Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

नवकथेला उभारी देणारा ‘खेळ मांडियेला नवा!’

नवकथेला उभारी देणारा ‘खेळ मांडियेला नवा!’
  • पुस्तक परीक्षण: महेश पांचाळ

कथा लेखक आणि मुक्त पत्रकार काशिनाथ माटल यांनी लिहिलेला ‘खेळ मांडियेला नवा’ नुकताच प्रकाशित झाला आहे. पुण्याच्या ‘संवेदना प्रकाशन’ने हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. सर्वच कथा वाचताना वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. विषयात वैविध्यता, शैलीत नावीन्य आणि मनाला भिडणारे वास्तव यामुळे या सर्व कथा नवकथांच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतात.

कथा वाङ्मय प्रकार दिवाळी अंक परंपरेतून सुरू झाला. त्याला शंभर-दीडशे वर्षांची परंपरा लोटली. पण पुढे नवकथा जन्माला आली. विनोदी, ग्रामीण, स्त्रीवादी, विज्ञान आशा विविध अंगांने ती वळणे घेत गेलेली दिसते. आज ती नव्या वास्तववादी भूमिकेतून पुढे जाताना दिसते. काशिनाथ माटल यांच्या सर्वच कथा ग्रामीण आणि शहरी सेतू-पूल पार करून चिंतनाच्या दिशेने पुढे जाताना दिसतात. काशिनाथ माटल यांच्या कथासंग्रहातील ‘या नात्याला काय नाव देऊ!’ ‘जन्म,’ ‘तिची कहाणी,’ ‘अतर्क्य,’ ‘विसावा’ अशा सर्वच कथांचा त्यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल. एल्झायमर या व्याधीने पछाडलेली ‘किनारा’मधील नायिका किंवा ‘चॅम्पियन’मधील नायिका या जेव्हा जगतात, तेव्हा त्यांची झेप अनेक परिस्थितीशी लढण्याशी, झगडण्याशी असते, हे चित्र सजिव करण्यात लेखक यशस्वी झालेले दिसतात. कथा संग्रहातील अनेक कथांचा कॅनव्हास इतका विस्तृत आशयघन आणि मनोवेधक आहे की, त्या कथांची उत्तम कादंबरी, नाटक, चित्रपट, मालिका होऊ शकतात. हे कथासंग्रह वाचताना जाणवल्याशिवाय राहत नाही! ‘तिची कहाणी’मधील ‘मम्मी’ तृतीयपंथी आहे. ती अनुश्रीला दत्तक घेते. पण समाजाने लाथाडलेले आपले जीणे तिच्या वाट्याला येऊ देत नाही. ‘चॅम्पियन’मधील अडाणी ‘माय’ आपल्या घरातील विरोध पत्करून लेकीला विश्वविजेती करते. ‘अतर्क्य’मधील माता-पिता, नक्षलिस्टचे कट्टर विरोधक! पिता अखेर या सुधारणांच्या खेळात शिकार ठरतो. पण माता मरणोत्तर आपल्या मुलाला उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर सुरक्षित नेते. एकूण सर्व मातांची नाती लेखक आपल्या कसदार लेखनीतून भक्कमपणे उभी करण्यात यशस्वी ठरतात, हे लेखक म्हणून काशिनाथ माटल यांचे यश आहे.

  • लेखक : काशिनाथ माटल
  • प्रकाशक : संवेदना प्रकाशन, पुणे
  • मूल्य : रु. २००/-
Comments
Add Comment