाढली. एक नवीन मशीन विकत घेतली. शिवणारा एक कारागीर, एम्ब्रॉयडरीचा कारागीर, हेमिंग करणारी मुलगी अशी मिताली क्रिएशनची टीम तयार झाली.
एम्ब्रॉयडरी या गोष्टीपासून व्यवसायाला सुरुवात केली. लेडिज वेअरचं सगळंच काम एका टीमवर्कमुळे पूर्ण होत होतं. आलेलं काम दिलेल्या वेळेतच पूर्ण करून क्लायटंला द्यायचं, त्यांना दिलेला शब्द पाळायचा. या अशा व्यावसायिक नियमांमुळे मिताली क्रिएशन्सविषयी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला. काम बरंच वाढलं होतं. विविध एक्झिबिशन्सच्या माध्यमातून आपले काम
सर्वांपर्यंत पोहचविले.
माऊथ पब्लिसिटीमुळे लोकांमध्ये मिताली क्रिएशन्सची ओळख बनली होती. १० बाय १० नंतर, १५ बाय १२चे बुटिक घेतलं आणि भास्कर कॉलनीत ‘मिताली क्रिएशन्स’ शिफ्ट झाले. या स्टुडिओचे दोन भाग केले गेले, मागच्या बाजूला कारखाना, तर पुढे डिझायनर बुटिक लूक दिला. त्यामुळे ग्राहकांना दिलेल्या वेळेत त्यांच्या आवडीनुसार डिझाइन केलेले ड्रेस देता येऊ लागले. या सगळ्या व्यावसायिक प्रवासात आई-बाबा, नवरा, धाकटी बहीण या सगळ्यांची अमिताला मोलाची साथ होती.
माणसं टिकवणं हे मितालीचे बलस्थान आहे. तिचा पहिला कारागीर आज वीस वर्षे झाले तरी सोबत काम करतोय. पहिला एम्ब्रॉयडरी करायला आलेला कारागीर काही आपत्कालीन परिस्थितीमुळे गावी गेला. आता तो तिकडेच स्थिरस्थावर झाला. त्याने गावी स्वत:ची दोन दुकाने सुरू केली आहेत. “मॅडम, तुमच्यामुळे आज चार माणसं माझ्या हाताखाली आहेत.” असं आवर्जून तो फोनवर सांगतो.
मिताली क्रिएशनमध्ये ग्राहकांच्या आवडी निवडीचा विचार करून कपडे डिझाइन केले जातात. कस्टमाइझ्ड काम करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे क्लाएंटदेखील आनंदी होतात. सगळ्या प्रकारचे ब्लाऊझ, टॉप्स, शरारे, गरारे, प्लाझो अशा अनेक प्रकारचे भारतीय कपडे स्वतः डिझाईन करून कस्टमाइझेशन करायला सुरुवात केली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.
“लॉकडाऊन काळात ‘घे भरारी’ या ग्रुपमुळे माझ्या व्यवसायाला एक वेगळी दिशा मिळाली. एकतर या मंचामुळे व्यवसाय ऑनलाइन आला आणि अगदी भारताबाहेरीलही क्लायंट मिळू लागले. घे भरारीमुळे एक्झिबिशनचा अनुभव घेता आला. यामुळे आता लोकं मिताली क्रिएशन्ससोबत मलादेखील नावानिशी ओळखू लागले.” हे सांगताना अमिताच्या डोळ्यांत वेगळीच चमक असते. एक्सक्लुझिव्ह डिझाइन आणि जुन्या साड्यांचा नवीन आऊटफिट तयार करणं ही मिताली क्रिएशन्सची खासियत आहे. तो कायम जपण्याचा प्रयत्न अमिता देवल करतात.
“आपण आपल्या सहकाऱ्यांना योग्य मान दिला पाहिजे. मोबदला दिला पाहिजे. त्यांच्या कामाचं कौतुकदेखील केलं पाहिजे. या छोट्या-छोट्या गोष्टी प्रभावी ठरतात. त्यांच्या कलागुणांना हेरून त्यांना मोठ्ठं होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. बॉस न बनता लीडर बनून आपल्यासोबत सहकाऱ्यांचादेखील विकास करण्यासाठी झटलं पाहिजे”, असं अमिता देवल म्हणते. नकळत ‘लेडी बॉस’ची व्याख्या नव्याने मांडते. अमिता देवलसारख्या कर्तबगार लेडी बॉसमुळेच महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित होते.