- विशेष: ऊर्मिला राजोपाध्ये
आरंभ आहे तसाच अंत आहे, सुष्ट आहे तसे दुष्ट आहे, सुरम्य आहे तसेच अभद्रही आहे. हे वास्तव दाखवून अभद्र, दुष्ट, अनिष्ट शक्तींचा नाश केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे सत्य उलगडून दाखवणाऱ्या अनेक कथा प्रचलित आहेत. लहानपणी आपल्याला अशा अनेक कथा सांगितल्या जातात आणि दुष्ट शक्तींचा नाश कोणी आणि कसा केला, त्यांच्या नाशाने पृथ्वी कशी खलमुक्त झाली हे समजते. पुराणातील कथांमधील हा विचार पुढे साजरा होणाऱ्या सणवारांच्या निमित्ताने रुजत जातो आणि विचारांप्रमाणे प्रत्यक्ष कृतीद्वारे यासंबंधीचे काही संकेत दृढ होत जातात. फाल्गुन मासामध्ये साजऱ्या होणाऱ्या होळीमध्ये देखील असे अनेक अर्थ दडलेले आहेत. होळी पेटवून, तिला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून, नारळाची आहुती देऊन, भोवती एकत्रित गलका करत होणारे या सणाचे साजरीकरण बहुपेडी आहे, असेच म्हणावे लागेल. एका वर्षाची अखेर होऊन सर्जनाची वाट प्रशस्त करत नवे वर्ष दारी उभे ठाकले असताना आधी परिसरात साचलेल्या शुष्क काष्टांची होळी करत त्यांना सन्मानपूर्वक निरोप देणे आणि ती राख अंगाला फासून नंतरच्या दिवशी धुळवड साजरी करत हर्षमयी वातावरणाचा आनंद लुटणे हा होळीचा साधासोपा अर्थ. मात्र या व्यावहारिकतेच्या पलीकडेही या सणाला अाध्यात्माची विलक्षण डूब आहे. म्हणूनच वर्षाच्या अखेरीस येणारा हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जातो.
स्थानपरत्वे होळीला ‘शिमगा’ असेही म्हणतात, तर उत्तरेत या सणाला ‘दोलायात्रा’ म्हणतात. या सणाला दक्षिणेत ‘कामदहन’ असे म्हटले जाते. विष्णुपुराण आणि भागवतात नमूद केलेली याविषयीची प्रसिद्ध कथा सांगायची, तर पुतना राक्षसीचे उदाहरणही दिले जाते. पुतनेने कृष्णाला विष देण्याचे ठरवले. पण कृष्णाने तिच्या स्तनातील विष प्राशन करून तिलाच यमसदनास पाठवले. म्हणून होळीच्या दिवशी पुतनेला जाळण्यात येते. ही कथा उत्तरेत प्राधान्याने प्रचलित आहे. महाराष्ट्र आणि कोकणात ढौंढा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देऊ लागली तेव्हा लोकांनी जिकडे तिकडे अग्नी पेटवला, तिला शिव्याशाप दिले आणि राक्षसीला गावातून बाहेर काढले. याचा सरळ अर्थ असा की, वाईट प्रवृत्तींना बाहेर घालवायचे आणि सत्प्रवृत्तीचा प्रकाश पौर्णिमेच्या पूजेतून प्राप्त करायचा, हा या सणाचा उद्देश आहे. बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुदर्शीला दोलायात्रेच्या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी लोक उपवास करतात आणि कृष्णाची तसेच अग्नीची पूजा करतात. त्यानंतर एकमेकांना गुलाल लावतात, होळीची गवताची मूर्ती तयार करतात आणि पौर्णिमेला ती जाळतात. हा सण विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ओरिसा प्रांतात कृष्णाच्या मूर्तीची मिरवणूक काढतात आणि सगळ्यांना गुलाल लावतात. या दिवशी तिथे गोठ्यातल्या जनावरांची पूजा करतात. महाराष्ट्रात एरंड वृक्षाचा दांडा मातीत रोवून, शेणाने लिंपून, सारवून, त्याभोवती गोवऱ्या रचून वाळलेल्या वृक्षांची लाकडे लावली जातात.
हल्ली मात्र कोणाची होळी ‘मोठी’ होते या ईर्ष्येपोटी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. सावली देणारे मोठमोठे वृक्ष कापले जातात. एका रात्रीतून झाडे कापून नेतात. यामुळे काहीही साध्य होत नाही हे लक्षात घ्यायला हवे. काही ठिकाणी होळीला साखरेचे हार घालण्याचीही पद्धत आहे. फांदीला हार घालतात किंवा कांकणही बांधतात. विशेषत: आदिवासी, भिल्ल समाजात ही प्रथा आवर्जून पाळली जाते. खानदेशात नंदूरबार जिल्ह्यात, विदर्भात गोंदिया, चंद्रपूर या प्रांतात आधीचे तीन दिवस आदिवासी, भिल्ल रात्रभर होळी पेटवून गाणी गातात, आनंदाने होळीभोवती नाचतात. त्यांच्या गायनातून निसर्गाप्रती भक्तिभाव दिसून येतो. निसर्गाने वर्षभर दिलेल्या धान्य आणि फळांबद्दलची कृतज्ञता ते होळी पौर्णिमेच्या दिवशी व्यक्त करतात. त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे दुसऱ्या दिवशी तरुण-तरुणी वसंताच्या आगमनाची गीते म्हणत जोडीदाराची निवड करतात. ते एकमेकांना पसंत करत विवाह ठरवतात. नंदूरबार प्रांतात होळीचा दांडा रोवून भिल्ल समाजातला सर्वात वृद्ध पुरुष आधी होळीची पूजा करतो, त्यानंतर बाकीचे सारे पूजा करतात. रात्रभर गाणी म्हणतात. सकाळी होळीला नमस्कार करून आपापल्या कामाला जातात. त्रयोदशी, चतुदर्शी आणि पौर्णिमा या तीन दिवसांमध्ये हा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला जत्रेचे रूप असते. लहान-मोठे सगळेच त्यात सामील होतात. त्यांच्याकडे हा उत्सव दिवाळीपेक्षाही मोठा मानला जातो.
कोकणातही होलिकोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गावकरी आपल्या शेजारच्या गावातील घराघरांत जातात, लोकांना प्रेमाने भेटतात, गुलाल लावतात. ते ढोल-ताशे-सनई या वाद्यांसह जातात. कोकणात शिमग्याच्या दिवशी ‘घुमट’ नावाचे वाद्य वाजवले जाते. त्याबरोबर झांजा, सारंगी, तबला या वाद्यांच्या साथीतून होळीची गाणी गायली जातात. त्यातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. या विविध प्रांतांमधून साजरा होणारा हा उत्सव अशा विविध पद्धतींत साजरा होतो. काही ठिकाणी होळीपासून रंगपंचमीपर्यंत होळी विझू न देण्याचा प्रघात पाहायला मिळतो. रंगपंचमीच्या दिवशी होळीवर पाणी गरम करायचे, त्यात रंग टाकायचा आणि त्या पाण्याने मुलांना न्हाऊ घालायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे त्या मुलाला कोणत्याही ऋतूत त्रास होत नाही, अशी भावना आढळते. या दिवसांमध्ये काही ठिकाणी गाण्यांचे उत्सव रंगतात. विशेषत: महाराष्ट्रात पंढरपूरमध्ये लावणी गाणारे प्रसिद्ध ज्ञानोबा उत्पात पाच दिवस लावणी उत्सव साजरा करत असत. आजही त्यांच्या घराण्यात ही परंपरा सुरू आहे. या लावण्या नवरसात्मक असतात. या काळात विठ्ठलाचे पुजारी बडवे आणि रुक्मिणीचे पुजारी उत्पात एकमेकांना गुलाल लावतात. हा सोहळाही अपूर्व असतो.
या काळात उत्तरेमध्ये होळीची गीते, कजरी, ठुमरी आणि काही प्रादेशिक स्वरूपाची राधा-कृष्णाची गीते गायली जातात. हा निसर्गाचा आणि माणसांचा मिळून उत्सव आहे. तो विलोभनीय आहे. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने गळतात आणि वसंताच्या आगमनापासून नवी पाने येतात. नवे वारे वाहू लागतात. आकाशही नवे होते आणि सृष्टीही वेगळ्या तेजाने चमकते. अशा या रम्य काळात समाजाने एक व्हावे आणि अनिष्ट रूढींचा नायनाट करावा हा भाव होळीमध्ये आहे. मनाचा हा आनंद व्यक्त करण्यासाठीच विविध रंगांची उधळण करण्याची प्रथा आहे.
आजही होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो; परंतु हा सण साजरा करण्यात निर्भेळ आनंद वाटत नाही. त्यामुळे सणाचा निखळ आनंद घेता येत नाही. मद्य पिऊन धिंगाणा घालणे, उगाचच प्रत्येकाच्या नावाचा शिमगा करणे अशा गैरप्रकारांमुळे समाजात निष्कारण तेढ वाढते, गैरसमज निर्माण होतात. छेड काढण्याच्या, त्रास देण्याच्या उद्देशाने धुळवडीच्या दिवशी मुलींच्या अंगावर पाण्याचे फुगे फेकले जातात. त्यात घातक रसायने भरली जातात. ही राक्षसी प्रवृत्ती चुकीची आहे. आरडाओरडा करण्याला मोकळेपणा म्हणत नाहीत. सभ्य वागण्यातून मोकळेपणा जास्त सुंदर दिसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाने मनाला समजून घेण्यासाठी सण असतात. सणांचा आनंद लुटणे हे एक प्रकारे संस्कृतीचे उन्नयन असते. पण आजचे उत्सव पाहून हा उद्देशच हरवल्याचे जाणवते. बेबंद तरुणांवर अंकुश ठेवण्यासाठी मग काही ठिकाणी पोलिसांना बोलवावे लागते. कायद्याचा धाक दाखवत नाच-गाणी बंद करावी लागतात. हे निश्चितच शोभनीय नाही. यामुळे निर्भेळ आनंद मिळणे अशक्य आहे. यापेक्षा एकमेकांना सद्भावनेने शुभेच्छा देऊन, प्रेमाने संवाद साधणे आणि नव्या ऋतूसारखे आपणही नवे होणे हीच खरी होळी पौर्णिमा आहे.