Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्स...आणि मी डायरेक्ट हिरो झालो!

…आणि मी डायरेक्ट हिरो झालो!

टर्निंग पॉइंट: अशोक शिंदे

प्रत्येकाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट हा येतोच. टर्निंग पॉइंट नंतर त्या व्यक्तीच्या जीवनात बदल घडतो. त्यामुळे प्रत्येकाचे जीवन जाणून घेता येते. अशाच काही सेलिब्रिटींच्या टर्निंग पॉइंट विषयी आपण जाणून घेऊया.

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे नायक अशोक शिंदे यांची स्टार प्रवाह वहिनी वरील ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ ही मालिका सध्या गाजत आहे. त्यांचा टर्निंग पॉइंट जाणून घेऊया.

अशोक शिंदे : मी माझ्या करिअरची सुरुवात इंजिनिअरिंग करीत असताना मेकअप आर्टिस्ट म्हणून केली. माझे बाबा पुण्यात उत्तम मेकअप आर्टिस्ट होते. ते नाटकासाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचे. त्यांच्याकडून मी मेकअपची कला शिकायचो. त्यांच्या सोबत मी देखील जायचो. मेकअपचे काम करीत असताना, मला मात्र अभिनयाची गोडी लागली होती. मला ॲक्टिंगच्या क्षेत्रात जायचे होते; परंतु बाबांचा या क्षेत्राला विरोध होता. कारण त्यांचे मते हे क्षेत्र अनिश्चित आहे. येथून येणाऱ्या पैशांची हमी नाही. मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो; परंतु मला यामध्येच करिअर करायचे होते. मला टर्निंग पॉइंट मिळत नव्हता.

एकदा एका कार्यक्रमाला मी मेकअप व ड्रेपरी (पोशाख) करण्यासाठी गेलो होतो. तो कार्यक्रम होता संगीतकार राम कदम यांचा. त्याच्यामध्ये आपले बाबूजी म्हणजे स्वर्गीय सुधीर फडके गाणार होते. त्यांचा कार्यक्रम संगीतकार राम कदम (रामभाऊ) यांनी आयोजित केला होता. कारण रामभाऊ त्यांचे शिष्य होते. मी मेकअप व ड्रेपरी करीत असताना एक आवाज आला, ‘अरे एक मिनिट इकडे बघ जरा.’ मी तिथे बघितलं, तर रामभाऊ! मी त्यांच्या जवळ गेलो व त्यांच्या पाया पडलो. ते मला म्हणाले, ‘तू काय करतोस?’
मी म्हणालो, ‘मी इंजिनिअरिंग कॉलेजला आहे,’ माझे वाक्य पूर्ण होताच ते म्हणाले, ‘इथे काय करतोस आता?’
‘मी मेकअप व ड्रेपरी करतो.’
‘का?’ त्यांनी विचारलं.
‘तो व्यवसाय आहे आणि माझे बाबा मेकअप आर्टिस्ट आहेत.’ मी म्हणालो.
यावर ते मला म्हणाले, ‘तुला हेच करायचेय का पुढे?’
मी म्हटलं, ‘मला ॲक्टिंग करायचीय.’
‘मग मी चान्स दिला तर करशील का ॲक्टिंग.’ मला तर पहिल्यांदा हे खरंच वाटलं नाही.
ते मला म्हणाले, ‘उद्या तू मला भेटायला ये, माझ्या घरी नवीन पेठेत (पुण्यात).’
दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. मला तर मनात वाटत होतं, ते माझी मस्करी करताहेत. त्यांना भेटल्यानंतर ते म्हणाले, ‘कष्ट करण्याची तयारी आहे का?’ मी म्हटलं, ‘खूप.’
‘ठीक आहे, शाहीर पठ्ठे बापूराव यांचं नाव ऐकलस का?’
‘हो, ऐकलंय म्हणजे काय?’ मी म्हणालो.
‘शाहीर पठ्ठे बापूरावांचा रोल करणार का?’ तो मला शॉकच होता.
मी म्हटलं, ‘मी?’ तेव्हा ते म्हणाले, ‘हो, मला तुझ्यात शाहीर पठ्ठे बापूराव दिसतोय, तुझं बोलण, तुझी देहबोली, तुझं वागणं वगैरे. तुला खूप काम करायचंय. माझ्याकडे तुला एक महिनाभर ट्रेनिंग घ्यावं लागेल.’

त्यावेळी माझी मोठी मुलगी नेहा नुकतीच जन्मली होती. त्याच दिवशी मला त्या चित्रपटाची ऑफर आली आणि तो दिवस माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. मेकअप आर्टिस्टचा मी डायरेक्ट हिरो झालो. त्या चित्रपटात पवळा भूमिकेत मेनका जळगावकर ही तमाशा कलावंत नायिका होती, तर खलनायकाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध मोहन जोशी होते. तो सिनेमा तयार झाला. तो सिनेमा रिलीज होण्याअगोदरच मला अजून एक ‘रेशमगाठी’ नावाचा चित्रपट मिळाला. त्यात माझ्यासोबत वर्षा ऊसगावकर, डॉ. श्रीराम लागू होते. हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. अभिनयात मी पुढे पुढे जातच राहिलो. मेकअपकडे मला पाहताच आले नाही; परंतु मेकअपच डिपार्टमेंट मी सोडलं नाही. त्याची कास धरून ठेवली. आतापर्यंत जे काही मी दोनशे सिनेमे व शंभर मालिका केल्या आहेत, त्यामध्ये माझ्या मेकअपच्या ज्ञानाचा फायदा झालेला आहे.

‘हर हर महादेव’ या चित्रपटात मी गेट अप केला आहे, फुलाजी प्रभू देशपांडे यांचा. त्याच पद्धतीचे केस कापले, मिशा डिझाइन केल्या. माझा मेकअप प्रसिद्ध मेक अप डिझायनर विक्रम गायकवाड करणार होते; परंतु नेमके ते आजारी पडले. विक्रम गायकवाड माझ्या वडिलांचा शिष्य व माझा बालपणापासूनचा मित्र. त्याला मेकअपमध्येच करिअर करायचे होते. माझी व त्याची चॉइस एकच असल्याने मी ‘हर हर महादेव’मधील फुलाजी देशपांडेचा गेट अप करू शकलो. अशा प्रकारे परत हिरो ते मेकअप आर्टिस्ट असा माझा टर्निंग पॉइंट ठरला.

शब्दांकन : युवराज अवसरमल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -